Citrus Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Citrus Orchard Management : वादळी पाऊस, गारपीटग्रस्त बागांकरिता उपाययोजना

Crop Damage : विदर्भात मागील महिन्यातील २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान कमी अधिक प्रमाणात पावसासोबत गारपीट झालेली आहे.

Team Agrowon

डॉ. दिनेश पैठणकर, डॉ. योगेश इंगळे

लिंबूवरर्गीय पीक सल्ला

विदर्भात मागील महिन्यातील २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान कमी अधिक प्रमाणात पावसासोबत गारपीट झालेली आहे. अवकाळी पावसामुळे संत्रा, लिंबू व मोसंबी बागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

अशावेळी नुकसानग्रस्त बागांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. ताणात असलेल्या आंबिया, विकसित अवस्थेतील मृग व लिंबू पिकाच्या हस्त बहराचे व्यवस्थापन याबाबत माहिती खालीलप्रमाणे आहे.

जखमा भरून निघणे व झाडांना संतुलित अन्नपुरवठा होण्यासाठी... बागेत साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

झाडे उन्मळून पडली असल्यास शेंड्याकडील ४५ सेंमी फांद्या कमी करून छाटणी करावी. जर झाडांची मुळे उघडी पडली असल्यास मातीची भर देऊन बांबू किंवा बल्लीच्या साह्याने आधार देऊन झाडे उभे करावे.

अशा झाडांच्या वाफ्यामध्ये सायमोक्सिनील (८ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६४ टक्के डब्ल्यूपी) (संयुक्त घटक) किंवा मेटॅलॅक्झिल (८ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६४ टक्के डब्ल्यूपी) (संयुक्त घटक)* या बुरशींनाशकांची २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे द्रावण (८ ते १० लिटर प्रति झाड) या प्रमाणात टाकावे.

गारपीटमुळे इजा झालेल्या झाडांवर बहर घेऊ नये.

धुके पडत असल्यास झाडावर त्वरित कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा बोर्डो मिश्रण (६०० ग्रॅम चुना अधिक ६०० ग्रॅम मोरचूद अधिक १०० लिटर पाणी या बुरशीनाशकांची फवारणी करावी.

गारपिटीमुळे झाडांची पाने गळून पडतात, पालवी कमी होते. अशावेळी गारपीटग्रस्त झाडास अमोनियम सल्फेट १ किलो प्रति झाड याप्रमाणे द्यावे. तसेच शक्य असल्यास चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्यांची (झिंक अधिक कॅल्शिअम अधिक फेरस सल्फेट मिश्र घटक) ०.२ टक्का म्हणजेच २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. गारपीटग्रस्त झाडांवर कॅल्शिअम नायट्रेट (१ टक्का) १ किलो अधिक जिबरेलिक ॲसिड २.५ ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे झाडांवरील पानांच्या संख्येत वाढ होईल.

आंबिया किवा मृग बहरची फळे गळाली असल्यास त्यांची योग्य विल्हेवाट लावावी.

सद्यःस्थितीतील आंबिया बहर व लिंबू बाग नियोजन

संत्रा, मोसंबी, लिंबू आंबिया बहरसाठी ताणावर सोडलेल्या बागांचा ताण अवकाळी पावसाने ताण तुटतो. बागा ताणात राहण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराइड (५० टक्के प्रवाही)* २ मिलि प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. ज्या बागांनी मुळातच ताण घेतला नव्हता, अशा बागेकरिता क्लोरमेक्वाट क्लोराइड (५० टक्के प्रवाही) ४ मिलि प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.

मृग बहरातील फळांवर असलेल्या संत्रा, मोसंबी किंवा हस्त बहरातील कागदी लिंबू फळांची वाढ होणे किंवा गळ थांबविणे याकरिता एनएए १ ग्रॅम किंवा २,४-डी १.५ ग्रॅम किंवा जिबरेलिक ॲसिड १.५ ग्रॅम यापैकी कोणत्याही एका संजीवकासह ६ बीए १ ग्रॅम अधिक १३:००:४५ हे १ किलो अधिक प्रोपीकोनॅझोल (२५ टक्के प्रवाही) १०० मिलि १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरजेनुसार स्टीकरचा वापर करावा.

सततच्या ढगाळ वातावरणामुळे व पावसानंतर झालेल्या जखमांमुळे आंबिया बहर व मृग बहरातील फळांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण झाडावर कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पावसामुळे कागदी लिंबूवरील खैऱ्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड ३ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन** ०.१ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

- डॉ. दिनेश पैठणकर, ९८८१०२१२२२, (प्रभारी अधिकारी),

(अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प (फळे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

(टीप ः *या रसायनाना लिंबूवर्गीय पिकामध्ये लेबलक्लेम नाहीत, मात्र ॲग्रेस्को शिफारस आहे.

** स्ट्रेप्टोमायसिन हे संक्षिप्त नाव वरील लेखात घेतले असले तरी या प्रतिजैविकातील सक्रिय घटक पुढीलप्रमाणे आहेत. स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट ९० टक्के अधिक टेट्रासायक्‍लीन हायड्रोक्‍लोराइड १० टक्के.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT