Phulambri Corruption Agrowon
ॲग्रो विशेष

Phulambri Corruption : नोटांच्या पावसाने भ्रष्टाचाराची विहीर भरेल?

मराठवाड्यात फुलंब्री तालुक्यातील सरपंच मंगेश साबळे यांनी पंचायत समितीसमोर ज्या नोटा उधळल्या त्याची एक ब्रेकिंग न्यूज बनली. हटके व्हिडिओ म्हणून तो तुफान शेअर झाला आणि मंगेशने जे धाडस दाखवले त्या चर्चेत संपला.

हेरंब कुलकर्णी

हेरंब कुलकर्णी

Marathwada News : मराठवाड्यात फुलंब्री तालुक्यातील सरपंच मंगेश साबळे यांनी पंचायत समितीसमोर ज्या नोटा उधळल्या त्याची एक ब्रेकिंग न्यूज बनली. हटके व्हिडिओ म्हणून तो तुफान शेअर झाला आणि मंगेशने जे धाडस दाखवले त्या चर्चेत संपला.

मध्यंतरी जितेंद्र भावे यांनी हॉस्पिटल जी लूट करतात त्याविरुद्ध संताप व्यक्त करण्यासाठी कपडे काढून दिले होते. तो व्हिडिओ एक कोटी लोकांनी बघितला. सोशल मीडियामुळे अशी कल्पक आंदोलने होतात. त्यावर कारवाई होते व चर्चा थांबते पण व्यवस्था सुधारत नाही.

मंगेश इतका टोकाला का जातो? शेतकरीवर्ग आज आपले मनःस्वास्थ्य गमावून असे का वागतो आहे? आत्महत्या करणे हे याच तीव्रतेने घडते.

परंतु लाल चिखल या भास्कर चंदनशिव यांच्या कथेतील शेतकरी लोक भाव पाडून मागायला लागल्यावर शेवटी टोमॅटो फेकून देत त्यावर नाचायला लागतो, पायाखाली तुडवितो.

नोटा फेकणारा मंगेश आणि भास्कर चंदनशिव यांच्या कथेतील आबा यांचे हे असे वागणे समजून घेण्याची गरज आहे. त्यांच्या विसंगत वागण्यातील सुसंगती समजून घेण्याची गरज आहे.

आज योजनांसाठी पैसे मागणे हे इतके सर्रास झाले आहे, की त्याची बातमी ही होत नाही. अगदी गरीब विधवा व निराधार यांना जे अल्प पेन्शन मिळते, त्यातही दलाल निर्माण झाले आहेत. आणि हे सगळीकडे घडत असल्याने त्याला बातमीमूल्य ही उरले नाही.

राजकीय नेते व अधिकारी अशी साखळी निर्माण झाल्याने कार्यकर्तेदेखील यावर आक्रमक जाब विचारत नाहीत. अशावेळी खूप सहन करून कर्जबाजारी होऊन बहुसंख्य लोक लाच देऊन काम करून घेतात. अधिकारी इतके हुशार झालेत की ते तालुक्यातील प्रमुख राजकीय कार्यकर्ते, पत्रकार, श्रीमंत यांना सांभाळतात.

त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आवाज उठत नाही व त्याचा फायदा घेत गरिबांना नाडत राहतात. अशा खूप सहन केलेल्या गरिबांचा मंगेश हा एक हुंकार आहे. त्या दबलेल्या आवाजांचा तो बंडखोर आवाज आहे. त्याने फेकलेल्या नोटांतून भ्रष्टाचारच्या विहिरीच्या पाण्यातील तरंग फक्त दिसले या विहिरीचा ठाव काही केल्या लागत नाही.

सरकारने योजना आणल्या तर त्या ठेकेदारांना दिल्या जातात. ते ठेकेदार अधिकारी आणि नेत्यांना टक्केवारी देतात. आणि व्यक्तिगत लाभाच्या योजनेत गरीब लाभार्थी असेल तर त्यांना असे नाडले जाते.

पोलिस स्टेशन ला तक्रार करण्याचे पैसे आणि तपास होऊ नये म्हणून आरोपीकडून पैसे, असे सर्वच क्षेत्रात सुरू आहे. सिनियर कॉलेजच्या प्राध्यापक भरतीत याच मराठवाड्यात एका प्रसिद्ध कार्यकर्ता अध्यक्ष असलेल्या संस्थेत ९० लाख घेतले आहेत.

असे सर्वच बाजूने आभाळ फाटलं आहे आणि त्याची चर्चाही कुठे होत नाही, अशा स्थितीत मंगेश हा दबलेला हुंकार आहे. त्याने व्यवस्था बदलत नसते, पण आजाराचे लक्षण पुन्हा पुन्हा असे प्रकार अधोरेखित करत असतात.

कल्याणकारी योजनेत इतका भ्रष्टाचार होत आहे. राजीव गांधी म्हणायचे, की आम्ही १०० रुपये पाठवले, तर १५ रुपयेच शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात. हे सांगूनही आता ४० वर्षे झाली तरी वास्तव बदलले नाही.

तेव्हा आता सरकारने योजना न राबवता गरिबांच्या हातात थेट निधी द्यावा व मधले अधिकारी ठेकेदार काढून टाकावेत हाच उपाय उरला आहे. शालेय पोषण आहार ते रेशन व सर्व योजनांचे पैसे थेट देऊन टाकावेत.

असे सुचवले की हमखास एक वाक्य येते की गरीब त्याची दारू पितील. ३१ मार्च चे श्रम घालवायला अधिकारी याच गरिबांच्या पैशातून ठेकेदारासह दारू पितात हे कोणाला खटकत नाही पण गरिबांच्या हातात पैसा देण्याची गोष्ट आली की लगेच गरिबांवर अविश्वास...! मंगेश साबळे ने पैसे रस्त्यावर उधळले, याच लाचेचे पैसे चौफुली आणि बार मध्ये

उधळले जातात. त्या मस्तवालपणाचे व्हिडिओ मात्र निघत नाहीत, व्हायरलही होत नाहीत इतकेच...!!

लेखक - सामाजिक कार्यकर्ते, नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Crop Protection: द्राक्ष पीक वाचविण्यासाठी खर्चात चौपट वाढ

Ginning Pressing Industry: जिनिंग प्रेसिंग कारखाने दीपोत्सवानंतर धडाडणार

Raisin Market: झीरो पेमेंटसाठी बेदाण्याचे सौदे एक महिना बंद

Farmer Relief Package: अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच

Maharashtra Rain: राज्यात विजांसह पावसाची अंदाज कायम

SCROLL FOR NEXT