Sugarcane News Kolhapur : मागच्या चार दिवसांपासून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आक्रोश पदयात्रा कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांच्या दारातून जात आहे. दरम्यान राजू शेट्टी यांचे काल कागल तालुक्यात आगमन झाले. यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता त्यांना ४०० रुपये कसे देता येतात याचे गणित सांगण्यास मी आलो आहे तुम्हीच तारीख आणि वेळ ठरवा असे जाहीर आव्हान केले.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे राजू शेट्टी यांनी नाव घेतले नाही. दरम्यान, पदयात्रा शाहू साखर कारखाना परिसरात आली यावेळी कार्यकर्त्यांना कारखान्याच्यावतीने पाणी आणि सरबत देण्यात आले.
यावेळी शेट्टी म्हणाले की, गतवर्षी गाळप झालेल्या उसाला अजून प्रतिटन चारशे रुपये द्या, ही मागणी आम्ही साखरेचा वाढीव दर व इतर उपपदार्थ उत्पन्नाचा विचार करून केली आहे. कोणी तरी म्हणत आहेत की चारशे रुपये कसे द्यायचे हे गणित सांगा. आम्ही याबद्दल तयार आहोत. तुम्हीच तारीख आणि वेळ कळवा. आम्ही चारशे रुपये कसे देता येतात याचे गणित सांगू, असे प्रत्युत्तर देण्यात आले.
संघटनेची आक्रोश पदयात्रा कागलमध्ये आल्यानंतर त्यांचे सांगाव नाक्यावर जल्लोषी स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर राजू शेट्टी यांनी उपस्थितांना संबोधित केले. साखर अजूनही ३८५० रुपये क्विंटल आहे. साखर कारखानदारांनी ३२०० रुपये क्विंटल दराचा हिशेब करून गतवर्षी ऊस दर दिला आहे. इथेनॉलचे एक टक्के वाढीव धरले तर १६१ रुपये वाढतात असे शेट्टी म्हणाले.
शेतकऱ्यांकडून १ हजार भाकरी
कागल-मुरगुड राज्य मार्गावरून जाणारे राजू शेट्टी यांच्या आक्रोश पदयात्रेला ग्रामीण भागातून प्रतिसाद मिळाला. ही पदयात्रा कागलहून पिंपळगाव खुर्द, व्हन्नुर, सिद्धनेर्ली येथून पुढे गेली. राजू शेट्टी यांचे औक्षण, पायावर पाणी घालत, गळाभेट घेतली जात होती. महिला व तरुणांत मोठा उत्साह होता. काही शेतकरी बैलगाडी सजवून सहभागी झाले होते.
कागल तालुक्यातील प्रमुख चारही गटांचे साखर कारखाने असताना त्यांचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात सामील झाले होते. नदी किनारा सिद्धनेर्ली येथे म्हसोबा मंदिर परिसरात पदयात्रा दुपारी थांबली होती. या ठिकाणी सिद्धनेर्लीमधून गोळा केलेल्या एक हजार भाकरी, ठेचा, दही, पिटले, भात असे जेवण एक हजार लोकांनी केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.