Turmeric Processing Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Processing : हळद पावडर, खपली गव्हाला दिली बाजारपेठ

Team Agrowon

चंद्रकांत जाधव

Turmeric Powder : रावेर (जि. जळगाव) तालुका हळद पिकासाठी प्रसिद्ध आहे. हे महत्त्व, बाजारपेठ क्षमता ओळखून तालुक्यातील राझोदा येथील रजोदक फार्मर प्रोड्यूसर कंपनीने हळद पावडरनिर्मिती सुरू केली. सोबत खपली गव्हाचेही उत्पादन घेत दोन्ही उत्पादनांसाठी बाजारपेठ व्यवस्था बळकट केली. आजमितीला साठ लाखांपर्यंत उलाढाल नेत आपली वाटचाल आत्मविश्‍वासपूर्वक सुरू ठेवली आहे.

जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील हळदीला राज्यासह इतर भागांत मागणी असते. विविध कारखानदार, संस्था, खासगी कंपन्या येथे कार्यरत आहेत. तालुक्यातील राझोदा हे रावेरपासून २५ किलोमीटरवरील गाव आहे. सातपुडा पर्वतालगत असल्याने पर्वतावरून येणारे नाले, लहान नद्यांचा लाभ गावास होतो. त्यामुळे शिवारात जलसाठे मुबलक व काळी कसदार, मध्यम जमीन आहे. केळी हे शिवारातील मुख्य व त्या पाठोपाठ हळद पिकाला पसंती असते. राझोदा येथील भालचंद्र चौधरी यांची १८ एकर शेती व हळद मुख्य पीक आहे. आपल्या भागातील हळद उत्पादकांचे उत्पन्न वाढवायचे तर पावडर निर्मितीद्वारे मूल्यवर्धन हा चांगला पर्याय असल्याचे चौधरी यांनी जाणले. त्यांचे कृषी निविष्ठा विक्री केंद्रही असल्याने शेतकऱ्यांसोबत दांडगा संपर्क आहे. त्या दृष्टीने रावेर, यावल, मुक्ताईनगर आदी ठिकाणी भेटी देऊन हळद उत्पादकांसोबत चर्चा केली. पाल (ता. रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्रात प्रक्रिया प्रकल्प, योजनांचा अभ्यास केला. केंद्राचे प्रमुख डॉ. महेश महाजन, डॉ. धीरज नेहेते यांनी मार्गदर्शन केले.

या सर्व प्रयत्नांमधून चौधरी यांनी परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेत रजोदक फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली. अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर बीएस्सी ॲग्री आणि व्यवस्थापनातील ‘बीबीए’ पदवीही त्यांनी घेतली. आपल्या उच्चशिक्षणाचा फायदा कंपनीला पुढे नेण्यासाठी करण्याच्या दृष्टीनेही त्यांनी विचार केला. ते कंपनीचे अध्यक्ष आहेत तर कैलास वायकोळे उपाध्यक्ष आहेत. किशोर धांडे, किशोर घनश्याम सरोदे, मनोज फेगडे, कोमल महाजन, दिलीप धांडे, नितीन वायकोळे, शंकर पाटील, मोहन नेमाडे, अतुल बखाल हे संचालक आहेत. मुक्ताईनगर, यावल व रावेर तालुक्यातील विविध गावांमधील शेतकरी कंपनीशी जुळले आहेत.

प्रक्रियेचे यांत्रिकीकरण

‘रजोदक’ कंपनीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोखरा) मदतीने व बँकेकडून २५ लाख रुपये साह्य घेत गावातच चार हजार चौरस फूट शेडमध्ये प्रक्रिया केंद्र उभारले. त्यात क्लीनर, ग्रेडर, ग्राइन्डर, मॅग्नेटिक डिस्टोनर, पॅकिंग यंत्र आदी सर्व यांत्रिक सुविधा उभारल्या. हळद शिजविण्यासाठी बॉयलर घेतले. कंपनीकडे पाच लाख रुपये खेळते भांडवलही होते. कंपनीला तालुका कृषी अधिकारी मयूर भामरे, पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी एल. ए. पाटील, तत्कालीन कृषी उपसंचालक अनिल भोकरे, ‘आत्मा’चे उपसंचालक कुरबान तडवी यांचे मार्गदर्शन मिळाले.

थेट खरेदी व शेतातील प्रक्रिया

परिसरातील शेतकरी हळदीची विक्री मध्यस्थांना करायचे. तिथून ही हळद प्रक्रियेसाठी मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रात पाठवली जायची. या प्रक्रियेत बदल करताना ‘रजोदक’ने थेट सभासदांकडून ओल्या हळदीची खरेदी सुरू केली. बाजारातील प्रचलित दरांनुसार या हळदीची खरेदी होते. गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांना ८५०, ९०० ते ११०० रुपये प्रति क्विंटलचा दर दिला. त्याचे लागलीच चुकारेही
देण्यात येतात. काही शिवारे निश्‍चित करून तेथे हळद शिजवणे व वाळवणी प्रक्रिया होते. त्यानंतर हळद
प्रक्रिया केंद्रात येते. या केंद्रानजीक लहान गोदाम आहे. कंपनीचे सुसज्ज, संगणकीकृत कार्यालय आहे. लवकरच कंपनी स्वमालकीचे शीतगृह, मोठे गोदाम उभारणार आहे. सहा कायमस्वरूपी कर्मचारी आहेत. फेब्रुवारी ते जून या काळात दररोज सुमारे १३ कुशल मजुरांची गरज असते.

तयार केली बाजारपेठ

हळद पावडरीसह कंपनीने भागातील गहू उत्पादकांकडील खपली गव्हालाही बाजारपेठ देण्याचा
प्रयत्न केला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना त्याचे पुण्याहून बियाणे आणून पुरवले आहे. उत्पादनांचा रजोदक हाच ब्रॅण्ड तयार केला आहे. पुणे, डोंबिवली, ठाणे, कल्याण, नाशिक, अकोला, जळगाव, भुसावळ (जि. जळगाव) व रावेर भागात विक्री केंद्रांच्या ठिकाणी हळद पावडर विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. पन्नास ग्रॅम, २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम अशा वजनात हळदीचे पॅकेट तयार केले जातात. पाचशे ग्रॅमसाठी १५५ रुपये त्याचा दर आहे. अनेक खरेदीदार राझोदा येथील केंद्रात येऊनही खरेदी करतात. खपली गहू ८० रुपये प्रति किलो दराने दिला जातो. गेल्या दोन वर्षांत अनुक्रमे ४५ लाख व ५५ ते ६० लाख रुपयांपर्यंत उलाढाल करण्याचा प्रयत्न केला आहे.

कंपनीची आशादायक वाटचाल

रसायन अवशेष मुक्त उत्पादन घेण्यावर कंपनीचा भर आहे. राज्याच्या पणन संचालनालयाकडे थेट खरेदी परवाना घेण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. आगामी काळात बारकोड व अन्य सुधारित प्रक्रिया पार पाडून मॉलला उत्पादने पाठवण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. मसाला पिकांसंबंधी केरळ व अन्य भागात पाहणी दौरे आयोजिले आहेत. यातून हळद लागवड, वाण, दर्जेदार उत्पादन, बाजारपेठ आदी माहिती घेतली आहे.

भालचंद्र चौधरी, ९४२२५७७५६४, ९७६४७४१७२३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT