उष्ण - दमट हवामान, जास्त आर्द्रता, भात खाचरातील पाणी, पावसाचा अनियमितपणा अशा बाबी भात पिकांवरील कीड-रोगांसाठी पोषक ठरतात. पिकावर तुडतुडे, गादमाशी, खोडकीड, लष्करी अळी अशा किडींचा प्रादुर्भाव वाढतो. परिणामी भात पिकाच्या उत्पादकतेत ३० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. जागतिक पातळीवर भात पिकात सुमारे १०० किडींच्या प्रादुर्भावाची नोंद असून, त्यापैकी महाराष्ट्रामध्ये २० ते २४ किडींचा प्रादुर्भाव आढळतो. तुडतुडे आकाराने लहान, प्रौढ ४-५ मि.मी. लांब, हिरवे असतात. पुढील पंखावर काळे ठिपके असून, तिरप्या चालीमुळे ओळखता येतात. पिल्ले व प्रौढ तुडतुडे झाडाच्या बुंधा व खोडामधून रस शोषतात. पाने पिवळी पडून झाड निस्तेज होते. पुढे सुकून वाळते. तपकिरी तुडतुड्याचा प्रादुर्भाव शेताच्या मध्यभागातून गोलाकार खळ्याप्रमाणे सुरू होतो. शेत जळल्यासारखे दिसते, याला ‘हॉपर बर्न’ असे म्हणतात. आर्थिक नुकसानीची पातळी: १० तुडतुडे प्रती चुड. व्यवस्थापन नत्र खतांचा शिफारशीत मात्रेपेक्षा जास्त वापर करू नये. मित्रकिटकांच्या संवर्धनासाठी बांधावर झेंडू, चवळी पिकाची लागवड करावी. रोपे दाट लावू नये. जास्त दाट लागवडीमुळे तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. मेटारायझीम ॲनिसोप्ली हे जैविक कीटकनाशक २.५ किलो प्रती हेक्टर या प्रमाणात घ्यावे. बांधितील पाणी काढून टाकावे. पिकाचे निरीक्षण करून आर्थिक नुकसानीची पातळी गाठताच, फवारणी प्रती लीटर पाणी ॲझाडिरेक्टीन ०.१५ टक्के (१५०० पी.पी.एम.) ३ मिली किंवा इमिडाक्लोप्रिड (१७.८ एस.एल.) ०.२२ मिली किंवा फिप्रोनिल (५ एस.सी.) २ मिली किंवा बुप्रोफेझिन (२५ एस.सी.) २ मिली. विशेषतः भात पिकाच्या बुंध्यावरील भागावर तुडतुडे रस शोषतात. नियंत्रणासाठी या ठिकाणी कीटकनाशक फवारावे. गादमाशी प्रौढ गादमाशी डासासारखी, तांबडी व लांब पायाची असते. विश्रांती अवस्थेत पंख पाठीवर पूर्णपणे झाकलेले असतात. जीवनक्रम गादमाशीची मादी १५० ते २०० अंडी एक-एक प्रमाणे भाताच्या पानाच्या खालील भागात देते. अंडी लांबोळकी, लाल असतात. अंड्यातून तीन ते चार दिवसात पिवळसर-पांढरी अळी बाहेर येते. बेचक्यातून खाली सरकत जाऊन जमिनीलगत वाढणाऱ्या अंकुरात प्रवेश करते. वाढत्या अंकुरावर उपजीविका करून बुंध्याजवळ स्थिरावते. (१५ ते २० दिवसापर्यंत) परिणामी मुख्य खोडाची वाढ न होता नळी अथवा चंदेरी पोंगा तयार होतो, अशा पोंग्यांना लोंबी धरीत नाही. तसेच बुंध्याच्या बाजूला अनेक फुटवे फुटलेले दिसतात त्यानंतर अळी खोडामध्येच कोशावस्थेत जाते. कोशामधून प्रौढ माशी ५ ते ७ दिवसात बाहेर येते. एक पिढी पूर्ण करण्यास गादमाशीला तीन आठवडे लागतात. आर्थिक नुकसानीची पातळी एक चंदेरी पोंगा प्रति चौ. मी. - नेहमी प्रादुर्भाव होणाऱ्या क्षेत्रात. ५ टक्के प्रादुर्भावग्रस्त फुटवे - नेहमी प्रादुर्भाव नसणाऱ्या क्षेत्राकरिता. आक्रमणाची संभाव्यता आणि कालावधी गादमाशीचा प्रादुर्भाव रोपवाटिकेमधून सुरू होतो. सप्टेंबरच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यात अधिक प्रमाणात आढळतो. उशिरा पुनर्लागवड किंवा रोवणी केलेले भात, ढगाळलेले वातावरण, रिमझिम पाऊस, ८० ते ९० टक्के सापेक्ष आर्द्रता व २६ ते ३० अंश सें. तापमान किडीच्या वाढीस पोषक असते. एकात्मिक व्यवस्थापन भाताव्यतिरिक्त अन्य पूरक खाद्य वनस्पती (उदा. देवधान इ.) नष्ट कराव्यात. कापणीनंतर शेतात नांगरणी करून धसकटे नष्ट करावीत. गाद प्रतिबंधक भात जातीचा उदा. वैभव, निला, तारा, सुरक्षा, सिंदेवाही २००१, साकोली ८ व पी.के.व्ही. गणेश इ. चा वापर करावा. रोवणी करताना गादमुक्त रोपांची लावणी करावी. रोवणीनंतर किडीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठताच, कारटॅप हायड्रोक्लोराईड (४ जी), २५ किलो किंवा फिप्रोनिल (०.३ जी) २५ किलो प्रती हेक्टरी बांधीमध्ये ७-१० सें.मी. पाणी असताना वापरावे. बांधीतील पाणी ४ दिवस बाहेर जाणार नाही, याची काळजी घ्यावी. खोडकिडा पतंग १-२ सें.मी. लांब, समोरील पंख पिवळे असून, त्यावर प्रत्येकी एक ठळक काळा ठिपका असतो. मागील पंख पांढरे असतात. खोडकिडीची मादी १०० ते २०० अंडी पुंजक्याच्या स्वरूपात शेंड्यावर घालते. पिवळसर तांबड्या तंतुमय धाग्यांनी पानाच्या शेंड्यावर झाकलेली असतात. -अंड्यातून ५ ते ८ दिवसांत अळ्या बाहेर येतात. पूर्ण वाढ झालेली अळी २० मि.मी., पिवळसर व पांढरी असते. ती मुख्य खोड पोखरून आतमध्ये उपजीविका करते. अळी अवस्था १६ ते २७ दिवसाची असते. अळी खोडामध्येच कोशावस्थेत जाते. ९ ते १२ दिवसानंतर कोशातून पतंग बाहेर येतो. एक जीवनक्रम पूर्ण करण्यास ३१ ते ४० दिवस लागतात. एका वर्षात ४ ते ६ पिढ्या पूर्ण होतात. सप्टेंबरचा तिसरा आठवडा ते ऑक्टोबरचा दुसरा आठवडा भाताचे पीक फुलोरा ते ओंबी अवस्थेत असताना खोडकिडीचा जास्त प्रादुर्भाव आढळतो. नुकसानीचा प्रकार: अळी खोड पोखरत असल्याने रोपाचा गाभा मरतो. फुटवा सुकतो. यालाच किडग्रस्त फुटवा किंवा गाभेमर किंवा डेडहार्ट म्हणतात. हा फुटवा ओढल्यास सहज निघून येतो. अशा फुटव्यास दाणे न भरलेल्या पांढऱ्या ओंब्या येतात. यालाच पळींज किंवा पांढरी पिशी असे म्हणतात. आर्थिक नुकसानीची पातळी १ अंडी पुंज प्रति चौ.मी. किंवा ५ टक्के पोंगामर (लागवडीपासून ते फुटवे फुटण्यापूर्वी) ५ टक्के सुकलेले फुटवे किंवा ५ टक्के गाभेमर प्रति चौ.मी. (फुटवे फुटल्यानंतर) १ पतंग प्रति चौ.मी. (फुलोऱ्यानंतर) एकात्मिक व्यवस्थापन भातकापणीनंतर वापसा आल्यावर नांगरणी करून धसकटे गोळा करावीत. जाळून नष्ट करावीत. खोडकीड ग्रस्त भागात खोडकिडा प्रतिकारक भातजाती उदा. रत्ना, आयआर-२०, आरपी-४-१४, साकोली-८ आणि सिंदेवाही-५ यांचा प्रामुख्याने वापर करावा. रोवणीपूर्वी रोपांची शेंडे तोडून बांबूच्या टोपलीत जमा करावी. ती टोपली खांबावर टांगावी. रोपाच्या शेंड्यावरील खोड किडीची अंडी नष्ट होतात. त्यामधून परजीवी कीटकसुद्धा यथावकाश बाहेर पडतात. रोवणीपूर्वी रोपांची मुळे क्लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) १ मि.ली. प्रती लीटर पाणी या द्रावणात १२ तास बुडवून ठेवावेत.. नंतरच रोवणी करावी. पिकाची वरचेवर पाहणी करून किडग्रस्त फुटवे मुळासकट काढून नष्ट करावेत. हे काम हंगामात किमान ३-४ वेळा करावे. शेतात ५ टक्के किडग्रस्त फुटवे दिसताच, फवारणी प्रती लीटर पाणी कारटॅप हायड्रोक्लोराईड (५० टक्के प्रवाही पाण्यात मिसळणारी भुकटी) १.२ ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) ३.२ मि.ली. करावी. ट्रायकोग्रामा जापोनीकम या परजीवी मित्रकिटकाची ५० हजार अंडी प्रती हेक्टरी, १० दिवसांच्या अंतराने ३-४ वेळा सोडावीत. खोडकीड सर्वेक्षणासाठी स्किर्पो ल्युरयुक्त कामगंध सापळे एकरी २ ते ३ लावावेत. त्यातील ल्युर २१ दिवसानंतर बदलावी. कामगंध सापळ्यात खोडकिडीचे ८ ते १० नरपतंग सतत तीन दिवस आढळल्यास शिफारसीत रासायनिक किटकनाशकाचा वापर करावा. किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास, कारटॅप हायड्रोक्लोराईड (४ जी) २५ किलो किंवा फीप्रोनिल (०.३ जी) २५ किलो प्रती हेक्टर या प्रमाणे द्यावे. भात पिकाची कापणी जमिनीलगत करावी. प्रविण देशपांडे, ९४२१८३०४३९, डॉ. व्ही. जी. नागदेवते, ९४२१८००५९०, डॉ. व्ही. एन. सिडाम, ९७६६५२९४३६, (कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही, जि. चंद्रपूर.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.