समीर गायकवाड38 year Old Cow Story: केन सिमन्स यांची छोटीशी शेती न्यूझीलंडच्या शांत ग्रामीण भागात होती. एकेकाळी त्यांच्याकडे भरपूर गाई होत्या, त्यांची देखभाल होईनाशी झाली तशी त्यांनी गाईंची संख्या घटवली, अखेरीस त्यांच्यापाशी एकच गाय उरली. सिल्व्हरसाइड वंशाची ही कालवड बघता बघता मोठी झाली आणि त्यांच्या काळजाचा तुकडा होऊन राहिली. ती ३८ वर्षांची होती. ‘गर्ल’ला अखेरच्या आठ वर्षांत वेत झालं नव्हतं, ती एक भाकड गाय झाली होती तरीदेखील ती दूध देत होती. हा एक कौतुकाचा विषय होता!.केन सिमन्स हे न्यूझीलंडमधील ८५ वर्षांचे एक वृद्ध शेतकरी. वेलिंग्टनच्या उत्तरेस असणाऱ्या पामस्टन काऊंटीमध्ये त्यांचे छोटेसे शेत होते. त्यांच्याकडे एक गाय होती, जी तब्बल अडोतीस वर्षांची होती. जगातल्या सर्वाधिक वयस्कर गाईंपैकी एक! ही गाय त्यांच्या गोठ्यात जन्मलेली वाढलेली, त्यांनी तिचे नाव गर्ल ठेवलेलं. त्यांची ती लाडकी लेक.ही सत्यकथा केवळ एका शेतकऱ्याची नसून एका वृद्ध माणसाची आणि त्याच्या प्रिय गाईसोबतच्या असामान्य मैत्रीची, प्रेमाची आणि एकमेकांना आधार देण्याची हृदयस्पर्शी गाथा होय. २००७ साली त्यांच्या बातमीने न्यूझीलंडचे लक्ष वेधून घेतले आणि ते चर्चेचा विषय झाले. पूर्वेकडील अनेक देशांत त्यांच्या पशूप्रेमाचे दाखले दिले जाऊ लागले..केन सिमन्स यांची छोटीशी शेती न्यूझीलंडच्या शांत ग्रामीण भागात होती. केन वयोवृद्ध असले तरी ते खूप सक्रिय असत, सगळी कामे करत आणि आजूबाजूच्या लोकांशी प्रेमाने बोलत, तिथल्या शेतीमातीवर ते नितांत जीव लावत. त्यामुळे त्यांना ‘केन पापा’ नाहीतर ‘चार्ली ब्राऊन’ या नावाने ओळखलं जाई.ते स्वतःला नेहमी तरुण समजत. कामात व्यग्र ठेवत. एकेकाळी त्यांच्याकडे भरपूर गायी होत्या, त्यांची देखभाल होईनाशी झाली तशी त्यांनी गायींची संख्या घटवली, अखेरीस त्यांच्यापाशी एकच गाय उरली..Success Story: पूरक उद्योगातून सक्षम झाल्या महिला .सिल्व्हरसाइड वंशाची ही कालवड बघता बघता मोठी झाली आणि त्यांच्या काळजाचा तुकडा होऊन राहिली. केन सिमन्स प्रकाशझोतात आले तेव्हा त्यांची लाडकी गर्ल ३८ वर्षांची होती यावरून त्यांचा सहवास किती दीर्घ आणि स्नेहार्द्र होता हे लक्षात येईल.‘गर्ल’ला अखेरच्या आठ वर्षांत वेत झालं नव्हतं, ती एक भाकड गाय झाली होती तरीदेखील ती दूध देत होती. हा एक कौतुकाचा विषय होता!अडोतीस वर्षांची एक गाय जिच्या अखेरच्या आठ वर्षांत एकही वेत झाले नव्हते, ती दूध देत होती आणि बहुधा केनवरच्या प्रेमापोटीच तिच्या कासेतून दूध पाझरत असावे..गर्लचे दात गळून पडले होते, ती चारा चावू शकत नव्हती म्हणून केन रोज तिला हाताने खाऊ घालत. गर्लवरील प्रेमाने त्यांच्या आयुष्यात एक अनोखी कालबद्ध शिस्त आणली होती.दररोज सकाळी आठ वाजता, केन त्यांच्या जुन्या सायकलवरुन शेताकडे रवाना होत. त्यांच्या पाठीवर एक घरगुती बनावटीचा बॅकपॅक असायची, जी घरून निघताना रिकामी असे. वाटेवरच्या हिरव्यागार माळांवरचा हिरवा लुसलुशीत कोवळा चारा ते गोळा करायचे.काही ठिकाणी मोठं गवत असलं तर हातानेच त्याचे बारीक तुकडे करत, हा चारा त्या बॅकपॅकमध्ये भरून ते पुढे निघत. शेतात गर्ल त्यांची वाट बघत बसलेली असे, केन येताच ती उठून उभी राही. तिला केनचा गंध यायचा. केन जसजसे शेताजवळ येऊ लागत तसतसे गर्ल आपले कान टवकारत असे..अखेर ते शेतात पोहोचत. ती सावकाश पावले टाकत शांतपणे त्यांच्याजवळ यायची. जवळ येताच ते तिच्याशी बोलत. बापलेकीसारखं त्यांचं हितगूज चाले. ‘माझी लेक आज कशी आहे?’ असं त्यांनी विचारताच गर्ल तिच्या डोक्याचे भेंडोळे हलवून लाडाचा हुंकार भरे! मग आपल्या सायमाखल्या हातांनी तिला चारा खाऊ घालत.तिला खाऊ घालून झाले की, केन एक प्लॅस्टिक बकेट उलटे करून त्यावर बसत आणि ‘गर्ल’चे दूध काढत. हे दूध ते स्वतःसाठी वापरत, कस्टर्ड आणि स्कोन्स बनवण्यासाठी ते त्यांच्या कामी येई..Winter Cow Care: हिवाळ्यातील संकरित गाईंच्या आरोग्याचे व्यवस्थापन.आपण आपले मानसपिता केन यांच्यासाठी किमान काहीतरी करतोय या भावनेने गर्ल दूध द्यायची असे पशूचिकित्सकांचे मत होते. त्यांचा सहवास तीन दशकांचा असल्याने त्यांच्यात एक अनोखे बॉंडिंग होते, त्याचाच हा भाग होता. केन सांगत असत की गर्ल त्यांच्यासाठी फक्त गाय नसून त्यांची मुलगी आहे, कुटुंबाचा घटक आहे. केन एकटे असत आणि गर्ल त्यांना साथ सोबत देई. जेव्हा गर्ल आजारी असे किंवा कमजोर वाटे, तेव्हा केन तिला जिवापाड जपत, मायेने जोजवत असत.‘मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. ती माझी एकमेव साथी आहे.’ असं केन अभिमानाने सांगत. गर्लची शांत प्रेमळ वृत्ती आणि मायेने देखभाल करण्याचा केनचा स्वभाव यांचे अजोड कॉम्बिनेशन त्यांना जगवत होतं. गाय हा विलक्षण मायाळू हळवा जीव, जो खूपसा सोशल आहे, त्यामुळेच ते दोघे एकमेकांना जिवंत ठेवू शकले..केन यांना २००७ मध्ये स्ट्रोक आला. ते रुग्णालयात दाखल झाले आणि तब्बल महिन्याभराच्या काळासाठी गर्लपासून दूर राहिले! या दिवसात केनला गर्लची खूप चिंता वाटलेली. भेटायला येणाऱ्या प्रत्येकापाशी ते म्हणत, ‘मी तिला सोडू शकत नाही.’ दुसरीकडे, गर्लही उदास आणि कमजोर झाली.केनची शेजारीण, मित्र आणि आस्थेने विचारपूस करणारी सहृदयी शॅरोन किटो रोज गर्लपाशी जाऊन तिची काळजी घेत असे, ती आल्यावर गर्लला हायसे वाटे मात्र काही वेळातच तिची नजर केनला शोधत असे..केन रुग्णालयात होते तेव्हा गर्लच्या फोटोंकडे पाहत, गर्लच्या भेटीच्या ओढीनेच त्यांना जगण्याची प्रेरणा दिली. प्रत्येक उदास दिवशी ते तिच्या फोटोकडे पाहत आणि जगण्याची लढाई पुन्हा लढत.किवी मीडियाने या घटनेला मोठी प्रसिद्धी दिली, ज्यामुळे लोकांनी केन आणि गर्लसाठी मदत पाठवली - पैसा, चॉकलेट्स, कार्ड्स आणि अगदी गायीचा फोटो असलेल्या फ्रेम्स देखील.अखेर, एका शुक्रवारी, केन रुग्णालयातून बाहेर पडले आणि थेट गर्लला भेटण्यासाठी शेतात गेले. ते गर्लला पाहताच म्हणाले, ‘हे दृश्य खूप छान आहे, आपली भेट होतेय हीच एक जबरदस्त गिफ्ट आहे!’.गर्लने केनला दुरूनच ओळखले आणि ती जवळजवळ धावतच त्यांच्यापाशी आली. जवळ येऊन आपल्या काटेरी मलूल जिभेने त्यांना चाटू लागली.त्या दिवशी केननी तिला मोलॅसेस आणि नट्सचे केक खाऊ घातले. ते दवाखान्यात होते तेव्हा त्यांनी ताकीद दिली होती की काहीही झाले तरी गर्लच्या खाण्यापिण्याची आबाळ होता कामा नये.गर्ल खूपच समजूतदार आणि सोशिक होती. रोजचा दिवस त्यांना नवे आयुष्य बहाल करत राहिला. एके दिवशी गर्ल तिच्या लाडक्या बापाला सोडून गेली आणि त्यानंतर काही दिवसांतच केनही गेले..ते दोघेही एकमेकाच्या जीवनास पूरक होते. मानवी जीवनाचा आणि मूल्यांचा पाया असणारे प्रेम, आस्था आणि माया हे त्यांच्या ठायी होते!मनात किल्मिष नसले तर पशुपक्षाच्या काळजातलं देखील आपल्याला कळू शकतं आणि मन विषाक्त असलं तर आपण केवळ नि केवळ विखारच पसरवत राहतो. दिवाळीत आपण वसुबारस साजरी केली. आपल्या अंतरीचा प्रेमभाव विझलेला असेल तर हे सण साजरा करण्याचा आपल्याला हक्क नाही!८३८०९७३९७७(लेखक समाजस्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे साहित्यिक आहेत.) .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.