Bamboo Polyhouse  Agrowon
ॲग्रो विशेष

Bamboo Polyhouse : पॉलिहाउस उभारणीचा खर्च पन्नास टक्क्यांनी करा कमी

प्रक्रियायुक्त बांबूवर आधारित पॉलिहाउस

मंदार मुंडले

मंदार मुंडले

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने प्रक्रियायुक्त बांबूपासून मजबूत, भक्कम असे पॉलिहाउस उभारणीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. प्रचलित लोखंडी पाइप्सवर आधारित पॉलिहाउसच्या तुलनेत उभारणी खर्च सुमारे ५० टक्के कमी होणार आहे. कोकणासह राज्यातील समस्त शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाधारे शेती करून अर्थकारण उंचावणे शक्य होणार आहे.

कोकण विभागासाठी दापोली (जि. रत्नागिरी) येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कार्यरत आहे. कोकणात खरिपात प्रचंड पाऊस असतो. वादळवारेही सातत्याने सुरू असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला, फुलपिके घेण्याला मर्यादा येतात. अशा प्रतिकूल परिस्थितीत उत्पादन आणि उत्पन्नाचा हुकमी पर्याय शोधण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न होता. संरक्षित म्हणजेच पॉलिहाउसमधील शेती हा त्यावर मार्ग होता.

मात्र त्याच्या उभारणीचा खर्च, मोठ्या प्रमाणात लागणारे भांडवल, पीक उत्पादन खर्च, बाजारपेठ आणि दरांची जोखीम या बाबी पाहिल्या तर सामान्य शेतकऱ्याला ही बाब सहजपणे परवडणारी नव्हती. शिवाय कोकणासह अनेक शेतकऱ्याचे सरासरी क्षेत्रही अल्प आहे. सर्वांगीण अभ्यास करून विद्यापीठाला बांबूपासून पॉलिहाउस उभारणीचा पर्याय अधिक महत्त्वाचा, उपयोगी वाटला.

पॉलिहाउस निर्मिती संशोधन

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत म्हणाले, की कोकणात माणगा, मेस व अन्य प्रजातींच्या बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. योग्य वेळी कापणी करून रासायनिक प्रक्रिया केल्यास तर असा बांबू ‘माइल्ड स्टील’पेक्षा ‘पॉवरफूल’ मानला जातो. याच बांबूपासून पॉलिहाउस निर्मितीचे उद्दिष्ट ठेवून आम्ही संशोधन, प्रयोग करीत आहोत. विद्यापीठ प्रक्षेत्रात बांबू प्रक्रियेचे युनिट उभारले आहे.

बांबू तंतुमय घटकांनी (फायबर्स) भरपूर असल्याने तो मजबूत असतोच. पण त्याला अधिक ताकदवान करण्यासाठी पोटॅशिअम डायक्रोमेट, कॉपर सल्फेट व बोरॅक्स या रसायनांचे ठरावीक प्रमाणात मिश्रण केले जाते. गरम पाणी, ‘व्हॅक्यूम’ व हे मिश्रण यांची प्रक्रिया बांबूवर केली जाते. बुरशी किंवा अति पावसामुळे कुजणे या समस्या निर्माण होत नाहीत. असा बांबू देशासह देशाबाहेरही ‘माइल्ड स्टील’ला पर्याय किंवा ‘आरसीसी’ संरचनेच्या बांधकामात वापरला जाऊ शकतो. अशा प्रकारचे बांधकाम बंगळूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘पिलर’मध्ये केले आहे.

...असे आहे तंत्रज्ञान

सध्या प्रचलित लोखंडी (गॅल्व्हनाइज्ड आयर्न) पाइप्सवर आधारित प्रति एक चौरस मीटर पॉलिहाउस उभारणीसाठी हजार ते बाराशे रुपये खर्च येतो. मात्र प्रक्रियायुक्त बांबूवर आधारित पॉलिहाउससाठी हाच खर्च केवळ ४०० ते ६०० रुपये येऊ शकतो. एकूण खर्चात तब्बल ५० टक्के बचत होऊ शकते. विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर विविध पॉलिहाउस मॉडेल्स उभारली आहेत. प्रातिनिधिक सांगायचे, तर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीनजीक ३७ बाय २० चौरस मीटर क्षेत्रफळाचे पॉलिहाउस आहे.

मेस, कळक व बाल्को जातीच्या बांबूचा त्यात वापर केला आहे. प्रमुख संशोधक डॉ. हरिश्‍चंद्र जाधव या प्रकल्पाची जबाबदारी सांभाळत आहेत. अमेरिकेत त्यांनी पीएच.डी. पदवी घेतली आहे. या पॉलिहाउसमध्ये प्लॅस्टिक बॅग व कोकोपीट तंत्राद्वारे काकडी घेण्यात येत आहे. सुमारे १४० किलोमीटर प्रति तास वाऱ्याचा वेग सहन करणे अपेक्षित धरून या पॉलिहाउसचे ‘डिझाइन’ केले आहे. तथापि, बांबू या वेगाला टिकेल की नाही याच्या चाचण्या सुरू आहेत. मात्र १२० किलोमीटर प्रति तास या वाऱ्याच्या वेगाला किंवा मध्यंतरी निसर्ग नावाचे जे वादळ झाले त्याला ते टिकेल अशी खात्री असल्याचे डॉ. जाधव सांगतात.

खर्चात लक्षणीय बचत

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बांबूवर आधारित या पॉलिहाउस उभारणीचा खर्च तब्बल ४० ते ५० टक्क्यांपर्यंत कमी करता येतो. तीन वर्षे वयाच्या बांबूचा (प्रक्रियायुक्त) वापर असलेल्या या पॉलिहाउसची १५ ते २० वर्षे टिकण्याची क्षमता आहे. दहा वर्षांपासून अशी पॉलिहाउस उभारून
विविध प्रयोगांद्वारे त्रुटी, समस्या अभ्यासून सुधारणा केल्या जात आहेत. पॉलिहाउसधील बांबू एकमेकांना जोडण्याच्या तंत्रज्ञानावरही प्रयोग सुरू आहेत. एका तंत्रज्ञानाचे पेटंट लवकरच फाइल केले जाणार आहे. काही आदिवासी समूहांनीही बांबू जोड करण्याची तंत्रे विकसित केली आहेत.

विद्यापीठातील तंत्रज्ञांनी ती आत्मसात केली आहेत. जोडणीसाठी खिळे, ‘नट बोल्ट’ ‘स्टील’चे न वापरता व त्यावरील खर्चही कमी व्हावा यादृष्टीने पूर्ण पॉलिहाउस केवळ बांबूवर आधारित असावे असा प्रयत्न आहे. तुलनेसाठी शेजारी लोखंडी पाइपवर आधारित ६४४ चौरस मीटर आकाराचे पॉलिहाउस आहे. त्यातही गटर उंची, कॉलम व तांत्रिक सुधारणा केल्या आहेत. जेणे करून वायुविजन, तापमान, आर्द्रता या बाबी नियंत्रित केल्या आहेत. यंदाच्या मेपासून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन आमचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. सावंत यांनी सांगितले. याशिवाय प्रक्रियायुक्त बांबूवर आधारित गेस्ट हाउस, अगरबत्ती निर्मिती, ‘हॅन्डीक्राप्ट्‍स’ आदी विविध प्रकारे मूल्यवर्धनही विद्यापीठात केले जात आहे.

संपर्क ः हरिश्‍चंद्र जाधव, ०२३५८-२८२४१४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT