Safflower Pest : करडई पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन

Safflower Pest Control : सद्यःस्थितीत करडई पीक अंतिम फुलोरा अवस्था आणि बोंड अवस्थेत आहे. सततच्या बदलत्या वातावरणामुळे सध्या करडई पिकावर मावा व बोंड अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.
Safflower Pest : करडई पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन
Published on
Updated on

रवींद्र पालकर, डॉ. विजय भामरे

Safflower Pest Management : सद्यःस्थितीत करडई पीक अंतिम फुलोरा अवस्था आणि बोंड अवस्थेत आहे. सततच्या बदलत्या वातावरणामुळे सध्या करडई पिकावर मावा व बोंड अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

मावा
ओळख ः
किडीची पिल्ले लालसर तपकिरी तर प्रौढ काळ्या रंगाचे अर्धगोलाकार असतात.
- प्रौढांमध्ये पंख असलेले व पंख नसलेले असे दोन प्रकार असतात.
- प्रौढ मादी सुमारे एकावेळी सुमारे ३० पिलांना जन्म देते. पिलांची वाढ ७ ते ९ दिवसांत पूर्ण होते. जास्त प्रजनन क्षमता आणि एक पिढी पूर्ण होण्यासाठी लागणारा कमी वेळ यामुळे प्रादुर्भावानंतर किडीची तीव्रता झपाट्याने वाढते.

नुकसानीचे स्वरूप ः
- किडीची पिले व प्रौढ सोंडेद्वारे झाडाच्या शेंड्यावर, बोंडाच्या देठावर, कोवळ्या पानांच्या शिरांवर, पानांच्या मागील बाजूस तसेच खोड आणि फांदीवर बसून अन्नरस शोषतात. रसशोषण करताना गोड चिकट द्रव स्रवते. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. त्यामुळे झाडाच्या अन्ननिर्मिती प्रक्रियेत बाधा येते.
- अधिक प्रादुर्भावामध्ये फुले लागण्याआधीच झाडे वाळून जातात. परिणामी, झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात ५५ ते ८० टक्क्यांपर्यंत घट येते.

Safflower Pest : करडई पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन
Tur Pest Management : तूर पिकातील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

कीड नियंत्रण ः
- करडई पेरणीस उशीर झाल्यास प्रादुर्भाव वाढत जातो. त्यामुळे पेरणी वेळेत करावी.
- शेतातील किंवा बांधावरील हॉलीओक, चंदन बटवा गवत, तांदुळजा, दुधी, पाथरी व काचमांडा या पर्यायी यजमान तणे काढून टाकावीत.
- माव्यावर उपजीविका करणाऱ्या लेडी बर्ड भुंगेरे (ढाल किडे), क्रायसोपा, सिरफीड माशी यांचे रक्षण व संवर्धन करावे.

फवारणी (प्रतिलिटर पाणी) ः
- प्रादुर्भावाच्या सुरवातीला अझाडिरेक्टीन (१०, ००० पीपीएम) २ ते ३ मिलि.
- आर्थिक नुकसान पातळी ः २७ मावा प्रति ५ सेंमी
किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर,
- ॲसिफेट (७५ टक्के डब्ल्यूपी) १.५ ग्रॅम किंवा
- डायमिथोएट (३० टक्के ईसी) १.३ मिलि

Safflower Pest : करडई पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन
Safflower Pest : करडई पिकावर मावा, हरभऱ्यावर घाटेअळी

बोंड अळी
ओळख ः

- ही बहुभक्षी कीड असून हरभरा, कापूस, तंबाखू, सोयाबीन, मका व करडई या पिकांवर आढळते.
- किडीचा पतंग आकाराने मध्यम, फिक्कट पिवळा ते तपकिरी रंगाचा असतो. पुढील पंखावर काळे ठिपके तर मागील पंख फिक्कट रंगाचे असतात.

नुकसानीचे स्वरूप ः
- अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या कोवळी पाने खातात. मोठ्या अळ्या फुले, कोवळी बोंडे तसेच पक्व बोंडातील दाणेदेखील खातात.
- अर्धे शरीर बोंडामध्ये तर अर्धे शरीर बाहेर अशा वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने ही कीड नुकसान करते.
- साधारण १४ ते २० दिवसांत अळीची वाढ पूर्ण झाल्यानंतर जमिनीत कोषावस्थेत जाते. कोष अवस्था एक आठवडा ते एक महिन्यापर्यंत असू शकतो. अशा प्रकारे एका वर्षात बोंडअळीच्या ७ ते ८ पिढ्या पूर्ण होतात.

कीड नियंत्रण ः
- आंतर पिकांची लागवड करण्यासाठी किडीची यजमान नसलेली पिके निवडावीत.
- मोठ्या अळ्या दिसत असतील तर त्या वेचून नष्ट कराव्यात.
- शेतामध्ये हेक्टरी १० ते १२ पक्षी थांबे उभारावेत. लावावे.
- एकरी ५ ते ६ कामगंध सापळे लावावेत.
- मुख्य पिकाभोवती सापळा पीक म्हणून झेंडूची एक ओळ लावावी. जेणेकरून त्याकडे किडी आकर्षित होतील.
- कॅम्पोलेटिस क्लोरीडी या सारख्या परजीवी मित्रकीटकांचे संवर्धन करावे.

फवारणी (प्रतिलिटर पाणी) ः
- प्रादुर्भाव कमी असल्यास,
अझाडिरेक्टीन (१०, ००० पी.पी.एम.) २ ते ३ मिलि
- प्रभावी नियंत्रणासाठी एच. ए. एन.पी.व्ही. (५०० एल.ई.) या विषाणूजन्य कीटकनाशकाची १ मिलि प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.

(रासायनिक कीडनाशकांना लेबल क्लेम आहेत.)

- रवींद्र पालकर, ८८८८४०६५२२
(कृषी कीटकशास्त्र विभाग, डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती)
- डॉ. विजय भामरे, ८२७५२४५१००
(प्रमुख, कृषी कीटकशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com