This interaction with Nandkumar Vadnere, Chairman of Flood Causes and Remedies Study Committee...
राज्यात यंदा उद्भवलेली पूरस्थिती मानवनिर्मित म्हणावी लागेल की यात यंत्रणांचा दोष आहे?
मला जलसंपदा विभागाचा मुख्य अभियंता म्हणून क्षेत्रीय पातळीवर काम करता आले. जलसंपदा विभागाचा सचिव म्हणून प्रशासकीय, धोरणात्मक कामाचा अनुभव मिळाला. कृष्णा पाणी तंटा लवादात महाराष्ट्राची बाजू मांडणाऱ्या समितीचा सदस्य म्हणूनही मी काम केले आहे. निवृत्तीनंतरही कृष्णा व भीमा खोरे पूरस्थितीविषयक कारणे व उपाय अभ्यास समितीचे नेतृत्व माझ्याकडे होते. या साऱ्या प्रवासात मला एका गोष्टीचे खूप वाईट वाटते, ती बाब म्हणजे पावसाळ्यात पूर आल्यानंतरच साऱ्या व्यवस्थेला नद्यांची आठवण होते. एरवी आठ महिने नद्यांची अवस्था अडगळीत टाकलेल्या आजी-आजोबांसारखी असते. मानवी ज्ञात इतिहासाच्या वाटचालीत नद्या उगम पावल्या, लुप्त झाल्या, संथ वाहिल्या, नद्यांना पूर आले आणि गेले आहेत. पूर हे नदीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. अतिपाऊस होणे, नदीने दुथडी भरून वाहणे, पूर येणे हे साऱ्या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये कधी ना कधी होत आलेले आहे. इथून पुढेही होईल.
पूरप्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप आपण थांबवणार आहोत की नाही, हा प्रश्न आहे. पूर आलेली नदी मोकळी वाहिली पाहिजे, तिला अडवायला नको, ती संथ असताना तिचा संकोच करायला नको, तिच्या जागेत अतिक्रमणे व्हायला नकोत, नदीचे मूळ स्वच्छ व सुंदर रूप जतन करायला हवे. हे सारे आपल्या पूर्वजांनी केले. मात्र सध्याच्या आधुनिक व्यवस्थेत, शहरीकरणात किंवा आपल्या या ‘कॉस्मोपॉलिटन कल्चर’मध्ये आपण नद्या नासवल्या आहेत. त्यांना गुलाम बनवले आहे. त्यांचे हाल केले आहेत. त्यामुळेच आता आपल्याला पूर हे नैसर्गिक न वाटता एक संकट वाटू लागले आहे. आता हे सर्व सांगून झाल्यानंतर तुम्हाला खात्रीपूर्वक जाणीव होईल, की नैसर्गिक पूरस्थितीची ‘समस्या’ होण्यास मानवनिर्मित व्यवस्थाच कारणीभूत आहे.
कृष्णा व भीमा खोऱ्यातच पूर समस्या वारंवार उद्भवत आहेत. तुमच्या अभ्यासातून नेमके काय लक्षात आले?
हा अभ्यास माझ्या अध्यक्षतेखालील समितीने केला. त्यात अनेक मान्यवर होते. भीमा खोऱ्याचा अभ्यास आणि उपाय हा अहवाल मुख्यत्वे राजेंद्र पवार यांनी केला. पूरपरिस्थितीला बांधकामे कितपत जबाबदार आहेत, पूर कशामुळे आले, अलमट्टी व इतर धरणांमुळे महाराष्ट्रात पूरपरिस्थिती तयार होते का, भविष्यातील पूर संकट टाळण्यासाठी उपाय काय असावेत, या प्रश्नांचा अभ्यास आम्ही केला. याशिवाय धरणांमधील सुधारित जलाशय परिचालन यंत्रणा कशी असावी, नदीत सोडले जाणारे पाणी एकाच व्यवस्थेत कसे मोजावे, पूरप्रवण क्षेत्रात बांधकाम आहेत काय व त्याचे नियंत्रण कसे करावे, आपत्कालीन कृती आराखडा कसा असावा हेदेखील मुद्दे अभ्यासले गेले.
पण तुमच्या अहवालाचे काय झाले?
मी मुख्यमंत्र्यांकडे अहवाल दिला. तो जाहीर झाला आणि बहुतांश शिफारशीही स्वीकारल्या होता. तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी त्यावर गांभीर्याने पावले टाकली. कृष्णेच्या पुराबाबत स्थापत्य व धोरणात्मक असे दोन गटात उपाय सुचवले होते. उदाहरणार्थ, आम्ही राधानगरी धरणाचे दरवाजे आधुनिक करण्याची सूचना केली होती. दीर्घकालीन उपायातील स्थापत्य कामे आता लवकरच सुरू होतील. बिगरस्थापत्य कामांमध्ये हवामान अंदाज, रडार, जनजागृती यंत्रणा, संगणकीकरणाचा विस्तार अशी कामे होती. त्यातील अनेक झालीत; तर काही चालू आहेत. पुराला निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित कारणे असतात. कमी वेळेत अतिमुसळधार पाऊस होणे किंवा सहा महिन्यांचा पाऊस एका दिवसात पडणे ही निसर्गनिर्मित पूर कारणे आहेत. अशा स्थितीत धरणांमध्ये अगोदरच पाणी असेल तर दरवाजे उघडून पाणी सोडावेच लागते. धरण असल्यास पूर नियंत्रित करता येतात. परंतु कोल्हापूर भागात किंवा राधानगरीच्या वरच्या भागात धरणांची साखळी नाही. तेथे पडणारा अतिपाऊस सरळ पुराचे रुप घेत कोल्हापूरवर धडकतो. सांगली भागातही तेच होते. अर्थात, सांगली क्षेत्रात पूर थांबविण्यासाठी किमान कोयना, वारणासारखे काही धरण प्रकल्प हाताशी तरी आहेत. मात्र कोल्हापूरला ती सोयच नाही. अशा स्थितीत फारसे काही करता येत नाही. मनुष्यहानी रोखणे, वित्तहानी कमीत कमी होईल याची काळजी घेणे हेच आपल्या हाती आहे.
अलमट्टीचा मुद्दा सतत बोलला जात होता. परंतु ते मूळ कारण नाही. पूर्वी त्यात समन्वय नव्हता. अलमट्टीचा मुद्दा आता समन्वयामुळे निकाली निघाला आहे. मूळ म्हणजे तुमची नदी आकसलेली नको, ती अतिक्रमणमुक्त असावी, त्यात राडारोडा नसावा. पुण्यात ही समस्या प्रकर्षाने दिसते. तेथे आता मेट्रोदेखील नदीतून घुसवली आहे. नदी पात्राचे संवर्धन चुकले की नदीचा नैसर्गिक श्वास कोंडतो आणि पुराच्या रूपातून नदी प्रक्षुब्ध होते.
नदीपात्रातील अतिक्रमणे पूरपरिस्थितीला कारणीभूत आहेत का?
ते सांगण्यासाठी कोणा तज्ज्ञांची अावश्यकता नाही. घरासमोरच्या गटारीत दगड पडला तरी सांडपाणी तुंबते आणि इतरत्र घुसतेच ना! पुण्याच्या पंचक्रोशीतील मोठमोठे रस्ते नदीपात्रात आणले, गटारी आणल्या, मेट्रो आणली. त्यामुळे नदीपात्रातील ५० टक्के क्षेत्र झाकले गेले आहे. मला सांगा नदीवर असे अत्याचार केले तर पूर कसा नियंत्रित होणार? मी १९९४ मध्ये कृष्णा खोऱ्यात पुणे येथे जलसंपदा विभागात मुख्य अभियंता होतो. त्या वेळी पानशेत, वरसगाव, टेमघर गच्च भरले होते. तरीही पाऊस झाला आणि त्या वेळी एक लाख क्युसेक विसर्गाने येवा चालू होता. आता मी खडकवासलामधून ते पाणी सोडले नसते, तर पुन्हा पानशेतसारखी दुर्घटना घडली असती. त्यामुळे मी सतत सर्व यंत्रणांशी बोलत होतो. आम्ही आधी ३० हजार क्युसेकने पाणी सोडले. नंतर पुन्हा वाढवले. इकडे पाऊस तिसऱ्या दिवशीही चालूच होता. त्यामुळे मला तिसऱ्या दिवशी एक लाख क्युसेक पाणी खाली सोडावेच लागले. ओंकारेश्वरची चौथी पायरी त्या वेळी बुडाली होती. नारायण पेठेत थोडे पाणी घुसले होते. पण आज तीच परिस्थिती केवळ ३५ हजार क्युसेक पाणी सोडल्यावर झाली आहे. इतके कमी पाणी सोडल्यावर जर तुमच्या शहरात हाहाकार माजत असेल, तर तुम्ही नदीची काय अवस्था केलीय हेच लक्षात येते ना!
आता एकतानगरसारख्या अनेक नवीन वसाहती कौतुकाने नदीकाठी बांधल्या गेल्या आहेत. पण असे पूर येतात तेव्हा नदीचे रौद्र रूप कळते. तुम्हाला फ्लॅटच्या खाली उतरता येत नाही. लोकहो, नदी तुमच्या दारात आलेली नाही. तुम्हीच नदीच्या अंगणात राहायला गेला आहात. तुम्हीच नदीचा श्वास कोंडून ठेवला आहे. आता तरी लवकर जागे व्हा. नदीला तिचे स्वातंत्र्य द्या. कोणतीही नदी आपली जीवनदायिनी असते. ती आपली गुलाम नाही हे लक्षात ठेवा. पाहिजे तेव्हा तुम्ही तिच्या छाताडावर रस्ते, इमारती, भुयारी गटारी बांधाल, राडारोडा फेकाल, तिला गटार बनवाल हे असे कसे चालेल? वर नदीने मात्र चुपचाप तुम्हाला भरपूर पाणी पुरवावे, नियमात वाहावे, पूर आणू नये अशी भ्रामक अपेक्षा आधुनिक मानव कसा ठेवतो याचे मला खूप आश्चर्य वाटते.
निसर्ग पूर आणतो आणि आता हवामान बदलामुळे निसर्गनिर्मित पूर अजूनही वाढतील, हे मला मान्य आहे. त्यात मानवाचा दोष नाही. पण या मानवनिर्मित हस्तक्षेपाचे काय? तुम्ही खुशाल नदी अडवता, बुजवता, बिल्डर लोक मनमानी बांधकामे करतात, अशा वेळी निसर्गाच्या नावाने बोंब ठोकण्यात काय हशील? नद्यांकडे तुम्ही अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. नद्या बुजवण्याचे सामर्थ्य असल्याची घमेंड माणसाला वाटत असेल तर पूर येणारच! कृष्णा, पंचगंगा, मुळा, मुठा, गोदा, भीमेला पूर्वी पूर येत नव्हते का? पूर येतच होते ना; पण तेव्हा लोकसंख्या कमी होती. नद्या मुक्त वाहत होत्या. आता लोकसंख्येने शहरे फुगली आहे. नदीपात्राचा नाश करून ‘रिव्हर व्ह्यू’चे फ्लॅट बांधायचे असतील तर नदी एकवेळ ते सहन करेल; पण तिचा पूर मात्र तुमचे कधीही ऐकणार नाही. जगातील कोणताही पूर त्याच्या वाटेत कोणी आडवा आल्यास एक तर त्याला पार करतो किंवा उद्ध्वस्त करतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.