Rural Story Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Story : अनोख्या माहेरओढीचा संतोषगिरी...

Article by Jayant Khade : संतोषगिरीवर सगळ्या गावाची अपार श्रद्धा आहे. पूर्वी एकदा दुष्काळ पडला आणि पाऊस थांबल्याने सर्व गाव हवालदिल झाला. गावाच्या दह्याबाचा भक्त बंडुदेवाने डोंगरावर पावसाचा धावा केला. दहा दिवस अन्न-पाणी त्याग करून त्याने कठोर तपश्‍चर्या केली आणि वरुण राजा द्रवला. मोठा पाऊस पडला आणि सगळ्या गावाने वाजवत मिरवणुकीने बंडुदेवाला खाली आणला.

Team Agrowon

जयंत खाडे

Village Story : कृष्णेच्या खोऱ्यात वसलेला आमचा गाव नदीकाठापासून पाच-सहा मैलाच्या अंतरावरचा. मध्यम किंवा कमी पर्जन्यमान असलेल्या आमच्या गावात माझ्या लहानपणी तसे पाण्याचं दुर्भिक्षच होते.

गावाच्या उशाला दुष्काळात खोदलेले तळे परतीच्या पावसात भरायचे व मार्गशीर्ष संपला की आटून जायचे. तळे आटले की गावातले सार्वजनिक पाणवठे तळाला जायचे. एखाद्या नदीकाठच्या पाहुण्याकडे गेलो, की बंधाऱ्यात अडवलेले कृष्णचे नितळ पाणी पाहून माझ्या गावाची मला खूप चीड यायची.

माझ्या आजोळी एक सिंचनाचा पाट होता तसा निदान एखादा पाट तरी आपल्या गावाला असावा असे स्वप्न मी जागेपणी पाहायचो. अशा या कोरड्या गावाच्या पश्‍चिमेला संतोषगिरीचा डोंगर आहे. पाणी नसल्याने चीड आणणाऱ्या या गावाचा संतोषगिरी पुढे आपल्यासाठी विलक्षण माहेरओढीचा होऊन बसणार आहे हे लहानपणी जाणवले नाही.

या डोंगराच्या रांगा बावची, पोखरणी, गोठखिंडीपर्यंत पसरलेल्या. दोन्ही डोंगराच्या खोऱ्यामध्ये कसण्याकरिता तयार केलेल्या रानाला ‘खोरी’ म्हणायचे. आमची वडिलोपार्जित शेतजमीन खोरीला आहे.

माझे आजोबा व त्यांचे भाऊ या खोरीला त्यांच्या आईसोबत वस्ती करून राहायचे आणि उशाला हा संतोषगिरी! पुढे आजोबांनी नवीन मळा खरेदी केला आणि आमची भावकी गावात, मळ्यात राहायला गेली.

लहानपणी खोरीला कोरडवाहू पिके व्हायची. खरिपात भुईमूग, बाजरी तर पाऊस बरा पडला की शाळू पेरला जायचा. सुट्टीत जमिनीच्या मेहनती, मळणी, काढणीसाठी खोरीला जाणे व्हायचे. दोन्ही अंगाला छोटे पाझर तलाव आणि मागे डोंगर पसरलेला. डोंगराच्या पायथ्याला ओढ्याच्या कडेने सीताफळी, करंज, आंबा, जांभूळ आणि बोरं, करवंदाच्या जाळ्या असायच्या. पोरं बोरं, करवंदं, करंज्या, सीताफळी तोडून विकायची आणि शाळेच्या खर्चाची बेजमी व्हायची.

संतोषगिरीवर सगळ्या गावाची अपार श्रद्धा आहे. पूर्वी एकदा दुष्काळ पडला आणि पाऊस थांबल्याने सर्व गाव हवालदिल झाला. गावाच्या दह्याबाचा भक्त बंडुदेवाने डोंगरावर पावसाचा धावा केला. दहा दिवस अन्न-पाणी त्याग करून त्याने कठोर तपश्‍चर्या केली आणि वरूण राजा द्रवला. मोठा पाऊस पडला आणि सगळ्या गावाने वाजवत मिरवणुकीने बंडुदेवाला खाली आणला.

लहानपणापासून या डोंगरात घरच्या वडीलधाऱ्यांबरोबर अथवा मुलांच्या बरोबर मी फिरायचो. डोंगरावर देवाच्या दर्शनाला जायचं, दसऱ्याच्या दरम्यान होणाऱ्या यात्रेला जायचं. सगळा गाव या बोडक्या डोंगराच्या आणि त्यावरील देवाच्या ओढीनं बांधलेला. पुढे शिक्षण व नोकरीमुळे ही भटकंती कमी झाली पण आतड्याची ओढ स्वस्त बसवेना.

खोरीच्या वस्तीला एक घर बांधलं आणि शनिवार, रविवार वस्तीवर मुक्काम पडायला लागला. आमचे थोरले चुलते- अण्णा- त्यांच्या नव्वदीत पण अनवाणी डोंगरावर जायचे. त्यांना घरचे सगळे रागवायचे पण ते ऐकायचे नाहीत. पुढे हीच चंद्रओढ आम्हा सगळ्याकडे आली आणि वेळ मिळेल तसे रविवारी, अमावस्येला, सणासुदीला डोंगरावर दर्शनासाठी जाणे सर्वांचे सुरू झाले.

डोंगरावर वन खात्याने ग्लिरिसिडीया (उंदीरमारी), पिंपळ, गुलमोहर, लिंब, उंबर यासारखी झाडे लावली आहेत, तर बांबू, बारतोंडी, पांगरा, पळस, शिरिषाची पण तुरळक झाडं डोंगरात आहेत. बऱ्याच ठिकाणी करवंदाच्या जाळ्या पसरलेल्या आहेत. घाणेरीच्या झुडपातून चंदनाचे झाड पण उगवते आणि जरा खोड मोठे झाले की लक्ष ठेवून काही लोक हे तोडून नेतात.

डोंगराच्या माथ्याजवळ फक्त करवंदाच्या जाळ्या आणि थोडीफार मेडशिंगीची झाडं आहेत. मेढशिंगीची पांढरी शुभ्र, तंतुमय फुलं ऐन उन्हाळ्यात फुलतात व ती सुवासिक पण असतात. बोडक्या डोंगराची मेढशिंगी शोभा वाढवितात. डोंगराच्या माथ्यावर मात्र विस्तीर्ण पठार आहे व त्याचा मध्यावर एका डेरेदार पिंपळाखाली देवाचे मंदिर आहे.

पायथ्याशी ओढ्याच्या कडेने आजही सीताफळी, आंबा, जांभूळ, चिंच, करंज आहेत. खरंतर डोंगरावर पावसाळ्यात अत्यंत कमी पाऊस पडतो पण परतीचा पाऊस मात्र चांगलाच डोंगर झोडपून काढतो. आणि या एवढ्या पावसाच्या आधारावर ही सगळी झाडे पुढचे आठ-नऊ महिने विनातक्रार तगून राहतात. डोंगरात ससे, साळींदर, कोल्हे, माकडांचा अधिवास आहे. मोर आणि लांडोर तर सर्रास डोंगरातून ऑफिसच्या वेळेत निघावे तसे खाली येतात, सगळ्या शिवारात फिरतात, पोटभर मिळेल ते खातात आणि परत माघारी जातात.

गाई, म्हैस डोंगरात चरायला आली किंवा रानात नांगर, रुटर मारला की पांढरे शुभ्र बगळ्यांचे थवे जमा होतात पण नंतर कुठे गायब होतात हे समजत नाही. शिवारातील विहिरीमध्ये पारवे वस्ती करतात आणि विहिरीच्या जईवर उगवलेल्या झाडावर सुगरणी घरटी बांधतात.

विहिरीच्या कपारीत राहणाऱ्या आणि तेथेच अंडी घालुन पैदास करणाऱ्या पारव्यांना सुबक, देखणे, सुरक्षित घरटी बांधणाऱ्या सुगरणीचा हेवा तरी वाटतो का? बिचाऱ्यांची कितीतरी अंडी, पिले पाण्यातले साप खात असतात. पायथ्याच्या झाडावर बुलबुल, वेडे राघू, दयाळ, होले, तितर, सातभाई यांचे जथ्थे असतात. तर कधी तांबट, धनेश, भारद्वाज यांचे डोंगरात अलभ्य दर्शन होते. कधी कधी विद्युत तारावर बसून पावश्या त्याचा खास सुरातील आवाज काढताना दिसतो.

पावसाळ्यानंतर युरोपातून खास पाहुणे म्हणून भोरड्यांचे आगमन होते आणि त्यांचे थवेच्या थवे तलावाच्या काठावरील जांभळावर किंवा लिंबावर मुक्काम करतात. भर दुपारी त्यांची मोठी शाळा भरते. शिवारातील शाळू या भोरड्या फस्त करतात, कोणी शाळू राखत बसत नाहीत. एप्रिलमध्ये ऊन तापायला लागले की परतीच्या मोठ्या प्रवासाला निघतात. एवढ्या सातासमुद्रापार हजारो मैलाचा प्रवास करून येणाऱ्या या जिवांना खरंच या डोंगराची इतकी का ओढ आहे हे समजत नाही. एप्रिलमध्ये या भोरड्या परत गेल्या की शांत दुपारी त्यांची आठवण येते. मग हळूहळू विचार येतो, की परत गेलेल्या भोरड्या आपल्या गावी

हा परिसर, इथला अधिवास याबद्दल काय सांगत असतील?

डोंगरावर दर रविवारी देवाला जायचा माझाही क्रम काही अपवाद वगळता चुकत नाही. या रविवारी मी दिवस बुडायला जाताना वरती निघालो. पहिला टेंगूळ चढून मधल्या पायवाटेने चालताना उंबरटाक्याच्या बाजूला भडक लाल रंगाची फुले आलेले ठेंगणे झाड दिसले. ते लांबूनच जास्वंदाच्या झुडपासारखे वाटले. पण मग एकदम आठवले, अरे, हा तर शाल्मली! मी पटकन झाडाकडे उतरायला लागलो. जरा कठीण उतारावर, घाणेरीच्या व करवंदाच्या झुडपातून शाल्मली उभा होता. त्याच्या सोबतच चंदन उगवून आलेले.

अत्यंत आकर्षक फुले आणि तितकेच लाघवी नाव असलेला हा वृक्ष मला अक्षरशः वेड लावतो. कोल्हापूरमध्ये नोकरी करत असताना गगनबावडा अथवा चांदोली धरणाकडे जाताना पळस, पांगारा, शाल्मली आढळतात आणि मी थांबून या झाडांना मनसोक्त न्याहाळायचो. खरे तर इतका प्रचंड ओढीचा वृक्ष आपल्या डोंगरात सापडावा या इतकं मोठा भाग्ययोग नाही.

शाल्मलीच्या मुळ्या खोल पातळात वाढतात तर आभाळात पर्णहीन फांद्या फोफावतात. वसंत ऋतूमध्ये या पर्णहीन शाल्मलीला कळ्या येतात आणि त्या वेड्यासारख्या फुलतात. निष्पर्ण सांगाड्यावर नक्षत्रासारखी तेजस्वी फुले फुललेल्या शाल्मलीकडे खूप पक्षी आकर्षित होतात. वेडे राघू एका ओळीत शाल्मलीच्या निष्पर्ण फांदीवर बसले की दुरुन या फांद्याना पाने फुटल्यासारखे वाटते.

आकर्षक फुलांनी भरलेला पण निष्पर्ण शाल्मली वृक्षावर पौराणिक कथा नाही असे होणारच नाही. हिमालय पर्वतावर उभा राहिलेल्या अत्यंत आकर्षक शाल्मली वृक्षाला नारद मुनींनी एकदा विचारले, ‘‘तुला वायू माहीत आहे का?’’

शाल्मली म्हणाला, ‘‘नाही.’’

शाल्मलीचा हा अहंकार नारदाला खटकला आणि त्याने हे वायूला सांगितले. संतापलेल्या वायूने शाल्मलीला जाब विचारला. ‘‘तू माझे नावही ऐकले नाहीस? मी तुला चांगलाच धडा शिकवला असता, पण प्रजापतीने सृष्टी निर्माण करताना तुझ्या मुळांमध्ये विसावा घेतला होता म्हणून मी थांबतो. अजूनही वेळ गेलेली नाही, तू तुझी चूक मान्य कर.’’

पण शाल्मलीने वाऱ्याचा उपहास केला आणि वाऱ्याने आपल्या सामर्थ्य व शक्तीचा प्रत्यय दाखविण्याचा निश्‍चय केला. रात्री शाल्मली घाबरला. त्याला झोप लागेना, चूक लक्षात आली, पश्‍चाताप होऊ लागला. वेळ निघून गेलेली होती, पण बुद्धी शाबूत होती. मग शाल्मलीने आपल्या सर्व फांद्या, शाखा, पाने गाळून टाकली आणि वायूपुढे उभा राहिला.

त्याचे विदीर्ण रूप पाहून वारा म्हणाला, ‘‘अरे शाल्मली, पराभव पराभव म्हणतात तो आणखी कसला असतो? नुसत्या माझ्या भीतीने तू तुझे सौंदर्य स्वतःच्या हाताने उद्‍ध्वस्त केलेस?’’ (संदर्भ : रानवाटा, मारुती चितमपल्ली) सगळ्या संतोषगिरीच्या डोंगरात हा एकच शाल्मली चंदनाच्या साथीनं केवळ माझ्यासाठी कित्येकांची नजर चुकवून अडचणीच्या जागी उभा होता, तो मला आज सापडला.

असेच एकदा श्रावणात संतोषगिरीवर दुपारी दर्शनाला निघालो होतो आणि शेवटच्या चढाला एक म्हातारी बसलेली दिसली. दुरूनच म्हातारी अगदी उतार वयाची जाणवत होती. जवळ पोहचलो तर गौरवर्णीय, उंचीपुरी, अनवाणी पाय, अंगावरच्या सुरकुत्या व कृश झालेल्या चेहऱ्यावरून निदान नव्वदीपर्यंत पोहोचलेल्या म्हातारीस, ‘‘आज्जी, थकला काय?’’ म्हणून हटकले. म्हातारी बहिरी होती. वारा पण जोरात वाहत होता. तिने माझ्याकडे जवळची पिशवी दिली आणि ती माझ्या बरोबर चालू लागली.

म्हातारी माझ्या बरोबर विनासायास माथ्यावर आली आणि देवळात विसावली. जरा दम खाऊन झाल्यावर कळले, की ती पिसाळ वस्तीवरून खाली उंबरटाक्याला डोहात अंघोळ करून वर दर्शनाला आली होती. आमच्या घराशी तिचे जुने संबंध आहेत, पण माझी ओळख पहिल्यांदाच झाली. सुदैवाने तिचे माहेर पण बावचीच असल्याने सगळे शिवार तिला परिचित आहे. म्हातारीने जरासा विसावा घेऊन मंदिराचा गाभारा झाडून काढला.

देवाला पाणी घातले, पूजा केली. मोठ्याने पण काही अस्पष्ट बडबड पण देवासोबत केली. मला नारळ वाढवायला सांगितले. प्रसाद देवाला ठेवून आम्हाला वाटला. बाजूच्या पीरबाबाच्या समाधीचे दर्शन घेऊन आली. पिशवीतून शेंगा आमच्या पुढे टाकल्या आणि काहीबाही सांगत बसली. म्हातारीनं अष्टमीचा उपास धरला होता, काही न खातापिता ती वर आली होती. परत जाताना खाली लक्ष्मीला जाऊन तिला परतायचे होते. वस्तीपर्यंतचे अंतर किमान साडेतीन किलोमीटर होते. मला कळेना आता ही कशी जाईल आणि कधी पोहोचेल?

डोंगर उतरायला सुरुवात केली आणि म्हातारी अनवाणी, काठी घेऊन, जपून पण न धडपडता, डोक्यावरचा पदर किंचितही न ढळू देता एकदम तब्ब्येतीत डोंगर उतरायला लागली. एखाद्या अवघड उतारावर हात पुढे केला तर त्याला स्पष्ट नकार देत तिने आम्हालाच जपून चालायची सूचना केली. उताराला काठी टेकत आणि सपाट रस्त्यावर झोकात हात मागे बांधून म्हातारी डोंगर उतरली. तिच्या शरीरावर वृद्धत्व स्पष्टपणे पसरले होते. कानांनी काम करणे जवळपास थांबवले होते, पण मन मात्र बिलकुल थकले नव्हते. तिची बडबड थोडीशी असंबद्ध असली तरी मला मात्र ऐकू येत होती

एकाच या जन्मीं जणू

फिरुनी नवी जन्मेन मी

स्वप्नाप्रमाणे भासेल सारे

जातील साऱ्या लयाला व्यथा

भंवतीं सुखाचे स्वर्गीय वारे

नाही उदासी ना आर्तता

ना बंधने वा नाही गुलामी

भीती अनामी विसरेन मी

हरवेन मी, हरपेन मी

तरीही मला लाभेन मी...

: ९४२१२९९७७९

(लेखक जलसंपदा विभागात कार्यकारी अभियंता आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT