Rural Story : अंतःकरणातला राम...

Article by Samir Gaikwad : आता देवळाजवळ काही जुनीजाणती सागवानी माणसं नक्षीदार गप्पा मारत बसलेली असतात. गप्पांचा बहर ओसरल्यावर तिथल्या लिंब-पिंपळाची गळणारी पानं एकटक निरखीत राहतात. गावात रामनवमी, हनुमान जयंती दणक्यात होते, पण एरवी मनोभावे नमस्कार करणारी आणि कानशिलं धरून पुटपुटणारी माणसं आता कमी झालीत.
Rural Story
Rural StoryAgrowon

समीर गायकवाड

वेशीच्या तोंडावर असलेल्या मारुतीच्या मंदिरात पूर्वी उनाड पोरे खेळत असायची. मंदिर म्हणजे अजस्त्र आकाराचं भव्यदिव्य असं काही नव्हतं. साधंसुधं दगडी बांधकाम होतं. गावातल्या माणसांगत आडमाप आकाराचे धोंडे कुण्या गवंड्याने एका चळतीत रचलेले. म्हाताऱ्या कोताऱ्यांच्या काळजाच्या खपल्या निघाव्यात तशा जागोजाग कोपच्या उडालेल्या. त्यातला चुना बाहेर डोकावणारा. एखादा चिरा कललेला. मध्येच एखादी देवळी. दिव्याच्या काजळीने काळी झालेली. दगडी भिंतीवरही काळी वर्तुळं उमटलेली.

मंदिराची देखभाल करणाऱ्या रामा गुरवाच्या डोळ्याखालीही अशीच काळी वर्तुळं होती. मंदिरातल्या कणाकणावर प्रेम करणारा, कंबरेत वाकलेला रामा गुरव. झुपकेदार मिशा, राठ काळे ओठ, मोठाले डोळे, लोंबायला झालेल्या कानाच्या जाडसर पाळीत भिकबाळी, गळ्यात कसल्याशा पांढऱ्या तांबड्या मण्यांची माळ, हातात तांब्याचं भलंमोठं जाडजूड कडं, ताटलीएवढा हाताचा पंजा, कडक खर्जातला आवाज असं त्याचं रूपडं. गाऊ लागल्यावर मात्र त्याच्या आवाजातली एरवीची कर्कशता लुप्त होऊन त्याऐवजी अनोखी मृदूता जाणवे.

सकाळी पूजाअर्चा आटोपली, की घरी जाऊन पोटपाणी करून आलेला रामा संध्याकाळची दिवाबत्ती करेपर्यंत देवळात ‘पडून’ राही. एका अंगावर झोपलेला, पोट पुढे आलेला उघडाबंब रामा मंदिरात दिसला नाही असा दिवस गावाने पाहिला नव्हता. रामाचे वडील औदुअण्णा त्याच्या लहानपणीच वारलेले. बारमाही देवळात असणारा गावातला हा एकमेव इसम. गावात येताना वेशीनजीक ‘एष्टी’तून उतरलेला माणूस आधी वेशीवरच्या देवळासमोर येई. कोणी हात जोडून उभा राही, काहीबाही पुटपुटे, काही जण गालात देखील मारून घेत, तर कुणी कानाच्या पाळ्या पकडून माफीच्या आविर्भावाने काहीतरी मागत.

त्या वेळी रामाच्या चेहऱ्यावरचे भाव विलक्षण तृप्ततेचे असत. देवाला नमस्कार करताना त्याच्याकडे कुणी पाहत नसलं तरी तो आशीर्वादासाठी हात वर करे. गावकऱ्यांना हवे ते वरदान देण्यासाठी हात वर करणाऱ्या रामाला मूलबाळ झालेलं नव्हतं. पन्नाशीत गेला होता तो. येळवक्तावर त्याला पोरंबाळं झाली असती तर इदुळा खंडीभर नातवंडं त्याच्या मांडीवर खेळत असती. त्याला पोर नसलं तरी गावातल्या साऱ्या पोराबाळांवर त्याचा विलक्षण जीव होता.

एका रखरखीत उन्हाळ्यातल्या दिवशी गावातल्या बोबड्या केशवच्या घरी आलेल्या पाहुण्यांचं गोजिरवाणं गोरं गोमटं पोर चुकून देवळात आलेलं. दुपारी ते रामाच्या कुशीत झोपलेलं. त्याच्या फाटक्या चवाळ्याची उब त्याला लागली असावी. सांजच्याला रामानं त्याला खाऊपिऊ घातलं. पोरदेखील चांगलं रमलं. देवळाच्या पलीकडं ना वस्ती ना वर्दळ. खेरीज देवळातही कुणी आलं नाही. ते पोरही आईबाची आठवण काढेना. रामा त्याला घेऊन खेळत बसला. घोडा झाला, उंट झाला, पाठकुळी घेऊन झालं.

मारुतीच्या मस्तकाचा गंध काढून त्याने त्याच्या कपाळाला लावला. त्याला खेळवत असताना काहीतरी मंत्रआरत्या पुटपुटत होता. अंधार दाटून आला आणि बोबड्या केशवचं अख्खं घर तिथं आलं. केशवनं रामावरच तोंडसुख घेत आपल्या नेसूच्या धोतराचा सोगा आवळत ते पोर खवाटीस मारलं. सगळ्यांनी रामाच्या नावाने शिमगा केला. त्या गलक्यात पोर रडू लागलं. गायीच्या खुरांवरची धूळ खाली बसावी तशी ती माणसं पांगली. गाभाऱ्यात जाऊन रामा लहान लेकरासारखा ढसाढसा रडला.

Rural Story
Sugarcane Production : एकरी ८० टन ऊस उत्पादनात राखले सातत्य

त्या दिवसानंतर मंदिरात कुणी जरी दर्शनाला आलं तरी रामाने आशीर्वादासाठी कधीही हात वर केला नाही. देवळातला त्याचा वावर घुमा झाला. त्यानं पोरांना गोंजारणं-मारणंही सोडून दिलं. गावाने त्याच्यातल्या बदलाकडं लक्ष दिलं नाही. रामाला त्याचं वाईट वाटलं असावं. आपण गावाच्या गणतीत नाही, या विचारानं त्याचं मन सैरभैर झालं. परिणामी जे व्हायचं तेच झालं.

हनुमानजयंतीला कळस धुवायला शिखरावर चढलेला रामा पाय घसरून खाली पडला. उंचावरून खाली पडल्याने पाठीच्या कण्यातले मणके मोडले, डोक्यालाही मार लागला. त्याची दुखापत गंभीर होती, तो पूर्ववत बरा होण्याची कोणतीही चिन्हे नव्हती हे लक्षात आल्यावर गावाने थोडाफार दवाखाना करून त्याला घरी आणलं. खचलेल्या रामानं अंथरून धरलं. त्याच्या खोपटात त्याचा म्लान देह निपचित पडून असायचा.

एकदा त्याची बायको चांगुणा देवळात आली आणि सगळ्या पोरांना म्हणाली, “गुरवानं धोसरा काढलाय. एक डाव भेटून जावा माझ्या चिमणी पाखरांनो...” विटलेल्या लुगड्याचा डोईवरून घेतलेला पदर उजव्या हाताने ओठाखाली दाबत कातर आवाजात ती बोलली. बरेच दिवस रामाची भेट न झाल्यानं सारी पोरंही कावरीबावरी झाली होती, त्यांना आयतीच संधी मिळाली. लागलीच सगळी चिल्लर चांगुणेच्या मागोमाग रामाच्या घरी गेली.

बैलागत दांडगादुंडगा असलेला रामा पार वाळून गेला होता. हातपाय काटकीएवढे झाले होते. त्याच्या खोल गेलेल्या निस्तेज डोळ्यातून अश्रू निरंतर वाहत असावेत कारण तिथे ओघळाचा डागच तयार झाला होता. मिशा खाली पडलेल्या, गालफडे आत गेलेली, हनुवटी वर आलेली, नाक सोलून निघाल्यागत झालेलं, भेगाळलेल्या ओठातून लाळेचे पाझर लागलेले अशा अवस्थेत रामा पडून होता. पोरांना बघताच त्याच्या डोळ्यात अनामिक चमक आली. त्याच्या पापण्या थरथरल्या, ओठ हलले पण कंठातून आवाज फुटत नव्हता.

हाडावरचे कातडे लोंबत असलेला अशक्त हात किंचित उचलल्यासारखा वाटला. त्याच्या सगळ्या अंगाला विलक्षण कंप सुटला होता. चांगुणेच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. एकेका पोराला ती रामाच्या तळहातापाशी नेऊ लागली. त्याचे खडबडीत हात हलत नव्हते पण तो पोरांना चाचपत होता. त्या हाताने कधी काळी पोरांना खडीसाखर, चिरमुरे वाटले होते, पोरांच्या गालावरून हात फिरवले होते, आता मात्र ते पुरते गलितगात्र झाले होते.

Rural Story
Success Story : जातिवंत बैल बाजारासाठी प्रसिद्ध अंजनसिंगी

त्या रात्री खूप उशिरा देवळातला लामणदिवा शांत झाला. रामा गुरव अनंताच्या प्रवासाला निघून गेला. त्याच्या निधनानंतर गावाने नवा पुजारी बघितला. एरवी रसरशीत वाटणारं मंदिर रामा गेल्यानंतर कधीच जिवंत वाटलं नाही. मुळात तिथं होतं तरी काय? जीर्ण झालेली इमारत. नित्य ओतलेल्या तेलाने वेगळाच दर्प प्राप्त झालेली मारुतीरायाची शाळीग्राम पत्थरातली घडीव काळसर मूर्ती. मारुतीच्या मागे काही फुटांवर आणखी एक छोटासा गाभारा होता. त्यात राम, लक्ष्मण अन् सीतामाई होत्या. गावात स्वतंत्र राममंदिर नव्हतं. इथल्या मुर्त्यांवर चढवलेली फुलं दुपारनंतर सुकून जात.

बघावं तेव्हा तिथं अर्धवट जळालेल्या एकदोन उदबत्त्या दिसत. पाकोळ्यांचा, तेलाचा, फुलांचा, जळून गेलेल्या उदबत्तीचा मिळून वेगळाच असा खास गाभाऱ्याचा वास असायचा. रामा गुरव हे जग सोडून गेला आणि काही महिन्यांनी देवळाच्या आढ्यातला एक वासा मोडला. मग लोकांनी वर्गणी काढून जीर्णोद्धार केला. सिमेंट काँक्रीटचं भव्य मंदिर उभं केलं. जुन्या मूर्तींच्या जागी कोरीव घोटीव संगमरवरी मूर्ती आल्या. मोतीचुराचे प्रसादवाटप सुरू झाले. मंदिरालगतच्या परांच्यावर लागणाऱ्या फ्लेक्सवरती इवल्याशा मारुतीराया शेजारी गावातल्या हौशागवशानवशांचे मोठाले फोटो झळकू लागले. सगळं मंदिर चकाचक झालं पण रामा असतानाचा मंदिरातला ‘राम’ हरवला होता!

आता देवळाजवळ काही जुनीजाणती सागवानी माणसं नक्षीदार गप्पा मारत बसलेली असतात. गप्पांचा बहर ओसरल्यावर तिथल्या लिंब-पिंपळाची गळणारी पानं एकटक निरखीत राहतात. गावात रामनवमी, हनुमान जयंती दणक्यात होते पण एरवी मनोभावे नमस्कार करणारी आणि कानशिलं धरून पुटपुटणारी माणसं आता कमी झालीत. अशी माणसं जितकीही हयात आहेत त्यांचा राम मात्र पिकातून डौलतो, दंडाच्या पाण्यातून खळाळत वाहतो, बाभळीच्या बेचक्यातल्या घरट्यात चिवचिवतो, शाडू लावलेल्या कुडाला रेलून बसतो,

सारवलेल्या अंगणातल्या वृंदावनापाशी दिवेलागणीला हात जोडतो अन् अंधारलेल्या रात्री बाजेवर पडून आकाशीच्या चांदण्या निरखीत राहतो. या लोकांना राम सर्वार्थाने कळलाय का हे ठाऊक नाही, पण यांच्या जीवनात अजूनही ‘राम’ आहे. गावाकडच्या श्रद्धा, भक्ती आणि जीवनपद्धतीतला राम सच्चासीधा आहे. राम इकडं-तिकडं कुठं आहे की नाही ठाऊक नाही; मात्र आपल्यापैकी हरेकाच्या अंतःकरणात वसणारा खरा राम ओळखता आला पाहिजे.

८३८०९७३९७७

(लेखक प्रसिद्ध साहित्यिक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com