Manikrao Kokate Controversy : बेगानी शादीमें अब्दुल्ला दिवाना

Kokate Viral Video : कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी राजकीय वादात उडी घेऊन कृषिमंत्र्यांची वकिली करणे अप्रस्तुत ठरते.
Manikrao Kokate
Manikrao KokateAgrowon
Published on
Updated on

Agriculture Department Maharashtra : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या भवितव्याबाबतचा निर्णय काही तासांवर आला आहे. कृषिमंत्री विधानपरिषदेत मोबाईलवर कथितरित्या रमी खेळत असल्याची चित्रफीत व्हायरल झाल्यानंतर आठवडाभर त्यांच्याविषयी उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

त्यांचे पक्षश्रेष्ठी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर मौन सोडून सोमवारी किंवा मंगळवारी श्री. कोकाटे यांच्याशी समोरासमोर बोलू आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. त्यामुळे कृषिमंत्र्यांवरची टांगती तलवार कायम आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कृषी अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य सहायक कृषी अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य उप कृषी अधिकारी संघटना यासारख्या क्षेत्रीय संघटना कृषिमंत्र्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी कृषिमंत्र्यांची भलामण करत त्यांना या `कठीण काळात` निःसंदिग्ध आणि निःसंकोच पाठिंबा दिला आहे.

आपल्या प्रलंबित मागण्या श्री. कोकाटे यांनी मार्गी लावल्यामुळे संघटनांना त्यांच्याबद्दल उमाळा दाटून आला असावा. अर्थात ही गोष्ट खरी आहे की, कृषिमंत्री कोकाटे वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असले तरी प्रशासकीय यंत्रणेत त्यांची प्रतिमा चांगली आहे.

त्यांचे पूर्वसुरी धनंजय मुंडे, अब्दुल सत्तार, दादा भुसे आदी महनीयांप्रमाणे कोकाटे यांनी कृषी खात्याच्या प्रशासकीय कारभारात नको तितका हस्तक्षेप करण्याचे कटाक्षाने टाळले. सचिव आणि आयुक्तांच्या निर्णयांत ढवळाढवळ केली नाही.

हितसंबंधांना फाटा देत प्रशासकीय यंत्रणेला मुक्त वाव दिला. त्याचा परिणाम म्हणून अनेक गोष्टी मार्गी लागत असल्याचे सांगितले जाते. वानगीदाखल गुणनियंत्रण विभागाच्या रचनेतील बदल, कृषी समृद्धी योजनेचा वैशिष्ट्यपूर्ण शासनआदेश यांचा उल्लेख केला जातो.

Manikrao Kokate
Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्यावर सोमवारी निर्णय घेऊ; अजित पवार

भस्म्या झाल्याप्रमाणे पैसे खाण्याची हाव असणारे काही नमुनेदार मंत्री या खात्याने पाहिले. कोकाटे यांचे वर्तन त्याच्या विपरीत असून आपल्या मुरब्बी पूर्वसुरींप्रमाणे ते लक्ष्मीदर्शनासाठी हपापलेले नाहीत, असे त्यांच्याविषयी बोलले जाते. त्यांनी जवळपास ९८ टक्के पदांवरील बदल्यांचे अधिकार स्वतःहून सोडून देत दुभती गाय नाकारली. शेती क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांशी संवाद साधून त्यांचे मुद्दे विचारात घेण्याची सुरुवात केली.

ही सगळी कृषिमंत्र्यांची जमेची बाबू असली तरी वाणीवर नियंत्रण नसल्यामुळे या सगळ्यावर पाणी पडले. अर्थात त्यांनी पदाची सूत्रे घेऊन अल्प काळ झालेला असल्याने आजघडीला त्यांच्या कारकिर्दीचे मूल्यमापन करणे खूप घाईचे ठरेल. नकाशावर नुसती योग्य दिशा आखणे पुरेसे नसते, तर त्या बरहुकुम वाटचाल करण्यासाठी डोंगराएवढे काम करावे लागते. कृषिमंत्र्यांनी हौसले बुलंद दाखवले पण संयम, परिपक्वता आणि वाणीवर नियंत्रण यांचा अभाव असल्यामुळे सगळे मुसळ केरात गेले.

Manikrao Kokate
Manikrao kokate Controversy: रमी खेळा आणि माझ्यासाठी पैसे जिंका; शेतकऱ्याने कृषिमंत्र्यांना मनी ऑर्डर पाठवली

कृषिमंत्री ज्या वादात गळ्यापर्यंत अडकले आहेत, तो राजकीय आहे. कृषी खात्यातील प्रशासकीय निर्णयांशी त्याचा काही संबंध नाही. त्यामुळे कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांनी त्यात उडी घेऊन कृषिमंत्र्यांची वकिली करणे अप्रस्तुत ठरते. आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी जागरूक असणाऱ्या या संघटनांनी शेतकऱ्यांप्रति आपले कर्तव्य काय आहे आणि ते निभावण्यात आपण किती पुरे पडतो, याचे कधी आत्मपरीक्षण केल्याचे ऐकिवात नाही.

शेतकऱ्यांना नाडणाऱ्या प्रशासकीय व्यवस्थेचे आपण भोई आहोत, याबद्दल त्यांना कधी खंत वाटल्याचे जाणवत नाही. वादाचे किटाळ अंगावर आलेल्या कृषिमंत्र्यांची बाजू घेऊन किल्ला लढवणाऱ्या या संघटना शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात कधी बोलत्या झाल्याचे स्मरत नाही. बेगानी शादीमें दिवाना होणे अब्दुल्लाला शोभते; पण त्याचा कित्ता आपण गिरवण्याचे कारण काय, याचे उत्तर या संघटना देतील का?

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com