
सुनिल चावके
Pakistan-Occupied Kashmir independence: सतरा वर्षांपूर्वी म्हणजे २००८ मध्ये सप्टेंबर महिन्यात ‘लेहमन ब्रदर्स’च्या दिवाळखोरीमुळे अमेरिकेत आलेली आर्थिक मंदीमुळे जगभरातील अर्थव्यवस्था खिळखिळ्या होत असतानाच २६/११ च्या पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्याने भारताची आर्थिक राजधानी मुंबई हादरली. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती घडताना दिसत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयातशुल्क धोरणामुळे जगभरावर घोर मंदीचे सावट पसरणार, अशी शंका व्यक्त केली जात असतानाच पहलगाममध्ये २६/११ ची पुनरावृत्ती करणाऱ्या दहशतवादी हल्ल्याने भारताच्या आत्म्यावर पुन्हा आघात केला आहे.
आधीच मंदी त्यात भारताला युद्धासाठी प्रवृत्त करणारा दहशतवादी हल्ला अशी २००८ ची स्थिती होती. त्यावेळी मनमोहन सिंग सरकारने युद्धाचे आव्हान स्वीकारण्याचे टाळून पाकिस्तानला कूटनीतीने जगापुढे लज्जित करण्यावर भर दिला. कारण त्यावेळी जगाला आणि भारताला मंदीचा विळखा पडला होता. त्यात युद्धाची भर पडणे म्हणजे ‘दुष्काळात तेरावा’ ठरला असता. पण २०२५ म्हणजे २००८ नाही आणि नरेंद्र मोदी म्हणजे मनमोहन सिंग नाहीत. शिवाय मंदी अजून आलेली नाही. तिला येऊ द्यायचे की नाही, हे ट्रम्प यांना ठरवायचे आहे. त्यामुळे पहलगामच्या घटनेचा कुणी कल्पनाही केली नसेल असा बदला घेणार, अशी प्रतिज्ञा करुन पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानविरुद्ध युद्धाचे रणशिंग फुंकले आहे. वेळ आणि स्थळ त्यांनाच निवडायचे आहे.
तीन युद्धे सुरू
जगात २००८ मध्ये कुठेही युद्ध होत नव्हते. फक्त जागतिक मंदीच होती. पण सध्या दोन रणांगणातील आणि एक आर्थिक अशी तीन युद्धे जगात सुरु आहेत. तीन वर्षांपासून सुरु असलेल्या रशियाविरुद्ध युक्रेन युद्धात अवघा युरोप गुंतला आहे. अवघ्या ३६५ चौरस किमी क्षेत्रफळाच्या गाझा पट्टीत दीड वर्षांपासून सुरु असलेल्या इस्राईलविरुद्ध हमास युद्धामुळे प. आशियात तणाव आहे. अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमध्ये आयातशुल्कावरुन भडकलेल्या आर्थिक युद्धामुळे जगभरात अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यात आता भारत-पाकिस्तान युद्धाची भर पडणार असेल तर आग्नेय आशियातही तणावाची लागण होईल.
पाकिस्तानच्या सततच्या दहशतवादी कुरापतखोरीचा भारताला कधीतरी कायमचा हिशेब करावाच लागणार आहे. १९७१ च्या बांगला देश युद्धात झाला होता तसा. पहलगामच्या दुर्दैवी घटनेचा बदला घेऊन काश्मीर खोऱ्यात पर्यटकांच्या मनात पुन्हा विश्वास निर्माण करायचा असेल तर पाकिस्तानच्या मर्मस्थळीच घाव घालावे लागतील. नऊ वर्षांपूर्वी भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक करुन पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते, तर सहा वर्षांपूर्वी भारतीय हवाई दलाने बालाकोटवर हल्ले होते. यावेळी वेगळे काही तरी घडेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भारतात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना पाकिस्तानी लष्कराचे पाठबळ लाभते. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर आयएसआयचे प्रमुख असताना २०१९ मध्ये पुलवामाचा दहशतवादी हल्ला झाला. मुनीर यांनी काही दिवसांपूर्वी काश्मीरविषयी केलेले विधान आणि त्यावर उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानवर काश्मीरमध्ये घुसखोरी केल्याचा आरोप यातून पाकव्याप्त काश्मीर केंद्रस्थानी आले.
त्यात भर पडली ती पाकव्याप्त काश्मीरमधील रावलकोटमधून प्रशिक्षण घेऊन पहलगामच्या निरपराधांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांची. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याविषयी गेल्या वर्षभरात अनेकदा विधाने केल्यामुळे आपल्या ताब्यातून हा भाग निसटणार, या कल्पनेने पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. भारतीय लष्कराच्या अजून हालचाली झालेल्या नसल्या तरीही पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याबरोबरच पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची यापेक्षा नामी संधी भारताला मिळणार नाही.
कारण पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा कट पाकव्याप्त काश्मीरमध्येच रचला गेल्यामुळे तेथील दहशतवाद्यांचे तळ नष्ट करण्याऐवजी हा भागच भारतात विलीन करण्याचे निमित्त मिळाले आहे. अर्थात, युद्ध केल्याशिवाय भारताला हे लक्ष्य साध्य करता येणार नाही. १९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानी लष्कराला शरणागती पत्करण्यास भाग पाडले होते. त्यामुळे युद्ध करुन शरणागती पत्करण्यास भाग पाडल्याशिवाय पाकिस्तानी लष्कराची इभ्रत आणि विश्वासार्हता संपुष्टात येणार नाही. त्यामुळे पहलगामचा हिशेब युद्धाने चुकता करताना पाकव्याप्त काश्मीर हिसकावून पाकिस्तानला मोठी किंमत चुकवायला लावण्याची संधी भारताला चालून आली आहे.
पाकिस्तानवर सायबर हल्ला करुन पाणी, वीज, बँकिंग दूरसंचार सेवा खंडित करण्याचाही पर्याय आहे. पण सायबर हल्ल्याने रणांगणातील शौर्याचे प्रगटीकरण होत नसल्याने संतप्त भारतीयांचे समाधान होणे कठीणच. सिंधुचे पाणी तोडणे, पाकिस्तानी नागरिकांची देशातून तातडीने हकालपट्टी करणे अशा कूटनीतिक मार्गांचा अवलंब करुनही जनता शांत झालेली नाही. १९७१ मध्ये बांगला देशातील जनतेने पाकिस्तानविरुद्ध भारताची साथ दिली तशीच मनःस्थिती आज पाकव्याप्त काश्मीरमधील ४५ लाख जनतेची आहे. पाकिस्तानच्या कारभारामुळे तेथील नागरिक त्रस्त आहेत.
लक्ष्य टप्प्यात
गेल्या वर्ष-दीड वर्षापासून भारताने चालवलेल्या वातावरण निर्मितीअंती पाकव्याप्त काश्मीरचे लक्ष्य आता विनासायास टप्प्यात आले आहे. पहलगामच्या नृशंस हत्याकांडावरुन पाकिस्तानविरुद्ध भारताने मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय सहानुभूती आणि समर्थनही संपादन केले आहे. दहशतवादाला सदैव बळ देणाऱ्या पाकिस्तानी लष्कराला कायमचा स्मरणात राहील, असा धडा शिकविण्यासाठी भारत कोणती खेळी करणार याविषयीची उत्कंठा त्यामुळे वाढली आहे. युद्ध करुन पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याच्या भारताच्या इराद्यांना चीन वगळता अन्य कोणत्याही देशाला आक्षेप नसेल.
रशियाने युक्रेनचा ताब्यात घेतलेला भूभाग असो वा इस्राईलने गाझापट्टीवर केलेला कब्जा असो, आंतरराष्ट्रीय समुदायाला युद्ध करुन जिंकलेल्या भूभागाविषयी आक्षेप राहिलेले नाहीत. या संभाव्य युद्धात अमेरिकेने तटस्थ राहण्याचे ठरविले असले तरी भारताला इस्राईलचे उघड समर्थन लाभले आहे. पहलगामविषयी भारताने आक्रमक भूमिका जाहीर केल्यामुळे युद्ध होणारच असे गृहीत धरले जात आहे. भारत-पाक युद्ध झालेच तर ते कारगील युद्धाप्रमाणे झटपट संपेल की दीर्घकाळ चालेल, याची शाश्वती नाही.
भारत-पाक अण्वस्त्रधारी देश असल्यामुळे हे युद्ध चिघळणार नाही, अशीच अपेक्षा आहे. युद्ध हाताबाहेर जाऊन अण्वस्त्रांचा वापर होणार असेल तर जगभरातील सर्वच बडे देश तातडीने हस्तक्षेप करुन युद्ध थांबवतील. पाकिस्तान, तेथील लष्कर व आयएसआय समर्थित दहशतवाद्यांचा कायमचा बीमोड करण्यासाठी युद्ध करणे आणि ते जिंकून पाकिस्तानी लष्कराला लोटांगण घालायला भाग पाडून पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेत युद्धावर झालेला खर्च सार्थकी लावण्याचे आव्हान भारतापुढे असेल.
(लेखक ‘सकाळ’च्या नवी दिल्ली ब्युरोचे प्रमुख आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.