Rice Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Rice Cultivation : सुधारित तंत्राने कशी करावी भात लागवड?

Rice Producer : भात हे महत्त्वाचे अन्नधान्य पीक म्हणून ओळखले जाते. विविध कारणांनी भात उत्पादनात मोठी घट येते.

Team Agrowon

डॉ. नरेंद्र काशीद, डॉ. तुकाराम भोर व श्री. संदीप कदम

Rice Update : भात हे महत्त्वाचे अन्नधान्य पीक म्हणून ओळखले जाते. विविध कारणांनी भात उत्पादनात मोठी घट येते. भात पिकाचे सरासरी हेक्टरी उत्पादन कमी येण्याची अनेक कारणे आहेत. त्यात सुधारित लागवड पद्धती आणि पीक व्यवस्थापनाचा अभाव ही मुख्य कारणे आहेत.

सुधारित वाण

अ) महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी)

१) हळवा गट ः फुले राधा.

२) निमगरवा सुवासिक गट ः इंद्रायणी, फुले समृद्धी व भोगावती.

ब) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली)

१) हळवा गट : कर्जत - १८४, रत्नागिरी - ७११, रत्नागिरी - २४, कर्जत - ३, कर्जत - ७ व रत्नागिरी -५.

२) निमगरवा गट : कर्जत -५, कर्जत -६, बीएआरसीकेकेव्ही-१३ व पालघर - १, रत्नागिरी -८.

३) गरवा गट - रत्नागिरी -२, रत्नागिरी -३, कर्जत -२, कर्जत -८ व कर्जत -१०

४) संकरित गट - सह्याद्री, सह्याद्री - २, सह्याद्री - ३, सह्याद्री - ४ व सह्याद्री - ५

५) खार जमिनीसाठी - पनवेल १, पनवेल २ व पनवेल ३.

६) मूल्यवर्धन गट - रत्नागिरी -७ (लाल भात).

क) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला)

१) हळवा गट : साकोली ६ व सिंदेवाही १.

२) निमगरवा गट - साकोली ७, पीकेव्ही खमंग व पीकेव्ही गणेश.

३) गरवा गट - सिंदेवाही -४, सिंदेवाही -५ व पीकेव्ही मकरंद.

४) मूल्यवर्धन गट ः पीडीकेव्ही रेड राइस १.

ड) डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी)

प्रभावती, पराग, अंबिका व तेरणा.

बियाणे

सुधारित किंवा संकरित वाणांचे बियाणे शासकीय यंत्रणा किंवा कृषी विद्यापीठाच्या विक्री केंद्रातूनच खरेदी करावे. लागवडीसाठी योग्य, शुद्ध, निरोगी आणि दर्जेदार बियाणे वापरावे. बियाण्यांचे प्रमाण हे पेरणी अंतर, जातीपरत्वे, बियाण्यांचे वजन, आकार यानुसार कमी जास्त होते.

अ) पुनर्लागवड पद्धती

१) १००० दाण्यांचे वजन १४.५ ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या बारीक जातींसाठी ः

- २० बाय १५ सेंमी अंतर ः हेक्टरी १५.५ किलो.

- १५ बाय १५ सेंमी अंतर ः हेक्टरी २० किलो.

२) मध्यम दाणे असलेल्या जाती

- १००० दाण्यांचे वजन १४.५ ग्रॅमपेक्षा जास्त आणि २० ग्रॅमपेक्षा कमी असेल ः हेक्टरी २५ ते ३० किलो.

३) मध्यम जाड जातींसाठी

- १००० दाण्यांचे वजन २० ते २५ ग्रॅम असेल, तर हेक्टरी ३५ ते ४० किलो बियाणे.

४) जाड जातींसाठी

१००० दाण्यांचे वजन २५ ग्रॅमपेक्षा जास्त असेल, तर हेक्टरी ४० ते ४५ किलो.

५) संकरित जाती : हेक्टरी २० किलो.

ब) पेरणी पद्धती

हेक्टरी ५० ते ६० किलो.

क) टोकण पद्धती

हेक्टरी २० ते ३० किलो.

ड) रहू पद्धती

हेक्टरी ६० ते ७५ किलो.

बीजप्रक्रिया

अ) मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया लागवडीपूर्वी भात बियाणे ३ टक्के मिठाच्या द्रावणात (१० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ विरघळून द्रावण करावे) बुडवावे. त्यानंतर पाण्यावर तरंगणारे हलके बी काढून नष्ट करावे. भांड्याच्या तळाशी राहिलेले जड बी २ ते २ वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत वाळवावे. त्यानंतर बुरशीनाशक व जिवाणूनाशकाची बीजप्रक्रिया करावी.

ब) करपा, पर्ण करपा, तपकिरी ठिपके, उदबत्ता आणि आभासमय काजळ नियंत्रणासाठी, प्रतिकिलो बियाण्यांस कार्बेन्डाझिम किंवा बेनलेट ३ ग्रॅम या प्रमाणे चोळावे.

क) कडा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, स्ट्रेप्टोसायक्लिन ३ ग्रॅम किंवा अ‍ॅग्रीमायसीन २.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या द्रावणात बियाणे आठ तास भिजवावे. त्यानंतर बियाण्यावर ॲझोटोबॅक्टर २५० ग्रॅम व स्फुरद विरघळविणारे जिवाणू २५० ग्रॅम प्रति १० किलो याप्रमाणे किंचित ओलसर करून चोळावे. सावलीत अर्धा तास सुकवून त्वरित पेरणी करावी.

रोपवाटिका व्यवस्थापन

- भाताची पेरणी १५ मे ते २५ जूनपर्यंत १ ते १.२० मी. रुंद व ८ ते १० सेंमी उंच गादीवाफ्यावर करावी. एक हेक्टर क्षेत्रासाठी १० गुंठे रोपवाटिका पुरेशी होते.

- वाफे तयार करताना प्रति गुंठा क्षेत्रास शेणखत २५० किलो, नत्र ५०० ग्रॅम, स्फुरद ५०० ग्रॅम व पालाश ५०० ग्रॅम मातीत मिसळावे.

- पेरणी ओळीत व विरळ करावी.

- रोपांच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर १५ दिवसांनी प्रति गुंठा क्षेत्रास ५०० ग्रॅम नत्र द्यावे.

पुनर्लागवड

- रोपांच्या पुनर्लागवडीसाठी पारंपरिक पद्धतीने किंवा यंत्राच्या साह्याने चिखलणी करावी.

- हळव्या जातींची पुनर्लागवड पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी, निमगरव्या जातींची २३ ते २७ दिवसांनी व गरव्या जातींची २५ ते ३० दिवसांनी करावी.

- एका चुडात २ ते ३ रोपे ठेवावीत. संकरित जातींसाठी एका चुडात फक्त १ ते २ रोपे ठेवावीत.

- हळव्या जातींच्या रोपांची लावणी १५ बाय १५ सेंमी, तर निमगरव्या व गरव्या जातींची २० बाय १५ सेंमी अंतरावर करावी.

चारसूत्री पद्धतीने पुनर्लागवड : (डॉ. नारायण सावंत यांच्या चारसूत्री लागवडीची सूत्रे)

सूत्र १ - भात पिकाच्या अवशेषांतील (तुसाचा व पेंढ्याचा) सिलिकॉन व पालाश या अन्नद्रव्यांचा वापर

अ) भाताच्या तुसाची काळी राख रोपवाटिकेत बी पेरण्यापूर्वी मिसळणे

भाताच्या राख (पूर्ण जळालेली पांढरी राख नव्हे) रोपवाटिकेमध्ये, गादीवाफ्यात भाताचे बी पेरण्यापूर्वी प्रती चौरस मीटर एक किलो या प्रमाणात ४ ते ७ सेंमी खोलीपर्यंत मातीत मिसळावी. नंतर प्रक्रिया केलेले भाताचे बी त्याच ओळीत पेरावे.

ब) भाताचा पेंढा लावणीपूर्वी शेतात गाडणे

भाताचा पेंढा पहिल्या नांगरणीच्या वेळी हेक्टरी २ टन या प्रमाणात शेतात गाडून घ्यावा.

फायदे

- पिकास पालाश २० ते २५ ग्रॅम आणि सिलिका १०० ते १२० ग्रॅम प्रमाणे पुरवठा होतो. सेंद्रिय पदार्थांत वाढ होते.

- रोपे निरोगी व कणखर होतात.

- रोपांच्या अंगी खोडकिडीला प्रतिकार करण्याची क्षमता वाढते.

सूत्र २ : गिरिपुष्प (ग्लिरिसिडीया) हिरवळीच्या खताचा वापर

गिरिपुष्प या वनस्पतीच्या पाल्याचा वापर हिरवळीचे खत म्हणून केला जातो. चिखलणीपूर्वी ६ ते ८ दिवस प्रतिगुंठा ३० किलो हिरवी पाने जमिनीत गाडावीत.

फायदे

- रोपांना सेंद्रिय नत्र (हेक्टरी १० ते १५ किलो) वेळेवर मिळते.

- खाचरात सेंद्रिय पदार्थ मिळून जमिनीची जडणघडण सुधारते.

- गिरिपुष्पाच्या झाडापासून उंदीर लांब पळतात.

सूत्र ३ : नियंत्रित पुनर्लागवड

दोरीवर २५ सेंमी व १५ सेंमी आलटून पालटून (-२५-१५-२५-१५- सेंमी) अंतरावर खुणा कराव्यात. सुधारित लावणी दोरीवर १५ सेंमी अंतरावर (प्रत्येक २ ते ३ रोपे प्रति चूड) प्रथम एक व नंतर दुसरा चूड लावावा. अशाप्रकारे एकावेळी जोड-ओळ पद्धतीने त्याच दोरीत लावणी पूर्ण करावी. खाचरात १५ बाय १५ सेंमी चुडांचे चौकोन व २५ सेंमी चालण्याचे रस्ते तयार होतात. संकरित भातासाठी एका ठिकाणी एक रोप लावावे. रोपे सरळ व उथळ २ ते ४ सेंमी खोलीवर लावावीत.

फायदे

- प्रचलीत पद्धतीपेक्षा बियाण्यांची ३० टक्के बचत.

- रोपे तयार करण्याचे श्रम व पैसा वाचतो.

- युरिया ब्रिकेट्सचा कार्यक्षम वापर.

सूत्र ४ : नियंत्रित पुनर्लागवडीनंतर त्याच दिवशी प्रत्येक चार चुडांच्या चौकोनात मधोमध सरासरी २.७ ग्रॅम वजनाची (युरिया-डीएपी) १ ब्रिकेट (खताची गोळी) हाताने ७ ते १० सेंमी खोल खोचावी.

- युरिया-डीएपी खत (६०:४० मिश्रण) वापरून ब्रिकेट्‍स (२७ ग्रॅम प्रति १० ब्रिकेट्स) ब्रिकेटिंग मशिनद्वारे तयार करता येतात. एका गुंठ्यामध्ये ६२५ ब्रिकेट्‍स (१.७५ किलो) पुरेशा होतात. यातून मिळणाऱ्या खताची मात्रा हेक्टरी ५७ किलो नत्र, २९ किलो स्फुरद इतकी असते.

फायदे

- पाण्याबरोबर नत्र व स्फुरद खते वाहून जात नाही.

- दिलेल्या खतापैकी ८० टक्क्यांपर्यंत नत्र भात पिकास उपयोगी पडते.

- खत मात्रेत ४० टक्क्यांपर्यंत बचत.

- ब्रिकेट्‍स खोल खोचल्यामुळे अन्नद्रव्ये तणाला मिळत नाहीत. त्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. चारसूत्री पुनर्लागवडीचे हे तंत्रज्ञान सोपे, शास्त्रीयदृष्ट्या कार्यक्षम, एकूण लागवडीचा (बी, मजूर व खत यांचा) खर्च कमी करणारे, वातावरणाचे प्रदूषण टाळणारे व भातशेती निश्‍चितपणे फायदेशीर करणारे आहे.

संपर्क - डॉ. नरेंद्र काशीद, ९४२२८५१५०५, (प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, वडगाव मावळ, जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT