Rural Story : उधाण

Article by Samir Gaikwad : सकाळची वेळ सरत आली होती. दादासाहेबाचा जीव कासावीस झाला होता. उन्हं कपाळावर तिरपी कलंडत होती आणि दादासाहेबाचे पाय पावलागणिक ढेकळात घसरत होते. घसा खाकरत तो पुढे निघाला. नकळत विहिरीजवळ पोहोचला.
Rural Story
Rural StoryAgrowon
Published on
Updated on

Rural Story : दादासाहेब हाताची तिप्पड घालून मुकाट विहिरीकडे बघत राहिला. दुष्काळामुळे विहिरीची रया गेली होती. गाळही सुकला होता. खालच्या सांदीतल्या झऱ्याजवळचं शेवाळ एकदम कोरडंठाक झालं होतं. मागच्या दोन-तीन वर्षांत पावसानं हात आखडता घेतल्यावरही असं दृश्य दिसलं नव्हतं. गाळ दृष्टीस पडला तरी त्यात ओल असायची. दादासाहेबाला तसं खुळ्यागत बसलेलं बघून त्याच्या मागोमाग आलेल्या सुखदेवनानाच्या पोटात कालवलं.

सुखदेव काशिनाथ अनभुले, सत्तरी गाठलेला कष्टकरी जीव. आता पन्नाशी गाठलेल्या दादासाहेबाचे आजोबा असलेल्या आबासाहेब भोसलेंकडं तो आपल्या बापासह बालवयापासूनच राबत होता. त्याचं कोवळं वय पाहून आबांनी त्याला किरकोळ कामंच दिली. तरीही त्यांची नजर चुकवून सुखदेव सगळी कामं शिकला. त्या शिवारातल्या कणाकणावर त्याचा जीव जडला होता. कालांतरानं त्याचं लग्न झालं, पोरंबाळं झाली. ती मोठी होऊन रांगेस लागली. त्यांना थोडंफार अक्षरवळण लागलं. त्याच्या जोरावर त्यांनी कामं मिळवली. सुखदेवाला नातवंडं झाली तरी इथल्या मातीतलं राबणं थांबलं नव्हतं.

आबांना चार मुलं होती. त्यांच्या मागं त्यांनी खातेफोड करून घेतली. ज्याचं त्याचं रान ‘वायलं’ झालं. आबांची तिसरी पिढी रानात आली तशी विचारात तफावत वाढू लागली. पीकपाण्यावरून वाद होऊ लागले, गुरं चारण्यावरून, बांध टोकरण्यावरून मनं कलुषित होऊ लागली. सुखदेव या सगळ्यांकडंच काम करत असल्याने त्याच्यावर चहाड्या लावण्याचा आळ आला तेव्हा खरं तर त्याला गहिवरून आलं होतं. तेव्हा तरण्या दादासाहेबानं सुखदेवाला कवेत घेतलं. त्याच्या मनातलं मळभ दूर केलं.

दादासाहेब हा आबांच्या थोरल्या मुलाचा एकुलता एक मुलगा, आबांचा सर्वांत थोरला नातू. सुखदेवापेक्षा वीसेक वर्षांनं लहान. त्याच्या वाट्याला आलेलं वडिलोपार्जित शेत त्यानं जोमानं कसलं होतं. रक्ताचा घाम गाळताना त्यानं सुखदेवाला बापासारखं मानलं होतं. अंगमेहनतीची कामं त्याला कधीही लावली नव्हती. सुखदेवाचं बालपण, तारुण्य आणि आता वार्धक्य सगळं आपल्या शिवारात गेलंय; आता त्याच्या घरचे त्याला अडवतात तरीही त्याचे पाय आपल्या शेताकडेच ओढतात, इथल्या मातीची त्याला ओढ आहे हे दादासाहेब जाणून होता. त्याला ताण पडू नये म्हणून त्याने एक सालगडी ठेवला होता आणि मेहनतीची कामे त्यालाच लावायचा.

Rural Story
Rural Story : बाभूळकाटा

बापानंतर, आज्ज्यानंतर शेती टिकवणाऱ्या दादासाहेबाची पोरं आता हाताशी आली होती. त्यांना शिकून मोठं व्हायचं होतं. काळ्या रानात झिजत जगायचं नव्हतं. बराच काळ सगळं नीट चाललं होतं. पण मागच्या पाचेक वर्षांपासून शेताची घडी विस्कटली होती. गावात उताराच्या दिशेनं पाझर तलाव झाल्यावर भोसल्यांच्या विहिरी एकेक करून आटत गेल्या, कितीही खोल बोअर मारलं तरीही पाणी लागेनासं झालं. सुरुवातीला टँकरने पाणी आणून पाहिलं पण उलटं नुकसान झालं. मोठ्या कष्टाने पीक हाती आलं पण नशिबाने इथेही साथ दिली नाही, पिकांचे भाव पडले. दुसऱ्या वर्षी रोगराई झाली, तिसऱ्या वर्षी पाणीच मिळालं नाही.

मागल्या साली पाणी देऊनही बागा नीट फुलल्या नाहीत. यंदा सगळे प्रयत्न पुन्हा एकदा करून झाले होते. पण उन्हाचा माराच इतका तीव्र होता की दिलेलं पाणी जमीन घटाघटा पिऊन टाकायची. चौबाजूनं खांदलेले चर कोरडे पडले, शेततळं सुकलं, ओढेनाले तर दोन वर्षांपासून कोरडे पडलेले. गतसालीच त्यानं गुरांना बाजार दाखवला. काळजावर ओझं लई होऊ नये म्हणून एक बैलजोडी तेवढी मागं ठेवली होती. पाणी आटल्यावर द्राक्षाचा बाग मोडून काढला, तुरीवरनं नांगर फिरवला, एकेक करून त्यानं सगळं रान यंदा मोकळं केलं होतं. जिकडं नजर जाईल तिकडं मातीची सुकलेली ढेकळंच दिसू लागली होती. मागच्या आठवड्यात त्यानं मुक्या जिवाचा शाप नको म्हणून मोठ्या हिकमतीने जिवापाड जपलेली बैलजोडी देखील दुसऱ्या कष्टकऱ्याला देऊन टाकली.

एप्रिलमध्ये सालगड्याचा करार संपला तेव्हा दादासाहेबानं त्याला गावाकडं परत पाठवलं. तेव्हाही सुखदेवाच्या काळजात कालवाकालव झालेली. एकेकाळी जिथं उसाचं जंगी गुऱ्हाळ चाललं होतं, अख्खं गाव रसाच्या काहिल्या बघायला गोळा झालं होतं तिथं आता कढई देखील चुलीवर चढत नव्हती. ज्या रानात सोन्याची कणसं तटतटली होती तिथं गाजर गवतसुद्धा वाळून गेलं होतं. जिथल्या सावलीत बसून खंडीभर शेतमजूर दुपारची भाकरी सोडत तिथं आता माणसाशी बोलायला एक जित्राबसुद्धा नव्हतं. जिथलं खळं सरता सरत नव्हतं तिथं आता पसाभर धान्य पिकत नव्हतं. गोठ्यात जनावर नाही, कणगीत धान्याचा दाणा नाही, रानात हिरवा कोंब नाही आणि डोक्यात मात्र शेकडो बोंड अळ्या वळवळताहेत ही गोष्ट सुखदेवास छळायची. आपला धनी गुडघ्यात तोंड खुपसून बसतो याचं त्याला वैषम्य होतं.

खरं तर आज दादासाहेब मनाचा हिय्या करून आलेला. “काहीही झालं तरी रानात पुन्हा पाय टाकायचा नाही, सुखदेवासही बजावून सांगायचं की, नाना आता पुरं झालं, या मातीचे लाड! आता थांबलंच पाहिजे. कितींदी पदर जाळायचा ?” त्याच्या मनात खूप काही होतं पण ओठावर येत नव्हतं. तितकी हिंमत त्याच्यात नव्हती. त्यामुळंच आता सुखदेव पाठोपाठ आला तर त्याचा रागच आलेला. “काय गरज काय आहे या म्हाताऱ्याला? बसावं ना आपलं घरी. वेळ जात नसंल तर रामकृष्णहरी जप करावा. पण इथं कशाला यायचं? खरं तर त्याच्यामुळंच आपण पुन्हापुन्हा इथं येतोय. आता मात्र यायचं नाही." मनाशी विचार करून दादासाहेब उठला.

Rural Story
Rural Story : मनाची स्वगते : सारे प्रवासी घडीचे

दादासाहेब दरादरा ढांगा टाकत वस्तीसमोरच्या लिंबाखाली बाजेवर जाऊन बसला. चुंबकानं ओढल्यागत सुखदेव धापा टाकत त्याच्या मागोमाग तिथंही आला. तेव्हा काहीशा त्राग्यानं, सुखदेवाची नजर चुकवत दादासाहेब एका दमात बोलला, ‘‘नाना आता उद्यापासनं घरीच थांबायचं. इकडं फिरकायचं नाही. मी पण येणार नाही, तुम्हीही यायचं नाही. तुमचा हिशोब केलाय उद्या घरी येऊन पैसे चुकते करतो. मोरव्याचा गणू कालपरवा तोडलेली चिलारी सकाळच्याला आपल्या वहीवाटंच्या रस्त्यावर टाकून देईल, रानात गुरं ढोरं, चोरचिलटं शिरणार नाहीत.’’ त्याची निर्वाणीची भाषा सुखदेवाला दंश करत होती.

धन्याच्या निरवानिरवीच्या भाषेनं त्याच्या काळजाला पीळ पडला. हाताची घडी आवळून तो लिंबाच्या बुंध्याजवळ बसून राहिला. दोघंही एकही शब्द न बोलता दिवस मावळेपर्यंत तिथं बसून होते. अखेर दादासाहेबानंच शांतताभंग केली. सुखदेवाला गाडीवर सोबत घरी जाण्यासाठी आग्रह केला; पण म्हातारा बधला नाही. “तुम्ही गाडीवर पुढं जावा, मी चालतच येतो. गाडीवर हादरे बसतील. बाकी उद्याचं तुम्ही म्हणताय तसं होईल.” हादऱ्याचं निमित्त करून सोबत त्यानं यायचं टाळलेलं दादासाहेबानं ओळखलं. लिंबाच्या फांदीला खोचलेली डब्याची पिशवी दादासाहेबानं गाडीला अडकवली. सुखदेवाशी आपण असं रुक्ष बोलायला नको होतं असा विचार घोळवत तो निघाला.

पायवाट संपून गाडीवाट लागली तसं गाडीच्या हँडलजवळून खडखडाट ऐकू येऊ लागला. त्यानं गाडी थांबवली तसं त्याच्या लक्षात आलं की त्यानं चुकून सुखदेवाची पिशवी आणलीय आणि त्या पिशवीतली वस्तू हँडलमध्ये अडकून वाजतेय. कुतुहलाने त्यानं पिशवी उघडून पाहिली. डोळ्यात टचकन पाणी आलं. लहान मुलांच्या खेळातली लाकडी बैलजोडी त्यात होती. बैलजोडी विकल्यापासून सुखदेव ही पिशवी आणत होता. त्या दिवसापासून तो शेतात जेवत नव्हता. तो सारखा गोठ्यात का जायचा हे दादासाहेबाला आता उमगलं होतं. फार वाईट वाटलं त्याला. पिशवी परत देऊन त्यांची माफी मागून गोडीगुलाबीनं त्यांचं मन वळवू असा विचार करून त्यानं ताबडतोब गाडी माघारी फिरवली.

एव्हाना वाऱ्याने दिशा बदलली होती. मातीचे लोट उठले होते. वावटळींना जोर आला होता. दादासाहेब गेल्यानंतर सुखदेव विहिरीच्या कड्यापाशी समाधी लावून बसला होता. त्याचा मागोवा घेत दादासाहेब तिथं आला. पिशवीतली बैलजोडी काढून त्यानं सुखदेवाच्या चेहऱ्यापुढं धरली. त्यानं सुखदेव भानावर आला. त्याचे डोळे आसवले, पुसटसे स्मितही त्याच्या चेहऱ्यावर उमटले. त्याची ती भावूक अवस्था पाहून दादासाहेबाला राहवलं नाही.

पुढं होत सुखदेवाला मिठीत घेतलं. आपल्या स्वर्गस्थ पित्यास आलिंगन देतो आहोत असंच त्याला वाटत होतं. सुखदेवाच्या डोळ्यातला अश्रूंचा बांध फुटून दादासाहेबाचा खांदा ओला होताच मेघांचाही अबोला संपला. एकाएकी भरून आलेले मेघ त्या दृश्यानं गहिवरले. निमिषार्धात वळवाचा पाऊस ताडताड बरसू लागला. कावरीबावरी झालेली झाडंही अश्रूंच्या त्या उत्सवात सामील झाली आणि तापलेल्या मातीला मायेचं उधाण आलं.

: ८३८०९७३९७७ (लेखक प्रसिद्ध साहित्यिक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com