प्रीतम पाटील, डॉ. श्रद्धा बगाडे, डॉ. सुहास उपाध्ये
वीज कोसळण्यापासून संरक्षणासाठी पूर्वीच्याकाळी विविध वैज्ञानिक उपाय अवलंबले जात होते. यातील काही उपायांची माहिती घेऊयात.
मंदिरांवरील धातूचा कळस
प्राचीन भारतीय स्थापत्यशास्त्रानुसार, मंदिरांवरील धातूचा कळस हा वीज चालकाच्या भूमिकेसाठी महत्त्वाचा भाग आहे. मंदिराच्या शिखरावरील कळस तांबे, पितळ किंवा सोन्याचा बनवलेला असतो आणि तो जमिनीत खोलवर पुरलेल्या तांब्याच्या पट्ट्याशी जोडला जाई, ज्यामुळे विजेचा प्रवाह सुरक्षितपणे जमिनीत मोकळा होण्यास उपयुक्त ठरतो.
घरावरील धातूचे संरक्षक यंत्र (दिशादर्शक कोंबडा)
काही घरांच्या छपरांवर लोखंडी किंवा तांब्याचा दिशादर्शक कोंबडा बसवला जात असे. हा कोंबडा हवामान निरीक्षणासाठी तसेच वीज कोसळल्यास सुरक्षित मार्गाने विद्युत प्रवाह जमिनीत नेण्यासाठी वापरला जाई. हे तत्त्व लाइटनिंग अरेस्टरप्रमाणे कार्य करते.
विजेचा गडगडाट होत असताना लोखंडी गंज , पहार टाकणे :
पूर्वी काही भागांत विजेच्या गडगडाटाच्या वेळी घराच्या आसपास लोखंडी गंज किंवा पहार टाकत, ज्यामुळे विजेचा प्रवाह लोखंडी वस्तूंनी आकर्षित होऊन घरावर थेट परिणाम होण्याची शक्यता कमी होत असे. हे तंत्र काही प्रमाणात सुरक्षिततेस मदत करीत असे, पण आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य पृथ्वीकरण आणि लाइटनिंग अरेस्टर अधिक प्रभावी ठरतात.
झाडांच्या सुरक्षिततेचा विचार
काही ठिकाणी मोठ्या पिंपळ, वड किंवा उंबरासारख्या वृक्षांजवळ घर बांधण्यास टाळले जाई, कारण हे वृक्ष उंच असल्याने वीज सर्वप्रथम त्यांना आकर्षित करू शकते. याउलट, काही ठिकाणी मोठ्या झाडांच्या आधाराने घरांना अप्रत्यक्ष संरक्षण मिळते, असा समजही होता.
छतावर विशिष्ट धातूंचा वापर
काही ठिकाणी घराच्या छपरावर तांब्याचे पत्रे किंवा लोखंडी पट्ट्या बसवून त्यांना जमिनीत खोल पुरलेल्या धातूच्या पट्ट्यांशी जोडले जात असे. यामुळे विजेचा प्रवाह सुरक्षित जमिनीत जाऊ शकत असे.
मातीच्या घरांना प्राधान्य
पूर्वीच्या काळी लाकडी किंवा गवताच्या छपरांपेक्षा मातीची घरे अधिक सुरक्षित मानली जात, कारण माती विजेचा प्रभाव कमी करते. त्यामुळे पावसाळ्यात मातीच्या घरांना प्राधान्य दिले जाई.
वरील उपाय हे आजच्या काळातील लाइटनिंग अरेस्टरच्या संकल्पनेस अनुरूप आहेत आणि त्यांचे स्वरूप अधिक वैज्ञानिकदृष्ट्या विकसित झाले आहे.
वीज कोसळण्याचे शेतीवरील परिणाम
वीज कोसळण्याचे खूप तोटे असले तरी शेती खासकरून पिकांसाठी खूप उपयुक्त आहे. वीज कोसळणे नेहमीच अत्यंत धोकादायक असते, परंतु त्याच्या रासायनिक प्रक्रियेमुळे पिके अधिक हिरवीगार आणि तजेलदार होतात. याचे मुख्य कारण आहे वातावरणातील नायट्रोजनची रासायनिक प्रक्रिया. नायट्रोजन हा वातावरणातील सर्वाधिक विपुल घटक आहे. आपल्या वातावरणातील हवेचा सुमारे ७८ टक्के भाग नायट्रोजनयुक्त असतो, तर ऑक्सिजन केवळ २१ टक्के असतो. झाडांना वाढीसाठी नायट्रोजनची आवश्यकता असते, परंतु ते हवेतील नायट्रोजन थेट वापरू शकत नाहीत.
हवेतील नायट्रोजनच्या अणूंमध्ये दोन अणू एकमेकांशी घट्ट बांधलेले असतात. झाडांना नायट्रोजन वापरण्यासाठी, या दोन अणूंचे विभाजन होणे आवश्यक असते. हे विभाजन करण्यासाठी प्रचंड ऊर्जा आवश्यक असते आणि येथेच वीज कोसळण्याची प्रक्रिया महत्त्वाची ठरते.
वीज कोसळताना वातावरणातून जात असताना, नायट्रोजनच्या अणूंचे विभाजन होते. यामुळे ऑक्सिजनशी संयोग करून नायट्रोजन ऑक्साइड्स तयार करतात. पावसामुळे हे नायट्रोजन ऑक्साइड्स विघटित होऊन नायट्रेट्समध्ये परावर्तित होतात आणि जमिनीत मिसळतात. नायट्रेट्स हे ‘सुपर फर्टिलायझर’ मानले जातात.
पावसाळी वादळे एक-दोन वेळा झाली तर त्याचा विशेष फरक पडत नाही, परंतु जर काही आठवड्यांपर्यंत दररोज वादळे होत असतील, तर ती शेतीसाठी फारच फायदेशीर ठरतात. निरोगी माती हे चांगल्या पीक उत्पादनाचे मुख्य घटक आहे. नायट्रोजन हे निरोगी मातीसाठी अत्यंत आवश्यक आहे.
वीज कोसळण्याच्या काळातील उपाययोजना
प्रशासनाने त्वरित आपत्कालीन सेवा पुरवणे, लोकांना सुरक्षित स्थळी हलवणे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे.
रेडिओ, मोबाइल हे पूर्वसूचना मिळवण्यासाठी उपयुक्त आहेत. जेव्हा आशा माध्यमातून पूर्वसूचना मिळते, त्यानंतर लगेच इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बंद करून ठेवावीत.
बाहेर असताना विजेपासून धोका कमी करण्यासाठी उपाय
जंगल परिसरात लहान झाडांच्या दाटीमध्ये कमी उंचीच्या जागेत आश्रय घ्यावा.
मोकळ्या जागी एखादी घळ किंवा दरीसारख्या खोलगट भागात आश्रय घ्यावा. अशा ठिकाणी अचानक येणाऱ्या पुराच्या लोंढ्याबाबत सतर्क राहावे.
खुल्या पाण्यातून ताबडतोब जमिनीवर या आणि आसरा शोधा.
शेतात काम करत असल्यास ताबडतोब हातातील धातूची अवजारे दूर ठेवावीत. जवळील खड्डा किंवा इतर कोणत्याही खोल जागेवर दबकून बसावे.
तुमच्यावर किंवा तुमच्या माहितीच्या कुणावर वीज पडल्यास शक्य तितक्या लवकर वैद्यकीय मदत बोलवा. वीज पाडल्याच्या ठिकाणी जाताना आणि मदत पोहोचवताना वीज रोधक आवरण जसे की, रबरी चप्पल किंवा बूट, जाड गोधडी, काठी, रबरी हातमोजे, अंगावर जाड कपडे यासारख्या विविध वस्तूंचा वापर करावा. तात्काळ आपत्कालीन व्यवस्थापन निवारणासाठी अॅम्ब्युलन्ससाठी १०८ या क्रमांकावर संपर्क करून मदत मागवावी.
वीज कोसळलेल्या व्यक्तीवर उपचार
श्वासोच्छ्वास : श्वासोच्छ्वास थांबला असल्यास, तोंडावाटे कृत्रिम श्वास द्यायला सुरुवात करावी.
हृदयाचे ठोके : हृदय थांबले असल्यास सीपीआर म्हणजेच कृत्रिम श्वास द्यावा.
नाडी : रुग्णाची नाडी आणि श्वास चालू असेल, तर अन्य संभाव्य दुखापती तपासून पाहाव्यात. जिथे वीज शरीरात शिरली तेथे भाजले आहे का हे तपासा. तसेच चेतासंस्थेला इजा, हाडे मोडणे आणि श्रवण व दृष्टी जाणे यांबद्दल तपासणी करावी.
वीज कोसळण्याबाबत माहिती देणारी साधने
दामिनी लायटनिंग ॲप :
पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार आणि आयआयटीएम, पुणे यांच्या दामिनी ॲपद्वारे आपल्याला वीज कोसळण्याची पूर्वसूचना मिळू शकते. निश्चित केलेल्या ठिकाणच्या २० आणि ४० किमी च्या क्षेत्रात पडणाऱ्या विजेची पूर्वसूचना ७, १४ आणि २१ मिनिटे अगोदर मिळू शकते. तसेच मौसम (MAUSAM), मेघदूत अॅग्रो (Meghdoot Agro), उमंग (UMANG) इ. अॅप्लिकेशनच्या माध्यमातून वादळ किंवा वीज कोसळण्याबाबत माहिती मिळवता येते.
भारत हवामान विभागाचे संकेतस्थळ:
भारत सरकारच्या IITM, IMD आणि NCMRWF यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेल्या संकेतस्थळ System for Thunderstorm Observation, Prediction and Monitoring (STORM)(https://srf.tropmet.res.in/srf/ts_prediction_system/index.php) आणि भारत हवामान विभाग यांच्या संकेतस्थळावर (https://mausam.imd.gov.in/) देखील आपल्याला विजेची पूर्वसूचना व त्याची अधिक माहिती मिळू शकते.
प्रसार माध्यमे :
दूरदर्शन, आकाशवाणी, रेडिओ, वृत्तपत्रे अथवा कोणत्याही अधिकृत माध्यमातून प्रसारित केली जाणारी पूर्वसूचना वीज कोसळण्यापासून सावधानता बाळगण्यासाठी वापरू शकता.
वादळामध्ये करावयाच्या आणि टाळावयाच्या बाबी
काय करावे :
तुम्ही जर उघड्यावर असाल तर विजेपासून वाचण्यासाठी इमारती किंवा तत्सम पक्के आसरा शोधा. परंतु जर इमारती नसतील, तर तुम्ही खड्डा किंवा घळीत संरक्षण मिळवू शकता. वृक्ष हे चांगला आसरा नाहीत कारण, उंच झाडे सर्वप्रथम वीज आकर्षित करतात.
तुम्हांला आसरा मिळाला नाही, तर परिसरातील सर्वात उंच वस्तूच्या जवळ जाणे टाळा. जवळ केवळ वृक्षच असतील, तर तुमचे सर्वात उत्तम संरक्षण म्हणजे वृक्षांपासून शक्य तितक्या दूर उघड्यावर दबकून बसावे. कारण उंच वृक्ष सर्वप्रथम विजेला आकर्षित करतात.
ज्यातून वीज वाहू शकेल अशा ठिकाणापासून दूर राहा. यामध्ये फायर प्लेस, रेडिएटर्स, स्टोव्ह, धातूचे पाइप्स, सिंक आणि फोनचा समावेश होतो.
पाण्यातून बाहेर या. पाण्यातील लहान होड्यांमधून उतरून किनाऱ्यावरील पक्या वस्तूचा आसरा घ्यावा.
तुम्हाला विद्युतप्रवाह जेव्हा जाणवतो, तेव्हा तुमचे केस उभे राहतात किंवा तुमची त्वचा हुळहुळू लागते, तर तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता असते. अशावेळी तत्काळ जमिनीवर आडवे व्हावे.
एखाद्या उड्डाणपुलाखाली वादळ थांबण्याची वाट पहा. उड्डाणपूल ही अभियांत्रिकी स्थापत्ये असतात आणि ती व्यवस्थित भूमिस्थ केलेली असण्याची शक्यता असते. आजूबाजूच्या परिसरापेक्षा उड्डाणपूल उंच असण्याची शक्यता असली तरी, त्यावर वीज कोसळली तरी विद्युतप्रवाह सुरक्षितपणे जमिनीत वाहून नेला जाण्याची शक्यता असते.
काय करू नये :
वादळात मोबाइल व टेलिफोन वापरू नका. कारण बाहेरील टेलिफोनच्या तारांवर वीज पडू शकते.
कोणतेही प्लग-इन विद्युत उपकरण वापरू नका, जसे हेअरड्रायर किंवा विजेवरील रेझर्स, रेफ्रिजरेटर, मिक्सर. कारण वीज जर तुमच्या घरावर पडली तर त्यातून प्रवाह तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो.
बाहेरच्या धातूच्या वस्तू वापरू नका, पोलादी तुळईला स्पर्श करू नका.
- डॉ. श्रद्धा बगाडे, ९६७३८०५३५३,
(कृषी हवामानशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.