MSP Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

MSP Procurement : दहा दिवसात अवघ्या चार हजार शेतकऱ्यांची नोंदणी

Soybean Market : सरकारने यावर्षी पहिल्यांदाच सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेत दोन्ही जिल्ह्यात आधारभूत खरेदी केंद्र सुरू केले आहेत. मात्र, हमीभावाने केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांत उत्साह नसल्याचे चित्र आहे.

Team Agrowon

Latur / Dharashiv News : सरकारने यावर्षी पहिल्यांदाच सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेत दोन्ही जिल्ह्यात आधारभूत खरेदी केंद्र सुरू केले आहेत. मात्र, हमीभावाने केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांत उत्साह नसल्याचे चित्र आहे. यामुळे दहा दिवसांत दोन्ही जिल्ह्यात मिळून केवळ चार हजार शेतकऱ्यांनी हमीभावाने सोयाबीनच्या विक्रीसाठी नोंदणी केली आहे.

दुसरीकडे आडत बाजारात सोयाबीनची आवक वाढली असून प्रत्यक्षात खरेदी सुरू होण्यापूर्वी हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी करून व्यापारी संधीचा फायदा उठवत असल्याची स्थिती आहे.

तीन वर्षापासून बाजारात सोयाबीनच्या भावाची चढउतार सुरू आहे. कधी ना कधी चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी दोन हंगामातील सोयाबीनची विक्री केली नाही. यंदा तिसरा हंगाम असून यंदा सोयाबीनलाही चांगला मिळेल, असे शेतकऱ्यांना वाटत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोयाबीनच्या भावाबाबत काहीतरी हालचाल होईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. यातच सरकारने मुग व उडीदासोबत यंदा सोयाबीनचीही हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी लातूर जिल्ह्यात चौदा तर धाराशिव जिल्ह्यात १६ खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. या केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी समृद्धी पोर्टलवर एक ऑक्टोबरपासून ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून दहा दिवसात शेतकऱ्यांकडून नोंदणीसाठी थंड प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.

लातूर जिल्ह्यात दहा दिवसात तीन हजार ३१ शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी विलास सोमारे यांनी दिली. तर धाराशिव जिल्ह्यात एक हजार २८ शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याचे जिल्हा पणन अधिकारी मनोज बाजपेयी यांनी सांगितले. दोन्ही जिल्ह्यातील केंद्रावर १५ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष सोयाबीन खरेदी होणार असून अजून सोयाबीनची काढणी सुरू असल्याने शेतकरी नोंदणीसाठी पुढे येत नसावेत, असा अंदाज आहे.

दरम्यान दुसरीकडे आडत बाजारात सोयाबीनची आवक वाढली असून गुरुवारी (ता. १०) लातूरच्या बाजारात १९ हजार १२५ क्विटंल आवक होऊन हमीभाव चार हजार ८९२ रुपये असताना सोयाबीनला कमाल चार हजार ५७१ तर किमान चार हजार ३३० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. यामुळे प्रत्यक्षात खरेदी केंद्र सुरू होण्यापूर्वी व्यापारी कमी भाव देऊन सोयाबीनची खरेदी करत असून तातडीच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी खरेदी केंद्राचा पर्याय परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मुग व उडदासाठी नोंदणीच नाही

सरकारने मुगाची आठ हजार ६८२ रुपये तर उडदाची सात हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. खरेदी केंद्रावर गुरुवारपासून मुग व उडदाची हमीभावाने खरेदी सुरू झाली आहे. मात्र, त्यासाठी दोन्ही जिल्ह्यातून एकाही शेतकऱ्याने नोंदणी केली नसल्याचे सांगण्यात आले.

यामुळे केंद्रावर मुग व उडदाची एक किलोही खरेदी झाली नाही. बाजारात उडीदाला हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत असून गुरुवारी लातूरच्या बाजारात तीन हजार ४६५ क्विंटलची आवक होऊन उडीदाला आठ हजार ४११ रुपये कमाल तर पाच हजार दोनशे रुपये किमान भाव मिळाला. मुगाची ४१९ क्विंटल आवक होऊन त्याला आठ हजार चारशे रुपये कमाल तर सहा हजार रुपये किमान भाव मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT