
प्रितम पाटील, डॉ. श्रद्धा बगाडे, डॉ. सुहास उपाध्ये
Thunder and Lightning, Storm Safety Tips: वीज ही आकाशात निर्माण होणारी विद्युत चमक आहे, जी वादळाच्या वेळी ढगांच्या घर्षणामुळे निर्माण होते. वीज कोसळण्याच्या वेळेस, वातावरणातील वायूंचे आयनायझेशन होऊन विद्युत प्रवाह निर्माण होतो, जो जमिनीपर्यंत पोहोचतो. यामुळे प्रचंड उष्णता, प्रकाश आणि आवाज निर्माण होतो.
वीज कोसळणे ही नैसर्गिक आपत्ती आहे, जी अचानक आणि विध्वंसक स्वरूपात येते. यामुळे जिवीत आणि वित्तीय हानी होते. वीज कोसळणे हे वातावरणातील वायूंच्या घर्षणामुळे निर्माण होणारे एक शक्तिशाली विद्युत विच्छेदन आहे. यामुळे जंगलात आगी लागणे, घरांचे नुकसान होणे आणि वीजपुरवठा खंडित होणे असे दुष्परिणाम होतात. या आपत्तीमुळे पिकांचे नुकसान, पशुधनांचे मृत्यू आणि मानवी जीवितास धोका निर्माण होतो. पृथ्वीवर दर सेकंदाला ५० ते १०० वेळा वीज कोसळते.
यामुळे काहीवेळा मृत्यू किंवा कित्येक लोक कायमस्वरूपी अपंग होतात. होणारी हानी ही विजेची तीव्रता, परिसराची भौगोलिक रचना, त्या क्षेत्रातील लोकसंख्येची घनता, लोकांमधील जागरूकता आणि शहरीकरण यासारख्या घटकांवर अवलंबून असते. वीज कोसळून मृत्यू होण्याचे प्रमाण महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये नोंदले गेले आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ क्षेत्रांमध्ये सर्वाधिक (दर वर्षी २५० हून अधिक) मृत्यू दिसून येतात. वीज कोसळल्याने संपर्क यंत्रणा, संगणक साधने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांना सर्वात जास्त हानी होते. त्याबरोबरच वीजपुरवठा खंडित होणे, जंगलाला आग लागणे आणि विमानांना हानी पोहोचणे यांसारख्या अनेक आपत्ती दिसून येतात.
भारतातील बहुतांश भागांत वर्षाच्या कोणत्या ना कोणत्या काळात वादळी स्थिती अनुभवास येते. भारतीय उपखंडावर विविध हवामानातील तीव्रतेचा नेहमीच परिणाम दिसून येतो. खासकरून वादळी स्थिती दक्षिण भारतात मॉन्सूनपूर्व आणि उत्तर भारतात मॉन्सून काळात सर्वाधिक असते. संशोधनातून असे दिसून आले आहे की, भारतीय उपखंडावर वादळी परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम दिसून येतो. त्यागी (२००७) यांनी त्यांच्या संशोधनात असा उल्लेख केला आहे की, भारताच्या ईशान्य भागात, केरळच्या काही भागात आणि जम्मू आणि काश्मीरच्या काही भागात वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी ८० पेक्षा जास्त दिवस वादळी वारंवारता दिसून येते.
वीज कोसळणे म्हणजे काय?
वीज कोसळणे म्हणजे आकाशात तयार झालेल्या वीजेचा तीव्र प्रकाश आणि आवाज यामुळे होणारा अपघात होय. वीज ही आकाशात निर्माण होणारी विद्युत चमक आहे, जी वादळाच्या वेळी ढगांच्या घर्षणामुळे निर्माण होते. वीज कोसळण्याच्या वेळेस, वातावरणातील वायूंचे आयनायझेशन होऊन विद्युत प्रवाह निर्माण होतो, जो जमिनीपर्यंत पोहोचतो. यामुळे प्रचंड उष्णता, प्रकाश आणि आवाज निर्माण होतो.
वीज कोसळताना गडगडाट का होतो ?
वीज पडताना गडगडाट होण्याचे कारण विजेच्या अतिउष्णतेमध्ये दडलेले आहे. विजेचे तापमान साधारणपणे ३०,००० ते ५०,००० अंश सेल्सिअस इतके प्रचंड असते. वीजनिर्मितीच्या वेळी ढगांजवळची हवा विजेच्या अतिउष्णतेमुळे एकदम प्रसरण पावते. या अतिवेगाने प्रसारण पावणाऱ्या हवेच्या दाबामुळे मोठा गडगडाट निर्माण होतो.
ध्वनीचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असल्यामुळे, विजेचा लखलखाट प्रथम दिसतो आणि त्यानंतर थोड्या वेळाने गडगडाटाचा आवाज ऐकू येतो. म्हणजेच, विजेची चमक झटपट दिसते, परंतु त्यानंतरचा आवाज काही वेळाने पोहोचतो. हे अंतर, विजेच्या ठिकाणापासून आपल्या स्थानापर्यंतच्या ध्वनीप्रवाहाच्या अंतरावर अवलंबून असते.
वीजेचा गडगडाट वातावरणातील हवेमधील अचानक बदललेल्या दाबामुळे होतो, जो अति उष्णतेच्या परिणामामुळे निर्माण होतो. त्यामुळे वीज कोसळताना गडगडाट आणि विजेचा लखलखाट हे एकाच वेळी होणारे, पण वेगवेगळ्या वेळी अनुभवले जाणारे घटक असतात.
वीज कोसळल्याने होणारे नुकसान
प्रत्येक वर्षी वीज कोसळल्याने हजारो लोक मृत्युमुखी पडतात, अनेक जायबंदी होतात, विशेषतः ग्रामीण भागात शेतांमध्ये काम करतात वीज पडल्यास धोका निर्माण होतो.
वीजपुरवठा खंडित होणे हे याचे एक मुख्य कारण आहे, ज्यामुळे औद्योगिक, घरगुती आणि शेती विषयक कामांमध्ये मोठा अडथळा येतो. घरांची आणि इमारतींचे नुकसान होते.
विजेच्या प्रचंड उष्णतेमुळे जंगलात वणवे लागतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगले नष्ट होतात आणि जैवविविधता धोक्यात येते.
संगणक, दूरसंचार यंत्रणा, आणि इतर इलेक्ट्रॉनिक साधने विजेमुळे खराब होतात.
वीज कोसळताना विमान उड्डाणामध्ये अडथळा येऊ शकतो, ज्यामुळे प्रवासी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो.
वीज कोसळण्याच्या भीतीमुळे लोकांमध्ये मानसिक तणाव आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते.
उपाययोजना
धोक्याबद्दल माहिती करून घेण्यासाठी हवामान बदलाविषयी वारंवार अद्ययावत माहिती घेणे गरजेचे आहे. भारत हवामान विभागाच्या संकेतस्थळावर किंवा त्यांच्या विविध अॅप्सच्या माध्यमातून माहिती दिली जाते.
शाळा, महाविद्यालय आणि समाज माध्यमांद्वारे लोकांना वीज कोसळण्याच्या काळात काय करावे आणि काय करु नये याबद्दल माहिती देणे गरजेचे आहे.
कोणतेही स्थान संपूर्णपणे सुरक्षित नसले, तरी मोठ्या, बंदिस्त इमारती किंवा धातूची बंदिस्त वाहने, जसे कार, ट्रक, बसेस, व्हॅन आणि पूर्णपणे बंदिस्त वहान हे निवाऱ्यासाठी चांगले पर्याय आहेत. वीज कोसळण्याच्या काळात या ठिकाणी आसरा घेणे सर्वात सुरक्षित मानले जाते.
इमारतींवर लाइटनिंग अरेस्टर बसवणे हा वीज कोसळल्यामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठीचा एक प्रभावी उपाय आहे. लाइटनिंग अरेस्टर विद्युत प्रवाहाला जमिनीत सोडतात, ज्यामुळे इमारतींचे नुकसान टळते.
वीज कोसळण्याच्या काळात उघड्यावर जाणे टाळावे. झाडांच्या खाली थांबू नये. उघड्या मैदानात असताना लोखंडी वस्तूंना स्पर्श करू नये. जर आपण बाहेर असाल तर शक्यतो सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.
वीजनिर्मिती कोणत्या ढगांमध्ये होते ?
वीजनिर्मिती विशेषतः क्युम्युलोनिंबस ढगांमध्ये होते. हे ढग वीजनिर्मितीसाठी अत्यंत अनुकूल असतात. क्युम्युलोनिंबस ढग काळे, जड आणि अधिक घनतेचे असतात, ज्यांचा विस्तार पर्वताप्रमाणे उंच असतो. त्यांच्यावरील भागाचा आकार ऐरणीसारखा असतो तर खालील पृष्ठभाग सपाट असतो. हे ढग बहुतांश वेळा मुसळधार पाऊस, गडगडाट, वीज आणि गारायुक्त वळवाचा पाऊस यांच्याशी संबंधित असतात. तसेच वावटळ आणि वादळ निर्माण करण्याचे प्रमुख कारण ठरतात.
क्युम्युलोनिंबस ढगांमध्ये पाण्याच्या थेंबांसोबत बर्फाचे कण देखील असतात. या विविध घटकांमुळे विद्युत आवेश निर्मिती होते आणि विजेचा प्रचंड प्रकाश आणि आवाज निर्माण होतो. महाराष्ट्रातील मुसळधार पाऊस आणि वादळी वातावरणासाठी क्युम्युलोनिंबस ढग कारणीभूत ठरतात. त्यामुळे वीज कोसळण्याच्या काळात सुरक्षितता उपाययोजना अवलंबणे अत्यावश्यक असते.
वीजनिर्मिती होण्याची प्रक्रिया
वीजनिर्मिती होण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे. ढगांची निर्मिती होताना जमिनीवरून वर जाणारे उष्ण वारे थंड होऊ लागतात. यामुळे ढगांमध्ये पाण्याचे कण थंड होऊन कालांतराने ते हिमकणांमध्ये परिवर्तित होतात. उष्ण हवा वर जात राहते आणि थंड हवा खाली येते. या सततच्या प्रक्रियेमुळे ढगांमधील हिमकण एकमेकांवर घासतात, ज्यामुळे त्यांच्यावर धन (सकारात्मक) आणि ऋण (नकारात्मक) प्रभार तयार होतात.
या प्रक्रियेत धन प्रभार ढगांच्या वरच्या भागात एकवटतात, तर ऋण प्रभार ढगांच्या खालच्या भागात एकवटतात. याच वेळी, इंडक्शन प्रक्रियेमुळे जमिनीवर धन प्रभार निर्माण होतो. जेव्हा ढगांतील ऋण प्रभाराचे प्रमाण वाढते, तेव्हा ते जमिनीकडे आकर्षित होतात. भारांमधील फरकामुळे विद्युत प्रभाराची निर्मिती होते आणि विजेचा प्रचंड लखलखाट होतो. आकाश क्षणमात्र उजळते आणि वीज कोसळते. या काळात शक्तिशाली प्रकाश आणि आवाज निर्माण होतो, ज्यामुळे आकाशात प्रचंड गडगडाट होतो.
वीजनिर्मितीची ही प्रक्रिया वातावरणातील ऊर्जा आणि विद्युत आवेशांच्या सततच्या हालचालीमुळे घडते. यामुळेच वीजपुरवठ्यात व्यत्यय येतो, झाडे जळतात, आणि इमारतींचे नुकसान होते.
- डॉ. श्रद्धा बगाडे, ९६७३८०५३५३, (कृषी हवामानशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.