Pune News : ‘‘श्री सोमेश्वर कारखान्याकडे तोडणी वाहतूक यंत्रणेने शेतकरी सभासदांचा ऊस जळीत करून आणल्यास तोडणी वाहतूक यंत्रणेच्या बिलातून २०० रुपये प्रतिटन, तर शेतकऱ्यांच्या सहमतीने ऊस जाळून आणल्यास ऊस बिलातून प्रतिटन ५० रुपये कपात करण्यात येतील. असा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस जाळू नये,’’ असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले.
जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने आजअखेर १२१ दिवसांत प्रतिदिन ९ हजार टन ऊस गाळप करीत आणला आहे. आत्तापर्यंत एकूण १० लाख ८४ हजार २३३ टन उसाचे गाळप केले आहे. ११.७४ टक्के साखर उतारा राखत १२ लाख ६७ हजार ६५० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.
कारखान्याकडे मुबलक ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा उपलब्ध आहे. कारखान्याने कार्यक्षेत्रातील आडसाली ७ लाख ६ हजार टन, पूर्व हंगामी १ लाख १३ हजार ३९५ टन, सुरू १३ हजार ९९५ टन, खोडवा ६५ हजार ४२६ टनांचे गाळप केले आहे.
कारखान्याकडे नोंद केलेल्या सभासदांच्या व बिगर सभासदांच्या संपूर्ण उसाचे गाळप करण्यासाठी कारखाना कटिबद्ध आहे. ऊस तोडणी करताना मजुरांकडून पैशाची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबतची लेखी तक्रार शेतकऱ्यांनी द्यावी. त्याची चौकशी करून ऊसतोड यंत्रणेने घेतलेल्या पैशांची कपात त्यांच्या ऊस तोडणी वाहतूक बिलातून करण्यात येईल.
मार्चपासून तुटणाऱ्या उसास प्रतिटन ३१५० रुपये एकरकमी
श्री. जगताप म्हणाले, ‘‘नीरा डावा कालव्याचे आवर्तन जून अखेरपर्यंत सुरू राहणार असल्याने शेतकऱ्यांनी सुरूच्या लागणी व तुटणाऱ्या उसाचे खोडवे राखावेत. चालू हंगामामध्ये १ मार्चपासून ते हंगाम संपेपर्यंत तुटणाऱ्या उसास प्रतिटन १५० रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे मार्चपासून तुटणाऱ्या उसास प्रतिटन ३१५० असे एकरकमी ऊस बिल देण्यात येईल.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.