Rural Story  Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Story : अधिकाचं वाण...

Sameer Gaikwad Article : पारूबाईच्या शेजारच्या चिरेबंदी वाड्याच्या पडवीतल्या लिंबाच्या झाडाआडून विष्णूअण्णांचा तरणाबांड गज्या केव्हाचा लपून बघत होता. अधूनमधून अनेक आठवणींची सय येताच सदऱ्याची बाही डोळ्याला लावत होता.

Team Agrowon

- समीर गायकवाड

Village Story : पारूबाईच्या शेजारच्या चिरेबंदी वाड्याच्या पडवीतल्या लिंबाच्या झाडाआडून विष्णूअण्णांचा तरणाबांड गज्या केव्हाचा लपून बघत होता. अधूनमधून अनेक आठवणींची सय येताच सदऱ्याची बाही डोळ्याला लावत होता. एकाएकी सुनंदेची नजर गज्यावर गेली. तिच्या काळजाचं पाणीपाणी झालं. अनेक आठवणींनी मनात कल्लोळ केला. तिच्या ओलेत्या पापण्या नजरेत साठवत लिंबाआडचा गजा सर्रकन मागे सरकला.

मागचे सहा महिने रोज पारूबाई आणि किस्ना आबा कामाचा खाडा न करता गुरासारखे राबत होते. बघणारा देखील हाय खायचा. या वयात ही दोघं इतकी कामून राबत्येत असा सवाल करायची.

किस्ना, पारूबाईच्या संसारावर दोनच फुलं आलेली. लग्नानंतर चौदा वर्षांनी तिची कूस उजवलेली. पहिल्या मुलाच्या पाठीवर म्हणजे सुनीलच्या जन्मानंतर दोन वर्षांनी सुनंदा झाली. उशिरा का होईना देवाने कृपा केली याचा त्यांना खूप आनंद होता. मिळालेल्या मीठभाकरीवर ते समाधानी होते. पण त्यांच्या आयुष्यात एक आक्रीत घडलं. विष्णूअण्णाच्या वस्तीवरल्या विहिरीवरची मोटर चालू करताना शॉक बसून बारा वर्षे वयाच्या सुनीलचा मृत्यू झाला. पारूबाई आणि किस्नाला हा आघात सहन होण्यासारखा नव्हता. त्यांनी विष्णूअण्णाची वस्ती सोडली, कामही सोडलं. अण्णाने धीर देऊनही त्यांचं मनच तिथं राहायला राजी नव्हतं. शेवटी अण्णाने आपल्या चिरेबंदी वाड्यालगतच्या मोकळ्या जागेत दोन खोल्यांचं खोपट बांधून दिलं. त्यांना मदत व्हावी, त्यांच्या पोटपाण्याचा खोळंबा होऊ नये हा अण्णाचा हेतू होता. ती दोघं यालाही राजी नव्हती. अण्णाने अनेकदा पैसाअडका देऊन पाहिला, पण त्यांनी त्यालाही हात लावला नाही. पोराच्या जिवाची किंमत लावल्यासारखं होईल असं त्यांना वाटे. इतके साल अण्णाने मनापासून सांभाळलंय तेव्हा त्याला दोष देण्यात काय अर्थ, या विचाराने ते गप्प बसत. अण्णाला वाईट वाटू नये म्हणून तिथे राहायचे. सुनील गेल्यापासून या जोडप्याच्या तोंडावरचं हास्य कायमचं मावळलं. ते देहानं सुनंदेबरोबर जगत असले, तरी मनानं मात्र दिवंगत मुलाच्या आठवणीत मागंच राहिलेले.

दुहेरी हाडाच्या बांध्याच्या सुनंदेला वयात आल्यावर कुणाच्याही नजरेत भरण्याजोगं देखणं रुपडं लाभलेलं. याच दरम्यान तिच्या आयुष्यात अशी घटना घडली, की तिला शोभून न दिसणाऱ्या महादेवाशी तिचं लग्न लावून दिलं गेलं. लग्नकार्य झटपट उरकलं गेलं. सुनंदेची, तिच्या आईबापाची घालमेल झाली. ती गेली आणि पारूबाईचे अंगण सुनंसुनं झालं, तर किस्नाच्या डोळ्यांत बारमाही पाणी दाटलेलं दिसू लागलं. त्यांचं आयुष्यच जणू थबकून गेलं होतं. गावाला याचं नवल वाटलं नाही, कारण त्यांच्यावर ओढवलेली वेळच तशी होती. काळ पुढे जाताच दोघं पुन्हा रोजच्या गतीला येतील असंच सगळ्यांना वाटायचं. पण एकाएकी भलतंच झालं. एक सांगावा काय घरात आला आणि त्यांचं आयुष्य पार बदलून गेलं. दोघं पहिल्यापेक्षा अधिक राबताना दिसू लागले. अशी काय गरज निपजली की त्यांनी रक्ताचं पाणी करायला सुरुवात केली, याचा काही केल्या सुगावा लागत नव्हता.

सुनंदाच्या लग्नाला दोन वर्षं झाली तरी ती माहेरी आली नाही, तेव्हा लोकांच्या मनात शंकेची पाल चाटून गेली. सुनंदेचा नवरा तिला माहेरी पाठवायला राजी नव्हता, तिला सासूरवास करायचा. एकाही सणाला पोरगी घरी न आल्याने ती दोघं कोमेजून गेली होती; तर तिकडे सुनंदा स्वतःच्या जिवाला खात होती. अखेर किस्नानं विष्णूअण्णाला सांगून मध्यस्थी केली, तेव्हा मामला मोकळा झाला. जावयाच्या हातावर तोळाभर सोन्याचे मणी द्यायचे ठरले. त्याची जुळणी होताच अधिक मासात बायकोला माहेरी पाठवून देतो असा निरोप आल्यावर पारूबाईचं काळीज आभाळाएवढं झालं.

अण्णांनी विचारून बघितलं, पण त्या दोघांनी अण्णाची मदत नम्रतेने नाकारली. दोघांनी दोन साल राबराबून एक बोरमाळ, एक जोड फुलं नि जोडवी आणली. मग कुठं पोरीला घेऊन जावई हजर झालेला. धोंड्याची जेवणं खावणं झाली. दुपार उलटताच जावई अधिकाचे वाण घेऊन गेला. मग जरा निवांत होत परसदारातल्या शेवग्याखाली सुनंदा पारूबाईला मिठी मारून बसली. आपल्या मायबापासाठी तिचं काळीज रडत होतं, पण टाहो न फोडता. कितीतरी वेळ किस्ना त्या दोघींकडे बघत उभा होता. नंतर हळूच धोतराच्या सोग्यानं डोळं पुसत ढेलजेतनं घराबाहेर पडला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर तृप्ती होती.

पारूबाईच्या शेजारच्या चिरेबंदी वाड्याच्या पडवीतल्या लिंबाच्या झाडाआडून विष्णूअण्णांचा तरणाबांड गज्या हे सारं केव्हाचा लपून बघत होता. अधूनमधून अनेक आठवणींची सय येताच सदऱ्याची बाही डोळ्याला लावत होता. एकाएकी सुनंदेची नजर गज्यावर गेली. तिच्या काळजाचं पाणीपाणी झालं. अनेक आठवणींनी मनात कल्लोळ केला. तिच्या ओलेत्या पापण्या नजरेत साठवत लिंबाआडचा गजा सर्रकन मागे सरकला. त्यानंतर दिवस खूपच मोठा होत गेला. दोन-तीन दिवस असंच घडत राहिलं. कुठल्या न कुठल्या घटिकेला त्या दोघांची नजरानजर होताच गज्या गायब व्हायचा. आता सुनंदेचा परतायचा दिवस उद्यावर आला होता. त्या रात्री तिचं चित्त जडपावलांनी भिरभिरत होतं. अख्खी रात्र ती जागीच होती. झोपेचं सोंग घेऊन पडलेल्या पारूबाईला आपल्या पोरीचं दुखणं कळत होतं. तोंडात पदराचा बोळा कोंबत ती अंतर्बाह्य घुसमटली होती. बघता बघता रात्र सरली, सूर्यनारायण दारावर आला. आईला कामात मदत करून झाल्यावर सुनंदेची सासरी परतण्यासाठीची तयारी सुरू झाली.

दरम्यान, तिची परसात सारखी ये-जा सुरू होती. चोरट्या भिरभिरत्या नजरेनं शेजारच्या वाड्यातल्या लिंबाकडे, परसदाराकडे, पडवीकडे तिचं ध्यान होतं. अखेर निराश होऊन देव्हाऱ्यापुढं डोकं ठेवून ती आईसंगं पांदीकडच्या वाटेला लागली. वाट जशी सरत गेली तशी तिची पावलं जड होत गेली. पदर नीटनेटका करण्याच्या निमित्ताने ती सारखी मागे वळून बघू लागली. किस्ना आबा मात्र मोठाल्या ढांगा टाकत पुढे निघून गेलेला.

उन्हाच्या काहिलीनं दोघी घामाघूम झाल्या होत्या. सारखं मागं वळून बघणाऱ्या सुनंदेच्या मनात काय चाललेय हे पारूबाईच्या लक्षात आले होते. अखेर हा ताण असह्य होऊन सुनंदेचा अश्रूंचा बांध फुटला. पारूबाईला आता मात्र राहवलं नाही. तिने पोरीला मिठीत घेतलं. तिचे डोळे पुसले. तिच्या गालावरून हलकेच हात फिरवत तिने सुनंदेला विचारलं, “तू गज्याला शोधायलीस ना?” सुनंदेने मान डोलावली. पुन्हा एक हुंदका बाहेर पडला. एक मोठा आवंढा गिळत पारूबाई शून्यात नजर खिळवत बोलती झाली, ‘‘आता गज्या तुला कदीच दिसणार न्हाई... गज्याला जाऊन दीड साल लोटलं !” हे ऐकताच सुनंदेच्या काळजाचा ठोका चुकला. आपल्या कानावर तिचा विश्‍वासच बसत नव्हता. एकाएकी तिच्या अंगातलं अवसान गळालं.

पारूबाई आवाजात जमेल तितका कोरडेपणा आणून बोलत होती, ‘‘तुझ्या सासरच्या लोकांना विष्णूअण्णांनी चार शब्द समजावून सांगितलं. त्यांचं मन ओळखलं; पण आपल्या पोराचं काळीज त्यांना ओळखता आलं नाही. तुझ्यापायी गज्या पार येडा झाला होता. त्यासाठी तुझं लग्न घाईत लावून दिलं. तुझा संसार नीट चालावा अशी अण्णांची इच्छा होती. पण ज्या दिवशी ते तुझ्या सासरी आले, त्याच दिवशी इकडं गज्याने वाड्यातल्या पडवीतल्या लिंबाला फास लावून घेतला. त्याच्या एका मासिकानंतर अण्णांनी कुटुंबाला सोबत घेऊन वाडा सोडला. ते रानात जाऊन राहू लागले. वाडा ओस पडला. आपला सुनील गेला तेव्हा आम्ही काही वाईट चिंतलं नव्हतं, पण अण्णांचा काहीही दोष नसताना नियतीने त्यांना शिक्षा दिली याचं आम्हाला फार वाईट वाटलं. त्यानंतर अण्णा पुन्हा गावात आले नाहीत. कुणाशी बोलले नाहीत. गावातली लोकं म्हणायची, की गज्याचं भूत झालंय. कदीमदी वाड्यात दिसतंय. पर आमाला तर कदी दिसलं न्हाई...” सुनंदा भ्रमिष्टागत ऐकत होती. जणू तिच्या कानात कुणी तरी तापलेलं शिसं ओतत होतं.

एसटीच्या हॉर्नच्या आवाजाने त्या दोघी भानावर आल्या. आईआबाच्या पाया पडून सुनंदा आत जाऊन बसली. तिचे लक्ष मात्र खिडकीतून दिसणाऱ्या निळ्या आकाशाकडे होते. ढगांच्या पुंजक्यातून गज्याचा रडवेला चेहरा धूसर होत होता. तिला रडू फुटलं. शेजारी बसलेल्या अनोळखी म्हातारी तिला जवळ ओढत म्हणाली, “गप गप पोरी. आपला बाईचा जलम लई वंगाळ बग. सासुरवाशिनीने लई रडू नये. आपल्या आईबाच्या जिवाला घोर लागतो!” तिच्या कुशीत तोंड लपवून सुनंदा आपलं दुःख हलकं करत होती आणि पाहता पाहता आभाळ निरभ्र होऊन गेलं.

त्या दिवसानंतर सुनंदा कोणत्याही अधिक मासात आपल्या माहेरी आली नाही आणि इकडं गावातही पुन्हा कधी कुणालाही गज्या दिसला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT