Soybean Cotton Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Cotton Market : कापूस, तेलबिया, खाद्यतेलातील जोखीम व्यवस्थापन

Commodity Market : जागतिक कमोडिटी बाजारात सोने-चांदी आणि धातूंच्या किमतींत जोरदार तेजी असली तरी सोयाबीन, कापूस, मका मंदीतच आहेत. कापूस, तेलबिया आणि खाद्यतेल क्षेत्रातील भागधारकांनी जोखीम व्यवस्थापनासाठी आणि किमतीतील चढ-उतारांचा फायदा घेऊन ट्रेडिंग करून चार पैसे कमावण्यासाठी उपलब्ध साधनांचा (कॉन्ट्रॅक्ट) वापर करणे श्रेयस्कर ठरेल.

श्रीकांत कुवळेकर

Market Update : मागील आठवड्यात आपण सोयाबीन पिकात निर्माण झालेली मंदीची परिस्थिती आणि त्यामुळे पॅनिक सेलिंग न करता तीन-चार महिने सोयाबीन साठवणूक करून ठेवणे कसे किफायतशीर ठरू शकते याबद्दल चर्चा केली होती. दिवाळीला जेमतेम दोन-तीन दिवस उरले असून, सोयाबीन ४,३०० रुपयांवर विकले जात आहे. कापसात देखील काही वेगळी स्थिती नाही. त्यामुळे सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्याची आशा धुसर झाली आहे.

त्यातच राज्यात अजून एक महिनाभर निवडणुकीची घामधूम राहणार आहे. त्यानंतर नवीन सरकार स्थापना, त्यांचे खातेवाटप यामध्ये मागील अनुभव पाहता किमान दोन-चार आठवडे जातील. त्यामुळे या काळात सरकारी पातळीवर मोठे निर्णय अपेक्षित नाहीत. जागतिक कमोडिटी बाजारात सोने-चांदी आणि धातूंच्या किमतीत जोरदार तेजी असली तरी सोयाबीन, कापूस, मका मंदीतच आहेत. नोव्हेंबर आणि निदान अर्धा डिसेंबर हा कालावधी बाजारात विशेष काही घडण्याची चिन्हे नाहीत. फक्त बेमोसमी पाऊस आणि रब्बी हंगामाच्या पेरण्या हे दोनच घटक बाजाराच्या दृष्टीने महत्त्वाचे राहणार आहेत.

त्यामुळे आज किंमत जोखीम व्यवस्थापन क्षेत्रात कापसाला असलेल्या संधीबाबत चर्चा करायची आहे. आपण पाहिले आहे की मागील महिन्यात संपलेल्या कापूस हंगामात कापसात एकदाही तेजी आलेली नाही. असे अनेक वर्षात पहिल्यांदाच घडले आहे. कापसाच्या मागणीत आलेली स्थित्यंतरे ही दीर्घ कालावधीच्या दृष्टीने कापसात तेजी येण्यासाठी अडसर ठरू शकतात. त्यामुळे सावधगिरी म्हणून कापसात जेव्हा जेव्हा किमतीत उभारी येईल तेव्हा प्रत्यक्ष कापसाची विक्री करण्याऐवजी वाढीव किंमत वायदे बाजारामार्फत निश्चित करून जोखीम व्यवस्थापन कसे करता येईल हे लक्षात घ्यावे. सध्या बाजारात कापसासाठी जोखीम व्यवस्थापन करण्यासाठी तीन साधने उपलब्ध आहेत तर सरकी आणि सरकी पेंडसाठी एक कॉन्ट्रॅक्ट उपलब्ध आहे.

कपास कॉन्ट्रॅक्ट

एमसीएक्स आणि एनसीडीईएक्स या दोन्ही कमोडिटी एक्स्चेंजवर कपास नावाने सरकीयुक्त कापूस व्यवहार करण्याची सोय उपलब्ध आहे. कापसातील जोखीम व्यवस्थापनासाठी हे सर्वांत उत्तम साधन किंवा कॉन्ट्रॅक्ट आहे. कारण यात प्रत्यक्ष डिलिव्हरी गरजेचे नसून कॉन्ट्रॅक्ट कॅश-सेटल्ड म्हणजे किमतीतील फरकाने सेटल केले जाते. या कॉन्ट्रॅक्टमध्ये लॉट साइज ४० क्विंटल किंवा ४ टन एवढी आहे. सध्या १५७० रुपये प्रति २० किलो (७८५० रुपये क्विंटल) किंमत असलेल्या एप्रिल २०२५ महिन्यात समाप्त होणाऱ्या कॉन्ट्रॅक्टची एकूण किंमत ३,००,००० रुपयांच्या घरात जाते. सुमारे १२ टक्के मार्जिन ठेवून या कॉन्ट्रॅक्टमध्ये व्यवहार करता येतात. विशेषत: शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि जिनर्ससाठी हे कॉन्ट्रॅक्ट एकदम उपयुक्त आहे.

कॉटन बेल्स (२९ एमएम) आणि कॉटन कॅण्डी

एमसीएक्सवर कॉटन कॅण्डी आणि एनसीडीईएक्स वर कॉटन २९-एमएम नावाने कापूस गाठीचे व्यवहार करण्यासाठी ही कॉन्ट्रॅक्ट्स उपलब्ध आहेत. सध्याची ५६,००० रुपये प्रति कॅण्डी किंमत जमेस धरता २५ गाठीचा (म्हणजे सुमारे १२.५ कॅण्डी) लॉट असलेले

काँट्रॅक्ट सुमारे ८,००,०००-९,००,००० रुपयांच्या घरात जाते. अंदाजे १,००,००० रुपये मार्जिन ठेवून या कॉन्ट्रॅक्टमध्ये व्यवहार करता येतात. जिनिंग क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या, जिनर्स, व्यापारी आणि कापड गिरण्यांसह सर्व प्रकारच्या भागधारकांना जोखीम व्यवस्थापनासाठी अत्यंत उपयुक्त असे हे कॉन्ट्रॅक्ट आहे.

कॉटन वॉश ऑइल

एमसीएक्स आणि एनसीडीईएक्स या दोन्ही कमोडिटी एक्स्चेंजेनी अलीकडेच उपलब्ध करून दिलेले हे कॉन्ट्रॅक्ट कापूस उत्पादक आणि प्रक्रियाधारक यांना उपयुक्त आहेच. परंतु त्याच बरोबर खाद्यतेल आयातदार आणि देशांतर्गत उत्पादकांना देखील आपल्याकडील खाद्यतेलाच्या साठ्याच्या किमतीतील जोखीम व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त आहे. सोयाबीन, सोयातेल आणि अशुद्ध पाम तेल यांच्या वायद्यांवर तीन वर्षांपासून असलेल्या बंदीमुळे ज्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे अशा खाद्यतेल, पेंड आणि तेलबिया साठवणूकदारांना हे कॉन्ट्रॅक्ट वरदान ठरत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खाद्यतेल आणि तेलबिया क्षेत्रातील वाढत्या जोखमींचे प्रमाण पाहता या कॉन्ट्रॅक्टची लोकप्रियता पुढील काळात वाढणार आहे.

कोकूड अथवा सरकी पेंड

एनसीडीईएक्स या एक्स्चेंजवर कोकूड नावाने सरकी पेंडेचे असलेले हे कॉन्ट्रॅक्ट मागील काही वर्षांत खूप लोकप्रिय झाले आहे. देशातील ६० टक्के भागात पशुखाद्य म्हणून सरकी पेंड वापरली जात असल्यामुळे तिची मागणी कायमच चांगली राहिली आहे. परंतु कापूस, सोयाबीन, मका आणि पशुखाद्यासाठी वेळोवेळी लागणाऱ्या इतर धान्यांच्या किमतीतील चढ-उताराचा थेट परिणाम सरकी पेंडेवर होत असल्यामुळे जोखीम व्यवस्थापनासाठी या कॉन्ट्रॅक्टचा चांगलाच उपयोग होतो. निविष्ठा विक्रीत अग्रेसर असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी देखील हे कॉन्ट्रॅक्ट उपयुक्त ठरत आहे. आपापल्या गरजेनुसार कापूस, तेलबिया आणि खाद्यतेल क्षेत्रातील भागधारकांसाठी जोखीम व्यवस्थापनच नाही तर किमतीतील चढ-उतारांचा फायदा घेऊन ट्रेडिंग करून चार पैसे कमाविण्यासाठी वरील साधनांचा निश्चितच उपयोग करता येऊ शकतो. त्यासाठी योग्य ते प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. त्यासाठी योग्य त्या सरकारी आणि खासगी स्त्रोतांचा उपयोग करावा.

कॉटन स्टेवर्डशिप काैन्सिल

बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट), महाराष्ट्र ग्रामीण आणि सामाजिक परिवर्तन फाउंडेशन आणि ग्रँट थॉर्टन कंपनीच्या संयुक्त सहभागातून कॉटन स्टेवर्डशिप काऊंसिल (कापूस व्यवस्थापन परिषद) स्थापन करण्यात आली आहे. कापूस क्षेत्रातील उत्पादक कंपन्यांपासून कापड गिरण्या आणि निर्यातदार अशा सर्व भागधारकांना सभासद म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन काैन्सिलने केले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात हरभऱ्यात पडझड

या स्तंभातून आपण १९ ऑगस्ट रोजी सोयाबीन वायद्यापेक्षा हरभरा वायदे सुरू करण्याची अत्यंत निकड असून शेतकरी संघटनांना तशी मागणी करण्याचे आवाहन केले होते. कारण ८००० रुपये क्विंटल हा भाव असताना जर वायदे आले तर काढणीपर्यंत न थांबता शेतकऱ्यांना आपले रब्बी हंगामातील उत्पादन आगाऊ विकून चांगली किंमत निश्चित करता येणे शक्य होते. आता हरभऱ्याच्या पेरण्या होऊ लागल्या आहेत आणि क्षेत्रात मोठी वाढ होण्याचा कल दिसू लागला आहे. अर्थातच हरभऱ्याच्या किमती जागतिक बाजारात जोरात आपटू लागल्या आहेत. सहा आठवड्यांपूर्वी ९५०-१,००० डॉलर्स प्रतिटन असणारा हरभरा आता ७५० डॉलर्स वर आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील या स्थितीचे प्रतिबिंब दोन महिन्यांत देशांतर्गत बाजारात उमटेल.

(लेखक कृषी व्यापार व कमोडिटी मार्केटचे अभ्यासक, स्तंभलेखक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT