Radhanagari Agricultural Research Centre : कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी येथील कृषी संशोधन केंद्रामध्ये भाताच्या नव्या जातीचा शोध लावण्यात आला आहे. पोहे आणि चिरमुऱ्यासाठी खास निमगरव्या भाताचे नविन वाण पुढल्या वर्षीपासून उपलब्ध होणार आहे. यावर्षी याची अंतीम चाचणी झाल्यावर बाजारात हे वाण शेतकऱ्यांच्या भेटीस येणार आहे. यापूर्वी राधानगरी केंद्रातून भोगावती या वाणाचा शोध लावण्यात आला होता. नवी जात खास व्यावसायिकदृष्ट्या निश्चितीच पसंत पडेल अशी येथील शास्त्रज्ञांना खात्री आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत येथील कृषी संशोधन केंद्रामध्ये भातावर विशेष करून संशोधन केले जाते. सुमारे १५ एकर पैकी १३ एकर क्षेत्रावर भाताचे विविध प्रकारचे वाण विकसित व संशोधन केले जाते. २००६ मध्ये या केंद्रातून फुले-राधा ही तायचूंग आणि कोलम ५४० यांचा संकर असलेले वाण विकसित केले होते.
बासमती तांदळाला तोडीस तोड आणि येथे भरपूर उत्पादन देणारे म्हणून भोगावती हे वाणही येथून प्रसारित केले. यापैकी भोगावती शेतकऱ्यालाच नव्हे तर बाजारपेठेतील विशेष पसंतीस उतरले आहे. प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात याचे बियाण्यांची विक्री होते. या केंद्रातून टन ते दीड टन पायाभूत बियाणे विकले जाते. यंदा सव्वा टन बियाणे विक्री केले.
या वाणाचे संशोधक शैलेश कुंभार म्हणाले की, सध्या तरी आरडीएन २०-०८ असा कोड या वाणाला दिला असला तरी याचे नामकरण अजून केलेले नाही. याला मान्यता मिळाल्यानंतर नामकरण व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होईलच शिवाय या संशोधन केंद्रातून निर्माण केलेले हे वाण १५ ते १६ टक्के अधिक उत्पादन देणारे निम गरवे म्हणजे १२० ते १२५ दिवसात येणारे जाड व लांब दाण्याचे असल्याने व्यावसायिकदृष्ट्या शेतकऱ्यांना याचा फायदा अधिक होणार आहे.
पोहे आणि चिरमुऱ्यासाठी खास वाण
बाजारातील गरज विचारात घेऊन या संशोधन केंद्रातून पोहे आणि चिरमुरेसाठी खास वाण विकसित केले आहे. यापूर्वी साधे हळवे, राधानगरी हळवे ही जात पोहे आणि चिरमुरेसाठी वाण विकसीत करण्यात आले होते. मात्र अलीकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे वाण कमी प्रमाणात उत्पादन देणारे असल्याने याकडे शेतकऱ्याने पाठ फिरवली आहे.
या व्यवसायासाठी पोहे, चिरमुरे निर्मितीसाठी बाहेरून भात मागवावे लागते याचा विचार करून नवे वाण विकसित केले जात आहे. पुढील वर्षी ते अधिकृतपणे लागवडीसाठी येण्याची शक्यता आहे. यातून शेतकऱ्याला व्यावसायिक उत्पादन उत्पन्न देणारे वाण म्हणून हे निश्चितच फायदेशीर ठरेल असे मत राधानगरी कृषी संशोधन केंद्रातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.