Nanded News : घनसावंगी तालुक्यात बहुतांश ठिकाणी पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. पन्नास टक्के गावांमध्ये पाण्यासाठी दाहीदिशा अशी अवस्था आहे. घरगुती वापर किंवा पिण्याच्या पाण्यासाठी लढाई, तर तिथे लग्नसमारंभ व अन्य कार्यक्रमांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे विकतच्या पाण्याशिवाय कोणताही कार्यक्रम नाही हे अनेक वर्षांपासूनचे चित्र आहे. यंदा मात्र पाणीसंकटामुळे पर्याय शोधला जात आहे.
यंदा जानेवारीपासून बहुतांश ठिकाणी पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. ज्याच्याकडे कोणताही कार्यक्रम असेल अशा ठिकाणी पहिली समस्या पाण्याची आ वासून उभी असते. यावर पर्याय शोधलाही जातो.
विकतचे पाणी घेऊन कार्यक्रम पूर्ण केला जातो. अलीकडे फुकटचे काहीच नसल्याचे बोलले जाते. निसर्गाने भरपूर, सहज, मुबलकपणे उपलब्ध होणाऱ्या पाण्यासाठी आज पैसे मोजावे लागत असल्याचे वास्तव आहे. ग्रामीण भागात शेतातून बैलगाडीवर ड्रमने पाणी आणले जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
ग्रामीण भागात टॅंकर आले की त्यात नळ्या टाकणे, ज्यांची लवकर नळी टाकण्यात आली त्याला भरपूर पाणी मिळते. घरासमोरील पाण्याच्या टाक्या टॅंकरद्वारे भरण्यात येत आहेत. शाळा व महाविद्यालयांना सुट्या लागल्याने मुला व मुलींना पाणी भरण्यासाठी मदतीला घेतले जात आहे.
गाळमुक्त धरण या मोहिमेकडे लक्ष देण्याची गरज
या पूर्वी तालुक्यात पाण्यासाठी सर्वाधिक आंदोलने झाली आहेत. पाणी समस्येचे महत्त्व अजूनही कोणी मनावर घेत नसल्याचे वास्तव आहे. दुष्काळाची संधी पाहता अनेक सिंचन प्रकल्पांतून गाळ काढणे, नाला खोलीकरण, नदीचे खोलीकरण व रुंदीकरण, विहीर फेरभरण, वृक्षारोपण यासह इतर मोहीम हाती घेण्याची गरज आहे.
घनसावंगी तालुक्यात पाणीटंचाईचे मोठे संकट यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत निर्माण झाले असताना प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. अर्धा दुष्काळ संपून गेला आहे. ग्रामीण भागात होणारी पाण्याची ओरड वाढत आहे. हे पाहता शासनाकडून टॅंकरशिवाय इतर उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे.बजरंग काकडे, नागरिक काकडे कंडारी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.