ॲग्रो विशेष

Dr. Rakhmabai Raut : तेजस्विनी : डॉ. रखमाबाई राऊत

भारतातील प्रॅक्टिस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर अशी ख्याती असलेल्या रखमाबाई राऊत यांनी अनेक प्रतिकूलतांवर मात करत आपलं जीवन एका विलक्षण उंचीवर नेऊन ठेवलं. डॉक्टर रखमाबाई राऊत यांचा संघर्ष काळाच्या कसोटीवर तपासून पाहिला, तर त्याची उंची अधिक ठळकपणे लक्षात येते.

टीम ॲग्रोवन

मनीषा उगले

ugalemm@gmail.com

भारतातील प्रॅक्टिस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर (Doctor) अशी ख्याती असलेल्या रखमाबाई राऊत (Dr. Rakhmabai Raut) यांनी अनेक प्रतिकूलतांवर मात करत आपलं जीवन एका विलक्षण उंचीवर नेऊन ठेवलं. डॉक्टर रखमाबाई राऊत यांचा संघर्ष काळाच्या कसोटीवर तपासून पाहिला, तर त्याची उंची अधिक ठळकपणे लक्षात येते.

मुंबईतल्या गोरेगावात रखमाबाईंचा जन्म झाला, वर्ष होतं १८६४. म्हणजे भारतातील ब्रिटिश अमलाचा काळ. त्या अवघ्या सतरा वर्षांच्या असतानाच त्यांचे वडील जनार्दन सावे यांचं निधन झालं. त्यांची आई जयंतीबाई मुलीसह माहेरी राहायला गेली. रखमाबाईंचं आजोळ म्हणजे अत्यंत सधन, प्रतिष्ठित आणि प्रागतिक विचारांचं घर. त्यांचे आजोबा हरिश्‍चंद्र चौधरी हे इंग्रज दरबारी नोकरी करत होते. त्यांना रायबहादूर हा किताबही मिळाला होता. मुलगी आणि नातीच्या भविष्याचा विचार करून त्यांनी मुलीचा पुनर्विवाह घडवून आणला.

नवरामुलगा होता डॉ. सखाराम राऊत. ग्रँट मेडिकल कॉलेज, मुंबई येथे प्राध्यापक असलेले डॉ. राऊत हे आधुनिक विचारांचे गृहस्थ होते. सावत्र वडिलांच्या विचारांचा रखमावर फार प्रभाव होता. त्यांनी तिला निरतिशय प्रेम आणि उत्तम शिक्षण दिलं. पण एक अडचण होऊन बसली होती! त्या काळच्या बालविवाहाच्या प्रचलित प्रथेप्रमाणे रखमाचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षीच करून देण्यात आलेला होता. रखमा एकोणीस वर्षांची झाली तसा तिचा नवरा दादाजी ठाकूर याने तिला सासरी नांदायला ये म्हणून निरोप पाठवला.

हा नवरा होता कसा? वयाने खूपच थोराड, घरच्या श्रीमंतीने लाडावलेला ऐदी मनुष्य. काहीही उद्योग-व्यवसाय न करता महिनोन् महिने तो आपल्या मामांकडे राहायला असायचा. संमतीशिवाय आपला बालविवाह झाला आहे ही गोष्टच मुळी रखमाला पटत नव्हती. अशा नवऱ्यासोबत मी नांदायला जाणार नाही असं रखमाने निक्षून सांगितलं. तत्कालीन समाजात ही मोठीच खळबळजनक घटना होती.

पत्नी नांदायला येत नाही म्हणजे काय? दादाजीने कोर्टात धाव घेतली, रखमावर खटला भरला. ‘‘बालविवाह झालेल्या रखमाबाई ह्या आता सज्ञान झाल्या असून, स्वतःच्या आयुष्याबद्दल बरं वाईट ठरविण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना नवऱ्याच्या घरी नांदायला पाठवणं हा त्यांच्यावर अन्याय होईल.’’ असं मत कोर्टानं नोंदवलं. पण कोर्टाचा हा निर्णय लोकांच्या पचनी पडेना. या निर्णयावर वृत्तपत्रांतून सडकून टीका झाली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुद्धा केसरीतून खरमरीत टीका केली.

दादाजी ठाकूर याला तर कोर्टाचा निर्णय म्हणजे मोठाच अपमान वाटला. त्याने हाय कोर्टात या निर्णयाविरुद्ध अपील केलं. या वेळी मात्र हाय कोर्टाने वेगळा निकाल दिला. ‘‘एका महिन्याच्या आत नवऱ्याकडे नांदायला जावं किंवा सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगण्यास तयार राहावं.’’ पण रखमाबाई डगमगल्या नाहीत, मी एकवेळ तुरुंगात जाणं पसंत करीन, पण मनाविरुद्ध नांदायला जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. एका इंग्रजी वृत्तपत्रातून त्यांनी बाल विवाहाच्या अनिष्ट प्रथेबद्दल तसंच या खटल्यातील स्वतःची भूमिका मांडणारी पत्रं लिहिली.

अनेक समाजसुधारक रखमाबाईंच्या बाजूने उभे राहिले. लंडनच्या एका बिशपनी खुद्द इंग्लंडच्या महाराणी व्हिक्टोरिया यांच्या कानावर ही बातमी घातली. एका विशेष कौन्सिल समोर हा खटला चालवण्यात येईल अशी सूचना त्यांनी केली. आता मात्र दादाजी ठाकूर याचं अवसान गळालं आणि त्याने खटला मागे घेतला. १८८८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. कायदेशीरपणे घटस्फोट घेणारी रखमाबाई राऊत ही भारतातली पहिली महिला ठरली. या सगळ्या संघर्षात तिचे वडील डॉ. सखाराम राऊत हे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. या प्रसिद्ध खटल्यानंतर १८९१ मध्ये ‘संमतीवयाचा कायदा’ पास झाला. त्यानुसार मुलींच्या विवाहाचं वय किमान १२ वर्षे असं निर्धारित केलं गेलं.

यानंतर मात्र रखमाबाई स्वस्थ बसल्या नाहीत. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी त्यांनी लंडन गाठलं. वडिलांसारखं आपणही सर्जन व्हावं अशी त्यांची मनीषा होती. लंडनमध्ये शल्यचिकित्सा, प्रसूतिशास्त्र आणि भूलशास्त्र यांचा त्यांनी सांगोपांग अभ्यास केला. रखमाबाई राऊत डॉक्टर होऊनच भारतात परतल्या. भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान आनंदीबाई जोशी यांचा.

पण दुर्दैवाने आजारपणात त्यांचं लवकर निधन झालं, त्यामुळे फारशी प्रत्यक्ष वैद्यकीय सेवा त्यांना करता आली नाही. डॉ. रखमाबाई राऊत यांनी पुनर्विवाह न करता आपलं संपूर्ण जीवन रुग्णसेवेसाठी वाहून घेतलं. मुंबईच्या कामा हॉस्पिटलमधून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. दीर्घकाळ त्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत राहिल्या. सुरतच्या प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या बाणेदार, तेजस्वी आणि प्रचंड बुद्धिमान असलेल्या स्त्रीचं जीवन हा एक अखंड ऊर्जेचा स्रोत आहे, त्यांच्या चरित्रातून आपल्याला कायम प्रेरणा मिळत राहील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT