Operation Sindoor Agrowon
ॲग्रो विशेष

Operation Sindoor: पहलगाम हल्ल्याचा बदला; ‘ऑपरेशन सिंदूर!'

Indian Army Strike:‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर निशाणा साधून मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे ९० ते १०० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज आहे, तर पाकिस्तानने प्रतिउत्तरादाखल जोरदार गोळीबार सुरू केला आहे.

Team Agrowon

New Delhi News: भारतीय लष्कराने बुधवारी (ता. ७) पहाटे एक ते दीडच्या सुमारास ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवित पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनाच्या नऊ ठिकाणांवर लक्ष्यवेधी हल्ले केले. यामध्ये जैशे महंमद, लष्करे तैयबा, हिज्बुल मुजाहिदीन या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनाच्या मुख्यालयांसह नऊ तळ आणि लाँचपॅड उद्‌ध्वस्त करण्यात आले. भारताच्या या मोठ्या कारवाईत सुमारे ९० ते १०० दहशतवादी मारले गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे हादरलेल्या पाकिस्तानने सीमाभागात जोरदार गोळीबार आणि बाँबफेक केली.

पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. दहशतवाद्यांसह पाकिस्तानवर मोठी कारवाई करण्याची मागणी जनतेकडून होत असतानाच केंद्रात उच्चपातळीवर बैठकांचे सत्र सुरू होते. कारवाई होणार की नाही, होणार असेल तर कधी होणार याबाबत आडाखे बांधले जात असतानाच कारवाईच्या शक्यतेने धास्तावलेल्या पाकिस्तानमधील आणि पाकव्याप्त काश्‍मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर भारतीय लष्कराने पहाटे १.०५ ते १.३० वाजेदरम्यानच्या २५ मिनिटांच्या कालावधीत जोरदार हवाई हल्ले केले.

‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाने राबविलेल्या या मोहिमेत जैशे महंमद, लष्करे तैयबा, हिजबुल मुजाहिदीन या संघटनाचे नऊ तळ, प्रशिक्षण केंद्र आणि लाँचपॅड उद्‌ध्वस्त करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कारवाईवर लक्ष ठेवून होते. दहशतवादी तळ उद्‌ध्वस्त झाल्यानंतर लष्करातर्फे मध्यरात्री १.५१ मिनिटांनी ‘अखेर न्याय झाला, जय हिंद’ या सूचक ट्विटसह ‘ऑपरेशन सिंदूर’ची घोषणा केली. पाठोपाठ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही मध्यरात्री २.४६ मिनिटांनी ‘भारत माता की जय’ असे ट्विट करत या कारवाईला सूचक दुजोरा दिला.

येथे झाली कारवाई

पाकिस्तान

१) मरकज सुभानअल्ला, बहावलपूर (जैशे महंमदचे मुख्यालय)

२) मरकज तैयबा, मुरीदके (लष्करे तैयबाचे मुख्यालय)

३) सरजल, तेहरा कला (जैशे महंमदचा तळ)

४) महमूना जोया, सियालकोट (हिज्बुल मुजाहिदीनचा प्रशिक्षण तळ)

पाकव्याप्त काश्‍मीर

१) मरकज अहले हदीस, बर्नाला कॅम्प, भिंबर (लष्करे तैयबाचा तळ)

२) मरकज अब्बास, कोटली (जैशे महंमदचा तळ)

३) मरकज राहील शाहीद, कोटली (हिज्बुल मुजाहिदीनचा प्रशिक्षण तळ)

४) सवाईनाला कॅम्प, मुझफ्फराबाद (लष्करे तैयबाचा तळ)

५) सैयदना बिलाल कॅम्प, मुझफ्फराबाद (जैशे महंमदचा तळ)

ठळक घडामोडी

- श्रीनगरसह काही महत्त्वाच्या शहरांतील विमान उड्डाणे रद्द

- पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या पाच जिल्ह्यांमधील शाळा बंद

- पंजाबमधील पठाणकोट, फिरोजपूर, अमृतसरमधील शाळाही ठेवल्या बंद

- दिल्लीमधील सुरक्षा व्यवस्था वाढविली

- उत्तर प्रदेशमध्ये ‘रेड अलर्ट’

- सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री, पक्षनेत्यांकडून कारवाईचे स्वागत

‘हल्ले रोखण्यासाठीच मोहीम’

पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये लष्करी कारवाई केल्यानंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी बुधवारी (ता. ७) सकाळी पत्रकार परिषद घेत ‘ऑपरेशन सिंदूर’ची औपचारिक घोषणा केली. दहशतवाद्यांकडून भविष्यात होऊ शकणारे हल्ले रोखण्यासाठीच ही मोहीम राबविल्याचे मिस्त्री यांनी स्पष्ट केले. यावेळी लष्कराच्या प्रतिनिधी कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या प्रतिनिधी विंग कमांडर व्योमिका सिंग उपस्थित होत्या. त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची तपशीलवार माहिती दिली.

सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर देण्याचा आणि प्रतिबंध करण्याचा आपला अधिकार भारताने बजावला. ही कारवाई नियंत्रित, टप्प्याटप्प्यांत, योग्य प्रमाणात आणि जबाबदारीने करण्यात आली. दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणे आणि भारतात घुसखोरीसाठी सज्ज असलेल्या दहशतवाद्यांना निष्क्रिय करणे हाच या कारवाईचा उद्देश होता, असेही मिस्‍त्री यांनी स्पष्ट केले. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान उद्‌ध्वस्त झालेल्या दहशतवादी तळांची छायाचित्रे तसेच हल्ल्याचे व्हिडिओ यासारखी माहिती प्रसारमाध्यमांसमोर सादर केली. पहलगामसह यापूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या संघटनांचे तळ उद्‌ध्वस्त केल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

‘दोन्ही देशांतील शत्रुत्व लवकरच संपेल’

भारताने पाकिस्तानसह पाकव्याप्त काश्मिरातील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याच्या पार्श्वभूमीवर भारत व पाकिस्तानने संयम राखावा, दोन्ही देशांतील शत्रुत्व लवकरच संपेल, अशी अपेक्षा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी व्यक्त केली. भारत व पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष जगाला परवडणारा नाही. त्यामुळे दोन्ही देशांनी जास्तीत जास्त लष्करी संयम पाळावा, असे आवाहन गुटेरस यांनी केले.

शेख सज्जाद गुल हाच मास्टरमाइंड

लष्करे तय्यबाच्या द रेसिस्टन्स फ्रंटचा म्होरक्या शेख सज्जाद गुल (वय ५०) हाच पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या हल्ल्यात यात नेपाळच्या एका नागरिकासह २६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने घेतली होती.

शेख सज्जाद गुल सध्या रावळपिंडी कॅन्टोन्मेंटमध्ये लपून बसलेला असून त्याला लष्करे तय्यबाकडून आश्रय मिळाला आहे. सज्जाद अहमद शेख या नावानेही तो ओळखला जातो. २०२० ते २०२४ या काळात मध्य आणि दक्षिण काश्मीरमधील टार्गेट किलिंगचे कारस्थान रचणे, २०२३ मध्ये ग्रेनेड हल्ले, अनंतनागमधील बिजबेहऱ्यात पोलिस कर्मचाऱ्यावरील हल्ला, गगनगीर आणि झेड-मोड बोगद्याजवळचे हल्ल्यात गुलचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनआयएने एप्रिल २०२२ मध्ये त्याला दहशतवादी घोषित केले आणि त्याला पकडण्यासाठी १० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले आहे.

‘तणाव संपविण्यासाठी तयार आहोत’

भारताने परिस्थिती सामान्य केल्यास आम्ही भारताबरोबरचा तणाव पूर्णपणे संपविण्यासाठी तयार आहोत. भारताने हल्ला केला तरच पाकिस्तान प्रत्युत्तर देईल असे वक्तव्य पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केल्याचे वृत्त ब्लूमबर्ग टीव्हीने दिले आहे.

‘युद्धखोर कृती’

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या कारवाईला ‘युद्धखोर कृती’ असल्याचे संबोधत प्रत्युत्तर देण्याचा आम्हाला अधिकार असल्याची दर्पोक्ती केली आहे. भारताच्या कारवाईत किमान ९० दहशतवादी मारले गेल्याचा अंदाज असला तरी पाकिस्तानने मात्र पंजाब प्रांत आणि पाकव्याप्त काश्मीरमधील सहा ठिकाणे मिळून २६ जणांचा मृत्यू, तर ४६ जण जखमी झाल्याचे म्हटले आहे.

भारताने केलेल्या प्रतिहल्ल्यामुळे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळेल. या मोहिमेला दिलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव अगदी समर्पक असून यापेक्षा वेगळे नाव असूच शकत नाही.
अर्थ्या, दिवंगत एन. रामचंद्रन यांच्या कन्या (कोची)
माझे वडील आणि काका यांच्या आत्म्याला आज खऱ्या अर्थाने शांती मिळाली. ऑपरेशन सिंदूरबाबत मी पूर्ण समाधानी आहे. भविष्यामध्ये देखील अशा प्रकारच्या मोहिमा राबविण्यात याव्यात.
हर्षल लेले, दिवंगत संजय लेले यांचे पुत्र (मुंबई)
भारतीय लष्कराने केलेली कारवाई योग्यच आहे पण ज्या चौघांनी पहलगाममध्ये हल्ला केला त्यांना ठार मारणे गरजेचे आहे. दहशतवाद्यांचे कृत्य हे सैतानीच होते. आज इतर दहशतवाद्यांना ज्या पद्धतीने ठार मारण्यात आले त्याच पद्धतीने पहलगामच्या हल्लेखोरांचा देखील खातमा करण्यात यावा.
जेनिफर नॅथेनियल, सुशील नॅथेनियल यांच्या वीरपत्नी (इंदूर)

मौलाना मसूदचे अख्खे कुटुंब ठार

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईत दहशतवादी संघटना जैशे महंमदचा म्होरक्या मसूद अझहरच्या कुटुंबातील दहा जण ठार झाले आहेत. खुद्द मसूद अजहरनेच मारल्या गेलेल्या लोकांची माहिती दिली आहे. बहावलपूर येथील दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करताना मसूद अझहरच्या कुटुंबातील लोक मारले गेले. भारताने केलेल्या कारवाईत मसूदच्या नातेवाईकाबरोबरच त्याचे चार निकटवर्तीय देखील ठार झाले आहेत. बहावलपूर येथील जामिया मशिद सुभान अल्ला येथे झालेल्या हल्ल्यात मसूद अझहरची मोठी बहिण, तिचे पती, एक भाचा आणि त्याची पत्नी आणि आणखी एक भाची तसेच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे, असे मसूदच्या निवेदनात म्हटले आहे.

मसूद अजहरचा नजिकचा सहकारी आणि त्याची आई आणि अन्य दोन सहकाऱ्याचा देखील मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात कुटुंब उद्ध्ववस्त झाल्याने मसूद अजहरला रडू कोसळल्याचे माध्यमांनी म्हटले आहे. या हल्ल्यात दहशतवादी कारी महंमद इक्बालचा देखील मृत्यू झाला. कारी इक्बाल हा कोटली येथील दहशतवादी प्रशिक्षण केंद्राचा कमांडर होता. त्याच्यासमवेत अन्य दहा दहशतवादी देखील ठार झाले. शिवाय बिलाल दहशतवादी केंद्राचा म्होरक्या याकुब मुघल देखील मारला गेला. दरम्यान, पंजाबच्या माहिती मंत्री अजमा बोकहरी यांनी बहावलपूर हल्ल्यात जखमी झालेल्यांना व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगितले.

पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार

श्रीनगर : भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर काल मध्यरात्री हल्ले केल्यानंतर लगेचच पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू-काश्‍मीरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) गोळीबार करण्यास सुरुवात केली. यात नऊ नागरिकांचा मृत्यू झाला असून ५० जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानी सैन्याने बुधवारी सकाळी पूँच आणि मन्धर भागात ‘एलओसी’वर गोळीबार आणि तोफांचा मारा केला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. उरीतील सलमाबाद येथील नौपोरा आणि कलगी येथेही रात्री ११ नंतर मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला असून अनेक नागरिक जखमी झाले. राजौरीतील गोळीबारात तीनजण जखमी झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT