Nagpur News : जवस पिकात गादमाशीचा प्रादुर्भाव होतो. परिणामी जवसाखालील क्षेत्रात घट नोंदविण्यात आली आहे. त्याचीच दखल घेत तब्बल २६५७ जर्मप्लाझमचे स्क्रीनिंग करुन गादमाशीला प्रतिकारक चार जर्मप्लाझम संशोधनात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील जवस संशोधन केंद्रातील तज्ज्ञांना यश आले आहे.
देशात दोन लाख ३४ हजार ४७० हेक्टर क्षेत्रावर असलेल्या जवसापासून ६६७ किलो प्रति हेक्टर तर विदर्भात ६ हजार ६७६ हेक्टरवरील जवसापासून ४५८ किलो प्रतिहेक्टर इतकी उत्पादकता मिळते. महाराष्ट्रात जवसाखाली सर्वाधिक क्षेत्र हे विदर्भात आहे. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांत या पिकावर गादमाशी (बड फ्लाय) चा प्रादुर्भाव होतो. देशातील इतर जवस उत्पादक राज्यांच्या तुलनेत या ठिकाणी गादमाशीमुळे होणारे नुकसान सर्वाधिक असल्याचे सांगितले जाते.
त्यामुळेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गतच्या अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (जवस) येथील तज्ज्ञांना गादमाशी नियंत्रणासाठीचा विशेष प्रकल्प देण्यात आला होता. संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी पाठपुरावा केलेल्या या प्रकल्पाची अंमलबजावणी या डॉ. बिना नायर यांच्या सनियंत्रणात होत आहे. एक कोटी १० लाख रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आली होती.
कृत्रिम वातावरणात संशोधन
प्लॅट जेनेटिक रिसोर्सेस (पुसा, नवी दिल्ली) यांच्याकडील २६५७ जर्मप्लाझमचे स्क्रिनिंग चार वर्षे करण्यात आले. त्याकरिता आर्टिफिशियल स्क्रीनिंग तयार करण्यात आले. चार खुंट्यावर कापडी बॅग लावण्यात आल्या. यातील आतील बाजूस गादमाशीला पोषक वातावरण तयार करण्यात आले. उघड्यावरही जवस लागवड होती.
गादमाशीचा प्रादुर्भाव पिकाच्या कळी अवस्थेत होत असल्याने या काळात विविध टप्प्यांवर अभ्यास करण्यात आला. यातील चार जर्मप्लाझमचा समावेश असलेले पीक गादमाशी खात नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. या चार जर्मप्लाझमवरील नुकसान पातळी (एकावर दहा कीड) पेक्षा कमी होते. त्यामुळे या चार जर्मप्लाझमची शिफारस गादमाशीला प्रतिकारक अशी करण्यात आली आहे.
चार पैकी दोन जर्मप्लाझम हे वाइल्ड (जंगली) आहेत. अभ्यासाअंती ते गादमाशीला प्रतिकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. हे संशोधनाचे मोठे यश असून याची रितसर प्लॅंट जेनेटिक रिसोर्सेस (दिल्ली) यांच्याकडे नोंदणी करण्यात आली आहे.डॉ. बिना नायर, प्रमुख,अखिल भारतीय समन्वयिक संशोधन प्रकल्प (जवस)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.