Waste Water Management Agrowon
ॲग्रो विशेष

Wastewater Treatment : सांडपाणी प्रक्रियेसाठी रीड बेड पद्धत

Team Agrowon

सतीश खाडे

Sewage Management : रीड म्हणजे बोरू आणि पाणथळीतील पाण्यात उत्तमप्रकारे वाढणारी अन्य झाडे. ‘रीड बेड’ म्हणजे अशा झाडांच्या मुळांच्या थर. युरोपात विशेषतः जर्मनीत सांडपाणी शुद्ध करण्यासाठी मुख्यत्वे ही पद्धत वापरली जाते. जर्मनीत या पद्धतीने अनेक प्रवाह शुद्ध केले असून, ते पाणी मोठ्या नद्यामध्ये सोडले जाते.

परिणामी मोठ्या नद्याही सांडपाण्याऐवजी चांगल्या पाण्याने भरून वाहताना दिसतात. आपल्याकडेही अनेक ठिकाणी ही पद्धत वापरली जाते. घराभोवतीची सांडपाण्यावर येणारी परसबाग हे त्याचेच अगदी छोटेसे उदाहरण. आम्लता व अल्कली गुणधर्माच्या पाण्यातही काही वनस्पती तग धरतात, असे नव्हे उत्तम फोफावतात देखील. उदा. अळू, कर्दळ, वेळू ,बांबू, बोरू, कन्हेर, काही प्रकारचे पाम्स, गवते (लव्हाळे, वाळा, बांबू इ.)

सांडपाणी शुद्धीकरणामध्ये या झाडांइतकेच किंवा त्याहून जास्त महत्त्व हे त्या खालील माध्यमातील पोकळ्यांना व त्यात वाढणाऱ्या योग्य सूक्ष्मजीव, गांडुळे इ. सजीवांना असते.

सांडपाणी शुद्धीकरणात वनस्पतींची भूमिका

पाणथळ जागेत वाढणाऱ्या या वनस्पतींची मुळे तिहेरी काम करतात.

सांडपाण्यातील प्रदूषके शोषतात. आपल्यासाठी प्रदूषके असलेली काही घटक वनस्पतींसाठी पोषक द्रव्ये असतात.

झाडांच्या तंतूमुळावर असणारे सूक्ष्मजीव पाण्यातील विविध प्रदूषक घटकांचे विघटन करतात.

मुळांच्या श्वसनातून पाण्यात ऑक्सिजन मिसळला जातो.

रीड बेड तयार करण्याचे काम सोपे आहे. त्यासाठी वॉटरप्रूफ असे तळे किंवा टाकी बांधून, त्यात पाणी आत येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी इनलेट आणि आऊटलेट पाइप बसवावे लागतात. हे पाइप थोड्या मोठ्या आकाराचे बसविल्यास पाणी तुंबण्याची समस्या टाळता येते. त्यात मोठे व मध्यम आकाराचे दगड, खडी, वाळू, माती यांचे थर, सूक्ष्मजीव, बुरशी इ. चे विरजण टाकून विशिष्ट झाडे लावणे.

फक्त त्यांचे योग्य आरेखनासोबतच त्याचे क्षेत्रफळ, घनफळ, थरांची जाडी, झाडांची निवड, बायोकल्चरची निवड यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. या यंत्रणेत सांडपाणी सोडले असता त्यातील न विरघळलेले घटक वाळूत व दगडात अडकून पसरतात. त्यांचे पृष्ठफळ वाढल्याने विघटन प्रक्रिया वेगाने होते. या वाळू दगडाच्या गाळणीतून बाहेर पडणारे हे पाणी स्वच्छ होत जाते.

स्थिर प्रवाह असलेल्या तलावासारख्या जलस्रोतात बांबू किंवा अन्य घटकांचे तराफे बांधून, त्यात वाळा, लव्हाळा इ. प्रकारच्या गवतांची वाढ करून ‘तरंगते लघू प्रक्रिया केंद्र’ तयार करता येतात. त्यांना ‘फ्लोटर’ असे म्हणतात. अर्थात, यांची क्षमता पूर्ण रीडबेडच्या मानाने कमी असते.

घरे, बंगले, फार्महाउस, अपार्टमेंट, इमारती आणि काही प्रकारच्या उद्योगातील सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी ही पद्धत उपयोगी पडते. उद्योगातील सांडपाण्यामध्ये अधिक विषारी प्रदूषके असल्यास रीडबेड व यांत्रिक पद्धती एकत्रित वापरावी लागते. तसेच त्यात वाढवलेल्या झाडांची पाने, फुले, फळे यांची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावावी लागते.

सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पात मधाचे उत्पादन

नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीमधील सर्व वसतिगृहे आणि विद्यार्थ्यांच्या भोजनालयातून सुमारे दोन लाख लिटर सांडपाणी तयार होते. ते संपूर्णपणे ‘रीडबेड’ पद्धतीने शुद्ध केले जाते. १५२ एकरच्या विस्तीर्ण परिसरातील एका बाजूच्या उतारावरून एका ठिकाणी प्रवाहित करून सांडपाणी आणले जाते.

तिथे अनेक कप्पे असलेल्या एका मोठ्या टाकीमध्ये काही प्रमाणात स्थिर व शुद्ध केले जाते. त्यासाठी हवारहित स्थितीमध्ये कार्य करणाऱ्या जिवाणूंचा वापर केला जातो. पुढे ते पाणी साधारण दोन ते अडीच हजार चौरस मीटर (२५ गुंठे) आकाराच्या आणि अडीच ते तीन मीटर खोलीच्या रीड बेड सिस्टिममध्ये नेले जाते.

येथे बांधलेल्या इनलेट चेंबरमधून सच्छिद्र पाइपद्वारे ते पाणी दगड, खडी, वाळू आणि माती अशा थरांनी केलेल्या गाळणीमधून पाठवले जाते. पुढे आउटलेट चेंबरमध्ये अन्य सच्छिद्र पाइपांतून एकत्र गोळा करून तळ्यांमध्ये सोडले जाते. विविध प्रकारच्या विशिष्ट अनुकूलित वनस्पती या मातीत लावलेल्या असून, त्यांच्या मुळांचे घनदाट जाळे जमिनीखाली तयार झालेले आहे. या वनस्पती लावण्याआधी, या गाळणीमध्ये विशिष्ट प्रकारचे जिवाणू, मित्र बुरशी आणि चांगल्या मातीतील गांडुळे व तत्सम इतर सजीव सोडले जातात.

पुन्हा ही रीडबेड सिस्टिम रूक्ष वाटू नये, यासाठी तिची रचना बागेप्रमाणे केली आहे. त्यात सत्तरहून अधिक जातींच्या वनस्पतींची सुमारे दहा हजार रोपे लावली होती. लागवडीनंतर सहा महिन्यातच त्यांची संख्या आणि आकार वाढून संपूर्ण बाग आच्छादली आहे. यामध्ये चार ठिकाणी पाण्याची छोटी कृत्रिम तळीही करण्यात आली आहेत.

त्यात विविध पाणवनस्पती, कुमुदिनी आणि कमळे ही जोपासली आहेत. या तळ्यात मासे सोडले आहेत. या पाण्यात माशांचे जगणे व त्यांची सुदृढ वाढ हे पाण्याच्या शुद्धतेचा सर्वोच्च पुरावा आहे. शुद्धता तपासणीसाठी रासायनिक प्रयोगशाळांवर अवलंबून राहावे लागत नाही. या बागेच्या किमान अडीच ते तीन फूट खालून सांडपाणी वाहते.

परिणामी डास, माशा आणि इतर उपद्रवी जीवजंतू वाढत नाहीत. कुठलीही दुर्गंधी होत नाही. उलट या रीडबेडवर वाढलेल्या अनेक वनस्पतींवर विविध प्रकारच्या मधमाशा, भुंगे, फुलपाखरे, चतुर आणि पक्षी यांना आहार, निवारा आणि संरक्षण मिळते.

या बागेतील फुलोऱ्याचा लाभ घेण्यासाठी मधमाश्यांच्या वसाहती ठेवल्या आहेत. त्यातून वर्षाला तिथे साधारण पंचवीस किलो मध तयार होतो आहे.

पोलिस अकादमीतील ही यंत्रणा ‘नॅचरल सोल्युशन्स’च्या डॉ अजित गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक यांनी उभी केली आहे. अशाच तंत्राने सांडपाणी शुद्धीकरणाचे काम डॉ. उन्मेष मुंडले, डॉ. प्रसन्न जोगदेव यासारखे तज्ज्ञ करत आहेत.

पुणे शहरातील ओशो गार्डन, कोरेगाव पार्क हे सांडपाण्यावर नाला गार्डन रूपात विविध झाडांच्या पद्धतशीर रचनेवर बहरलेले उद्यान आहे. पस्तीस वर्षांपूर्वी जपानी तंत्रज्ञांनी उभारलेल्या या उद्यानात एका बाजूला ओढ्यातील सांडपाणी प्रवेश करते. उद्यानातील झाडांभोवती हे पाणी फिरत काही ठिकाणी छोट्या धबधब्याच्या स्वरूपात वाहते. पुढे जाऊन उद्यानाबाहेर पडताना हे पाणी स्फटिकाप्रमाणे स्वच्छ असते.

काही गावांमध्ये नदीच्या दोन्ही बाजूंस ५० ते १०० फुटांवर समांतर चर मारून गावचे सांडपाणी त्यात सोडले जाते. हे चर व नदीदरम्यान बांबू व तत्सम झाडे लावली जातात. चरातून झिरपणारे पाणी या झाडांच्या मुळांच्या जाळीतून गाळून पुढे जाते. त्यात ऑक्सिजन मिसळल्याने प्रदूषणमुक्त होत नदीला येऊन मिळते.

याला खऱ्या अर्थाने ‘रीड बेड’ म्हणता येणार नसले तरी त्यातील काही घटकांचा वापर नक्कीच केलेला आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात अनेक गावांत सांडपाण्यासाठी शोषखड्डे तयार करण्यात आले आहे. पण एकदाच शासकीय खर्चाने उभारलेल्या या रचनेची देखभाल न केली गेल्याने त्यात दोष निर्माण होत आहेत. त्याऐवजी रीड बेड पद्धती परिणामकारक ठरू शकतील, असे अभ्यासकांचे मत आहे.

सतीश खाडे, ९८२३०३०२१८

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Empowerment : बांबूच्या वस्तू निर्मितीतून आदिवासी महिला झाल्या कुशल

Sharad Pawar : साखरपट्ट्यातील आणखी एक दिग्गज नेता शरद पवारांच्या साथीला; अजित पवार यांना धक्का

Book Review : जगण्याचा आदीम तळ धुंडाळणारी रिंगाण

Haryana Assembly Elections : हरियाणात भाजपची हॅट्रीक हुकणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेस वरचढ; राज्यात झाले ६७ टक्के मतदान

Rainfed Farming Policy : कोरडवाहू शेतीचे शाश्‍वत धोरण कधी?

SCROLL FOR NEXT