Safflower Agrowon
ॲग्रो विशेष

Safflower Farming : जिरायती क्षेत्रासाठी करडई फायदेशीर

Safflower Update : करडई पिकाची मुळे जमिनीत तीन फुटांपेक्षा जास्त खोलवर जातात. त्या परिसरातील ओलावा व अन्नद्रव्ये शोषून घेतात. अवर्षणप्रवण आणि कमी पावसाच्या परिस्थितीमध्ये हे पीक चांगल्या प्रकारे तग धरू शकते.

संजय बडे 

Safflower Production :

करडई पिकाची मुळे जमिनीत तीन फुटांपेक्षा जास्त खोलवर जातात. त्या परिसरातील ओलावा व अन्नद्रव्ये शोषून घेतात. अवर्षणप्रवण आणि कमी पावसाच्या परिस्थितीमध्ये हे पीक चांगल्या प्रकारे तग धरू शकते.

तसेच त्यांच्या पानांची पूर्ण वाढ होतेवेळी मेणाचा थर असतो. त्याला कडेने काटे येतात. परिणामी झाडातील पाण्याचे बाष्पोत्सर्जन कमी होते. त्यामुळे करडई हे पीक जिरायती आणि अवर्षणप्रवण भागातही बऱ्यापैकी चांगले उत्पादन देऊ शकते.

करडई पिकास जमिनीत पुरेसा ओलावा असेल तर पाण्याची गरज भासत नाही. फारच टंचाईच्या काळात पिकास एक ते दोन पाणीही पुरेसे होतात. म्हणजे पाणी कमी असल्यास एक एकर गव्हाच्या पिकाऐवजी आपण दोन-तीन एकर करडई घेऊ शकतो. रब्बीमध्ये वारंवार गहू पीक घेतल्यामुळे जमिनीच्या फक्त वरील थरातील अन्नद्रव्ये वापरली जातात. मुळे खोलवर जाणारे करडईसारखे पीक उत्तम पर्याय आहे.

जमीन :

करडईच्या पिकास मध्यम ते भारी खोल जमीन निवडावी. ६० सें.मी.पेक्षा जास्त खोल जमिनीत करडईचे पीक चांगले येते. त्याचप्रमाणे जमीन पाण्याचा निचरा होणारी आणि ओलावा टिकवून ठेवणारी असावी. पाणी साचून राहिल्यास करडईच्या पिकास अपाय होतो. थोड्याफार चोपण जमिनीतही हे पीक येऊ शकते.

पूर्वमशागत :

एक खोल नांगरट करून, त्यानंतर कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या द्याव्यात. खरीप हंगामात ६ x ६ मीटर अथवा १o x १o मीटर आकाराचे सपाट वाफे किंवा सरी करून घ्याव्यात. त्यात चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी ६.२५ टन (१२ ते १३ गाड्या) मिसळून पाळी द्यावी.

खतांच्या मात्रा :

हे रासायनिक खतास चांगला प्रतिसाद देणारे पीक असून, कोरडवाहू पिकास ५० किलो नत्र (११० किलो युरिया) आणि २५ किलो स्फुरद (१५६ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) प्रति हेक्टरी देणे आवश्यक आहे. काही प्रमाणात पाण्याची सोय असलेल्या पिकास ७५ किलो नत्र (१६३ किलो युरिया) व ३७.५० किलो स्फुरद (२३५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) प्रति हेक्टरी द्यावे.

सुधारित व संकरित वाण :

भीमा ,एस.एस.एफ. ६५८, एस.एस.एफ. ७०८, पी.बी.एन.एस.-४०, फुले चंद्रभागा (एस.एस.एफ.-७४८), पी. बी. एन. एस- १२.

बियाणे व बीजप्रक्रिया

पेरणीसाठी करडईचे १० किलो बी प्रती हेक्टरी वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे प्रक्रिया केल्यानंतर ॲझोटोबॅक्टर किंवा अॅझोस्पिरिलम २५ गॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया करावी. यामुळे हवेतील नत्राचे स्थिरीकरण होते. तसेच स्फुरद विरघळविणारे जिवाणू २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया केल्यास स्फुरदाचा उपलब्धता वाढते.

पेरणीचे अंतर :

दोन ओळीमधील अंतर ४५ सें.मी. आणि दोन रोपामधील अंतर २० सें.मी. ठेवावे.

विरळणी व आंतरमशागत :

करडई पीक जमिनीतील ओलाव्यावर वाढत असल्यामुळे पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी दोन जोमदार रोपातील अंतर २० सें.मी. ठेवून विरळणी करणे अत्यंत गरजेचे आहे. गरजेनुसार खुरपणी व कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. तसेच जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पेरणीपासून तिसऱ्या आठवड्यात फटीच्या कोळप्याने, दातेरी सायकल कोळप्याने कोळपणी करावी.

संरक्षित पाणी :

करडई हे पीक अवर्षण प्रतिकारक असल्यामुळे या पिकाच्या वाढीस पाणी कमी लागते. मध्यम ते भारी जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास करडईच्या पिकास पेरणीनंतर पाणी देण्याची गरज भासत नाही. पाणी देण्याची सोय असेल तर पेरणीनंतर ३५ ते ४० दिवसांनी किंवा जमिनीस फुलोऱ्यात येताना ५५ ते ६० दिवसांनी द्यावे.

अशा सुधारित तंत्राचा वापर केला असता मध्यम जमिनीत करडई पिकापासून प्रती हेक्टरी १२ ते १४ क्विंटल तर भारी जमिनीत हेक्टरी १४ ते १६ क्विंटल उत्पादन सहज मिळते. तसेच बागायती करडईपासून २० ते २२ क्विंटल प्रती हेक्टरी उत्पादन मिळते.

पेरणीचा कालावधी :

जिरायती करडईची पेरणी योग्यवेळी म्हणजेच सप्टेंबर अखेर ते ऑक्टोबरच्या पहिला पंधरवडा या काळातच करावी. बागायती करडईची पेरणी ऑक्टोबर अखेरपर्यंत करता येते. लवकर पेरणी (सप्टेंबरचा पहिला पंधरवडा) केल्यास पानावरील ठिपके या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढून नुकसान होते. उशिरा पेरणी केल्यास (ऑक्टोबराचा दुसरा पंधरवडा) पीक थंडीच्या काळात येते. या काळात माव्याचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट येते.

संजय बडे, ७८८८२९७८५९

साहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT