Orange Orchard Management : अमरावतीतील बोदड येथील विपुल चौधरी यांचे संत्रा नियोजन

Orange Update : अमरावती जिल्ह्यातील बोदड येथील विपुल चौधरी यांची पाच एकर शेती. त्यापैकी ४ एकरांत संत्र्याच्या ५५० झाडांची लागवड आहे.
Orange Orchard
Orange Orchard Agrowon
Published on
Updated on

शेतकरी - विपुल गजानन चौधरी

गाव - रा. बोदड, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती

एकूण शेती - ५ एकर

संत्रा लागवड - चार एकर (५५० झाडे)

अमरावती जिल्ह्यातील बोदड येथील विपुल चौधरी यांची पाच एकर शेती. त्यापैकी ४ एकरांत संत्र्याच्या ५५० झाडांची लागवड आहे.

संपूर्ण लागवड १६ बाय १६ फूट अंतरावर आहे. लागवडीनंतर साधारण ४ वर्षांनी बागेतून उत्पादन घेण्यास सुरुवात केली. बागेत प्रामुख्याने आंबिया बहर धरला जातो.

पीक उत्पादकतेत जमिनीचा पोत व इतर घटक प्रभावी ठरतात. ही बाब लक्षात घेऊन माती, पाणी परीक्षण, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला. योग्य व्यवस्थापनामुळे बागेतून सहाव्या वर्षीच एकरी १७ टन संत्रा उत्पादन मिळविण्यात यश मिळाले.

टप्प्याटप्प्याने उत्पादकता १९ टनांपर्यंत पोहोचली. फळांची साल ही पातळ आणि चमकदार असल्याने आकर्षक फळांना दरही चांगले मिळतात. सिंचनाचे काटेकोर नियोजनामुळे बागेत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यात चौधरी यांना यश मिळाले आहे. दर्जेदार व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यामुळे परिसरातील संत्रा उत्पादक शेतकरी वेळोवेळी त्यांच्या बागेस भेट देतात.

Orange Orchard
Orange Orchard : योग्य परिस्थितीतच संत्रा बागांचा ताण सोडावा

बहर नियोजन

- आंबिया बहरासाठी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीस बाग ताणावर सोडली. हा ताण साधारण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पाटपाणी देत तोडला.

- पानांची गुंडाळी झाल्यानंतर बागेस चांगला ताण बसला, असा अंदाज बांधला जातो. जोपर्यंत पानांची गुंडाळी होत नाही, तोवर सिंचन केले जात नाही.

- नवती फुटल्यानंतर मावा, सिट्रस सायला या किडींचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यासाठी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेतली.

- ताण तोडल्यानंतर साधारण १० दिवसांनी १२ः६१ः० ची एक फवारणी घेतली. त्यानंतर पुन्हा पाटपाणी दिले. त्यामुळे बाग व्यवस्थित फुटून येण्यास मदत झाली.

- फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात बागेत फुलकिड्यांचा प्रादुर्भाव जास्त दिसून आला. त्यासाठी शिफारशीत रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेतली.

- मार्च महिन्यात फळधारणा होण्यास सुरुवात झाल्यानंतर माइट्सचा प्रादुर्भाव दिसून आला. नियंत्रणासाठी कीटकनाशकांची एक फवारणी घेतली आहे.

सिंचन व्यवस्थापन

- संत्रा लागवडीत अयोग्य सिंचन व्यवस्थापनामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. फायटोप्थोरासारख्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नियंत्रण मिळविणे अवघड होते. अशा प्रादुर्भावग्रस्त बागा वाचविणे अशक्य होते. त्यामुळे फायटोप्थोरा नियंत्रण हा संत्रा बागेच्या व्यवस्थापनातील अत्यंत कळीचा मुद्दा ठरतो.

चौधरी यांची संत्रा लागवडीतील जमीन पाण्याची चांगला निचरा होणारी आहे. त्यामुळे बागेत पाटपाणी पद्धतीने सिंचनावर भर दिला जातो. बागेस साधारण १७ ते १८ दिवसांनी सिंचन केले जाते. झाडाच्या पानांची गोल गुंडाळी होत नाही, तोवर बागेस सिंचन केले जात नाही.

सिंचनाचे योग्य नियोजन केल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यात चौधरी यशस्वी झाले आहेत. शिवाय बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बोर्डो मिश्रणाचा वापर केला जातो.

- उन्हाळ्यात बागेला जास्त पाणी दिल्यामुळे फळगळीची शक्यता अधिक असते. फळगळ टाळण्यासाठी नियंत्रित आणि नियोजनबद्ध सिंचन करण्यावर भर दिला जातो. झाडांना ताण चांगला बसल्यामुळे नवती फुटून बहर चांगला फुटतो.

Orange Orchard
Orange Import Duty : बांग्लादेशकडून संत्रा आयात शुल्कात २५ रुपयांची वाढ

खत व्यवस्थापन

- वर्षभरात नियोजनानुसार तीन वेळा बागेस खतमात्रा दिली जाते. रासायनिक आणि सेंद्रिय असे दुहेरी पद्धतीने अन्नद्रव्ये व्यवस्थापन केले जाते.

- डिसेंबर महिन्यात रासायनिक खते, सेंद्रिय खते आणि निंबोळी पेंड आणि झिंक प्रति झाड २०० ग्रॅम प्रमाणे दिले जाते. यामुळे झाडाची वाढ चांगली होण्यास मदत होते.

- मार्च महिन्यात वाढत्या तापमानामुळे फळगळीची शक्‍यता असते. त्यासाठी सिलिकॉनचा वापर केला. तसेच बागेतील तापमान नियंत्रणासाठी आच्छादनाचा वापर केला.

आगामी व्यवस्थापन

- जून अखेरीस एरंडी, निंबोळी पेंड, सेंद्रिय खत आणि नत्र, स्फुरद, पालाश यांच्यासह सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा दिल्या जातील. जेणेकरून झाडांना अन्नद्रव्यांचा योग्य पुरवठा होईल.

- कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी बागेचे सातत्याने निरीक्षण केले जाईल. आवश्यकतेनुसार रासायनिक फवारणीचे नियोजन केले जाईल.

- चांगला पाऊस सुरू झाल्यानंतर बागेत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यासाठी आवश्यकतेनुसार बुरशीनाशकांची फवारणी घेतली जाईल.

संपर्क - विपुल चौधरी, ९५८८४६२२७२, (शब्दांकन - विनोद इंगोले)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com