Okra Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Okra Farming : जळगावच्या भेंडीचा मुंबई, सुरतपर्यंत डंका

Okra Production : केळी, कापूस, भरिताची वांगी यासाठी प्रसिद्ध असलेला जळगाव जिल्हा आता भेंडी पिकासाठीही ओळखला जाऊ लागला आहे.

Team Agrowon

चंद्रकांत जाधव

Okra Crop : केळी, कापूस, भरिताची वांगी यासाठी प्रसिद्ध असलेला जळगाव जिल्हा आता भेंडी पिकासाठीही ओळखला जाऊ लागला आहे. गिरणा पट्ट्यातील गावांमध्ये उत्पादित होणाऱ्या दर्जेदार भेंडीला भेंडीला स्थानिकसह मुंबई, सुरत (गुजरात) बाजारपेठांमध्ये चांगला उठाव मिळत आहे. शेतकऱ्यांच्या अर्थकारणास या पिकाने बळ दिले आहे.

जळगाव जिल्हा केळी, कापूस व भरताच्या वांग्यांसाठी प्रसिद्ध आहे. सोबतच या जिल्ह्याने विशेषतः गिरणा काठालगतच्या शेतकऱ्यांनी भेंडी पिकात विविध बाजारपेठांमध्ये नाव मिळविण्यास सुरुवात केली आहे. चाळीसगाव, भडगाव, जामनेर, पाचोरा, जळगाव, यावल, भुसावळ, एरंडोल, धरणगाव या भागांत या पिकाखालील क्षेत्र अधिक प्रमाणात दिसून येते. धरणगाव तालुकाही या पिकात पुढे आला आहे. जिल्ह्यात उन्हाळी हंगामात ८०० हेक्टरपर्यंत, तर खरीप हंगामात एक हजार ते १२०० हेक्टरपर्यंत भेंडीचे क्षेत्र असते. यंदा ही लागवड १२५० हेक्टरपर्यंत आहे.

दर्जेदार भेंडीचे उत्पादन

बाजारातील मागणी व आवश्यकता ही बाब लक्षात घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांनी भेंडी लागवडीचे वेळापत्रक व व्यवस्थापन ठेवले आहे. तीव्र उष्णतेमुळे एप्रिल व मे हा कालावधी वगळता वर्षातील बहुतेक सर्व महिन्यांत या भागात भेंडी लागवडीचे नियोजन केले जाते. हिवाळ्यात अधिक भेंडी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ऑगस्टमध्ये लागवडीचे नियोजन केले जाते. दिवाळीनंतर ती बाजारात येऊ लागते. रसायन अवशेषमुक्त भेंडी उत्पादनाचे प्रयत्नही येथील शेतकऱ्यांनी सुरू केले आहेत. यामध्ये लागवड अंतराचे प्रयोग, ठिबक व अन्नद्रव्यांबरोबरच कीडनाशकांचाही योग्य वापर करण्यावर भर असतो. उत्पादन वाढीसह मजुरी खर्च कमी करण्यासाठी अनेक शेतकरी पॉलिमल्चिंगवर लागवड करीत आहेत. एक दिवसाआड असे एकूण ७० ते ८० तोडे हंगामाच्या अखेरपर्यंत होतात. काही शेतकरी १०० तोडेही साध्य करतात. प्रत्येक तोडा करताना प्रतिदिन एकरी किमान एक हजार रुपये मजुरी लागते. लागवडीची पध्दत, हवामान, पाणी, माती या सर्व घटकांचा विचार केल्यास एकरी सहा टनांपासून ते दहा टनांपर्यंत उत्पादन साध्य केले जाते. काही वेळा त्याहूनही अधिक उत्पादन घेण्यात येते. गिरणा भागापुरते बोलायचे तर उन्हाळ्यात सिंचनाचे स्रोत कमकुवत होत असल्याने या काळात भेंडीचे क्षेत्र कमी असते. जूनमध्येच मुख्य लागवड करण्यावर भर असतो. भेंडी तोडण्यासाठी मजूर उन्हाळ्यात अधिक मिळतात. परंतु पावसाळ्यात त्या तुलनेत ते फारसे मिळत नाहीत. त्यामुळे प्रति दिन २०० रुपये मजुरी तोडणीसाठी द्यावी लागते. हिवाळ्यात मात्र मजूर पुरेसे उपलब्ध होतात.

मुंबई, गुजरातपर्यंत ‘मार्केट’

वाशी (मुंबई)सह सुरत (गुजरात) येथेही जळगावच्या भेंडीला बारमाही मोठी मागणी असते. काही खरेदीदार थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. एप्रिल व मेदरम्यान प्रति दिन दोन हजार क्विंटल तर जून, जुलैमध्ये अडीच हजार क्विंटलपर्यंत भेंडीचा पुरवठा जामनेर, भडगाव, धरणगाव, एरंडोल व जळगाव तालुक्‍यांतून मिळून होतो. सप्टेंबरपासून मुंबई व गुजरातेत सुरत येथून मागणी वाढते. त्या वेळेस प्रति दिन एक हजार ८०० ते दोन हजार क्विंटलपर्यंत पुरवठा होतो. यातील कमाल पाठवणूक सुरत व मुंबई येथे होते. गुजरातमधील बडोदा बाजार समितीतही चांगली मागणी असते. दिवाळीनंतर मुंबई येथील मोठे खरेदीदार भेंडीची युरोपीय किंवा अन्य देशांना निर्यात करतात. तेथे रसायन अवशेषमुक्त भेंडीला मागणी आहे. मुंबई येथील
खरेदीदारांना शेरी, पथराड, एरंडोल येथील खरेदीदार भेंडी पाठवितात. ते हिवाळ्यात थेट शेतातून शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. जून- जुलैच्या काळात मुंबईतील मागणी कमी होते. सध्याच्या कालावधीत (ऑगस्ट) धरणगाव, अमळनेर, जळगाव येथील बाजारात भेंडीची आवक अधिक होते. जळगाव बाजार समितीत यंदा जून व जुलैमध्ये सरासरी १६ क्विंटल प्रति दिन आवक झाली. गिरणा काठावरील गावांमध्ये आठवडी बाजारात तर बारमाही आवक सुरू असल्याने ग्राहकांना टवटवीत, ताजी भेंडी उपलब्ध होते.

...अशी राहते दरांची स्थिती (इन्फो)

यंदा किंवा एकूणच जानेवारी ते जुलै या कालावधीत सरासरी ३० रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. सध्या २५ रुपये दर सुरू आहे. एप्रिल ते जून या कालावधीत कमाल ५० रुपये,
मागील वर्षी उन्हाळ्यात सरासरी ४० रुपये, तर पावसाळ्यात सरासरी २० रुपये दर मिळाला होता.
जळगाव बाजार समितीत २०२२ मध्ये सरासरी २५ रुपये, तर २०२३ मध्ये सरासरी २८ रुपये
दर होते. जळगाव बाजार समितीमधील काही व्यापारी शेतकऱ्यांकडून बारमाही थेट खरेदी करतात.
तेजी किंवा मंदी असली तरी निश्‍चित स्वरूपाचा दर देण्याचा करार काही व्यापाऱ्यांनी करून घेतला आहे. भेंडीचा दर्जा कायम राखला जावा अशी त्यांची अट असते. भेंडीला ३० रुपये प्रति किलोचा दर मिळाला तरी आर्थिकदृष्ट्या ती काहीशी किफायतशीर होऊ शकते. परंतु याहून दर कमी झाल्यास
अर्थकारणावर परिणाम होतो. नफ्याचे प्रमाण घटते. फवारणी आणि मजुरी यावर अधिक खर्च होतो. अनेकदा किडी- रोगराईत पीक हातून जाण्याचा मोठा फटका सहन करावा लागतो असे शेतकरी सांगतात.


भेंडीचे दर्जेदार उत्पादन मी घेत असल्याने उठाव चांगला असतो. यंदा किलोला ५० रुपयांपर्यंत दर मिळाला. पावसाळा काळात व त्यातही ऑगस्टपर्यंत दर कमी असतात. या काळात मजुरांचे काटेकोर नियोजन करावे लागते.
- भटेसिंह पाटील, ९८९०७८७३१०
वरखेड, ता. भडगाव, जि. जळगाव


भेंडीला बारमाही मागणी असल्याने लागवडीची संधीही वर्षभर असते. उन्हाळ्यात दर चांगले असतात. जुलैनंतर आवक अधिक असल्याने दर व नफाही या काळात कमी होत जातो. भेंडीसाठी जळगावच्या बाजारास पसंती आहे.
- गोपीचंद चव्हाण, जळके, (ता. जळगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

SCROLL FOR NEXT