ॲग्रो विशेष

Rabbi Jowar Production : रब्बी ज्वारी ठरतेय उत्तम पर्यायी, किफायतशीर पीक

 गोपाल हागे

गोपाल हागे

Jowar Production : सुधारित वाणाचा वापर व कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान- व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास रब्बी ज्वारीचे पीक चांगल्या धान्य व चारा उत्पादनासह आश्‍वासक उत्पन्नही मिळवून देते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ज्वारी संशोधन केंद्रातर्फे खारपाणपट्ट्यासह विदर्भातील शेतकऱ्यांकडे सुधारित पद्धतीने ज्वारीची तीन हजारांहून अधिक प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. त्यातून शेतकऱ्यांना हे पीक पर्यायी व किफायतशीर ठरत असल्याचे आढळले आहे.

मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. रब्बी हंगामाचे वेध शेतकऱ्यांना लागले आहेत. अलीकडील काही हंगामांचा विचार करता हरभरा, गहू या पिकांसह ज्वारी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांनी रब्बी हंगामासाठी ज्वारीचे वाण विकसित केले आहेत. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने खरीप हंगामासह रब्बीसाठी शोधलेले वाण शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत असून पसंतीला उतरले आहेत.

ज्वारी हे बहुआयामी पीक आहे. सर्व हंगामात तसेच वेगवेगळया परिस्थितीत, कमी पाण्यात व कमी निविष्ठांमध्ये घेता येणारे किफायतशीर पीक म्हणून त्याची ख्याती आहे. या पिकाचा उपयोग धान्य, कडबा, वाणी ज्वारीचा हुरड्यासाठी, गोड ज्वारीचा मूल्यवर्धनासाठी तसेच वैरण ज्वारीचा हिरव्या चाऱ्यासाठी उपयोग होतो. जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावर रब्बी हंगामामध्ये ज्वारीची ऑक्टोबर महिन्यात पेरणी करून चांगले उत्पादन मिळू शकते हे अनेक शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. रब्बी हंगामातील ज्वारीचा कडबा व धान्याची प्रत अतिशय चांगली राहत असल्याने बाजारभावही चांगला मिळतो.

ज्वारीच्या वाणांवर संशोधन

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ज्वारी संशोधन केंद्राची स्थापना सन १९७५ मध्ये
झाली. राष्ट्रीय व राज्यपातळीवर ज्वारीचे अनेक सुधारित व संकरित वाण प्रसारित करण्यात केंद्राला यश आले. शेतकऱ्यांच्या गरजेनुरूप संशोधनाच्या अनेक शिफारशी या केंद्राने दिल्या आहेत. त्यांना मान्यता प्राप्त झाली आहे. केंद्राद्वारे रब्बी हंगामासाठी उपलब्ध वाणांमध्ये पीकेव्ही - क्रांती हा वाण सर्वोकृष्ट ठरला आहे. त्याची धान्य व कडब्याची प्रत उत्तम आहे. सीएसएच - ३९ आर, सीएसव्ही - २९ आर आणि रब्बी ज्वारी हुरड्याचा नवा वाण टीएकेपीएस ५ (ट्रॉम्बे अकोला सुरूची) हा नुकताच प्रसारित झाला आहे. अन्य विद्यापीठांचा विचार केल्यास रब्बीसाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील फुले अनुराधा, फुले सुचित्रा, फुले वसुधा, फुले रेवती, तसेच हुरडा वाणांमध्ये फुले मधुर व फुले उत्तरा आदी वाण आहेत. परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने परभणी मोती, परभणी सुपर मोती, परभणी ज्योती, परभणी वसंत (हुरडा वाण) आदी महत्त्वपूर्ण उत्पादनक्षम वाण प्रसारित केले आहेत.

रब्बी ज्वारीचे राष्ट्रीय पातळीवरील संकरित वाण
सीएसएच १९ आर

रब्बी हंगामासाठी हा संकरित वाण २००० मध्ये राष्ट्रीय पातळीवर प्रसारित करण्यात आला. या वाणाचे धान्य उत्पादन हेक्टरी ३८ ते
४० क्विंटल आहे. तर ८० ते ८५ क्विंटल वैरण (प्रति हेक्टरी) या वाणापासून मिळते. मध्यम ते भारी जमिनीत ओलिताखाली या वाणाची शिफारस करण्यात आली आहे.

सीएसएच ३९ आरर

हा वाण २०१८ मध्ये प्रसारित करण्यात आला. त्याचे धान्य उत्पादन ३५ ते ३८ क्विंटल प्रति हेक्टरी व वैरणीचे उत्पादन ८० ते ८२ क्विंटल (प्रति हेक्टरी) आहे. धान्याची व वैरणीच्या कडब्याची प्रत अतिशय उत्तम असून, किडी- रोगास तो प्रतिकारक आहे.

रब्बी ज्वारीचे राज्य पातळीवरील सुधारित वाण

पीकेव्ही - क्रांती

हा सरळ वाण सन २००७ मध्ये राज्यपातळीवर प्रसारित करण्यात आला. त्याचे धान्य उत्पादन ३० क्विंटल प्रति हेक्टर असून, तर वैरणीचे उत्पादन ८५ ते ९० क्विंटल आहे. धान्याची प्रत व कडब्याची उत्कृष्ट असून, त्याची भाकरी विशेष रुचकर आहे. या वाणाची कोरडवाहू, तसेच ओलिताखाली रब्बी हंगामासाठी शिफारस करण्यात आली असून तो लोकप्रिय आहे.

ट्रॉम्बे अकोला सुरूची (टीएकेपीएस - ५)

हा हुरड्याचा वाण सन २०२२ मध्ये प्रसारित झाला असून, तो मळणीस अतिशय सुलभ आहे. हुरड्याची प्रत उत्तम असून तो चवदार आहे. हुरड्याचे उत्पादन ४३ क्विंटल प्रति हेक्टरी, तर ११० क्विंटल हिरवा चारा उत्पादन आहे. या वाणाचा हुरडा ९० दिवसांत तयार होतो.

संयुक्त संशोधन प्रकल्प

ज्वारी संशोधन केंद्रात विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत संयुक्त संशोधन प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये प्रामुख्याने इक्रिसॅट, हैदराबाद, आयआयएमआर, हैदराबाद, आयसीएआर, नवी दिल्ली, भाभा अणू संशोधन संस्था ट्रॉम्बे मुंबई, राष्ट्रीय कृषी विकास योजना, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
आदींचा समावेश आहे.

रब्बी ज्वारीची तीन हजारांहून अधिक प्रात्यक्षिके

पश्‍चिम विदर्भामध्ये मोठया भूभागात खारपाणपट्ट्याचा भाग आहे. सुमारे चार हजार ७०० चौरस किलोमीटर (५० टक्के) क्षेत्र खारपाण बाधित आहे. या पट्ट्यातील कोरडवाहू व अन्य कोरडवाहू क्षेत्रात
नवचैतन्य निर्माण करण्यासाठी ज्वारी संशोधन केंद्राद्वारे पर्यायी पीक म्हणून ज्वारीचा प्रचार व प्रसार कार्यक्रम हाती घेतला आहे. मागील पाच वर्षांपासून रब्बी हंगामापर्यंत एकूण ३५५० प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. सरासरी हेक्टरी २७.७५ ते ३६.२० क्विंटल उत्पादकता मिळाली आहे. ‘ट्रायबल सब प्लॅन’अंतर्गत आदिवासी बहुल क्षेत्र असलेल्या मेळघाट येथेही उपक्रम राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने धारणी स्थित कृषी तंत्रज्ञान विद्यालयात पौष्टिक तृणधान्य प्राथमिक प्रक्रिया केंद्राची स्थापना करून मूल्यवर्धनासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे.

रब्बी ज्वारी व्यवस्थापन पंचसूत्री (कंसात अपेक्षित उत्पादन वाढ)

-मूलस्थानी पाणी व्यवस्थापन (३० टक्के वाढ)
-पीकेव्ही - क्रांतीसारख्या सुधारित वाणाचा वापर (२५ टक्के)
-ओलावा व्यवस्थापन (२० टक्के)
-एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन (१५ टक्के)
-एकात्मिक पीक संरक्षण (१० टक्के)


ज्वारी उत्पादकांचे अनुभव
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे स्थापित शेतकरी शास्त्रज्ञ मंचाद्वारे ज्वारी लागवडीसाठी मला मार्गदर्शन लाभले. तीन वर्षांपासून मी रब्बीत पाच ते सहा एकरांवर ज्वारी घेत आहे. आमच्या गावात रब्बी ज्वारीखालील क्षेत्र १०० ते १२५ एकरांपर्यंत झाले असावे. मी विद्यापीठाच्या पीकेव्ही क्रांती व अन्य एका खासगी कंपनीच्या वाणाची लागवड करतो. आमचा भाग खारपाणपट्ट्यात येतो.
या भागासाठी ज्वारीचा पर्याय चांगला ठरला आहे. अलीकडील वर्षांत एकरी ९ ते १५ क्विंटलच्या दरम्यान उत्पादन मिळाले आहे. जागेवरूनच ज्वारीची विक्री होते. त्यास तीन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. शिवाय एकरी दोनशे ते अडीचशे पेंढी कडबा मिळतो. घरच्या तीन गायी, दोन म्हशी व एक बैलजोडी आहे. त्यांच्यासाठी पुरेसा चारा ठेवून उर्वरित चाऱ्याची चार हजार रुपये प्रति शेकडा दराने विक्री करणे शक्य झाले आहे. एकरी सर्व मिळून एकरी ४० हजार रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न हाती येते. बियाणे, लागवड, व्यवस्थापन, दोन वेळा खत व्यवस्थापन, एक फवारणी, काढणी असा सर्व मिळून एकरी बारा हजारांपर्यंत खर्च येतो. हंगामात पावसाच्या उपलब्धतेनुसार दोन ते तीनवेळा सिंचन करतो. ज्वारी घेण्यापूर्वी आमच्याकडे गहू, हरभरा ही पिके असायची. मात्र त्यांचा उत्पादन खर्च तुलनेने जास्त आहे. हरभऱ्याला जनावरांचा धोकाही आमच्याकडे आहे. या पिकांच्या तुलनेत रब्बीत ज्वारीचे व्यवस्थापन व अर्थकारण सरस वाटत आहे. भविष्यात ज्वारीचे क्षेत्र अधिक वाढल्यास वन्यप्राण्यांचा होणारा धोका कमी होईल.

अविनाश मेटांगे, झुरळ बु।।, जि. अकोला
९८९०७२५९११


गेल्या १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून रब्बी ज्वारीचे पीक घेत आहे. पूर्वी कुटुंबापुरतेच
क्षेत्र असायचे. आता आमच्या भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानच्या माध्यमातून उमरखेड, महागाव
भागात ज्वारीचा पेरा वाढला आहे. ‘पीकेव्ही क्रांती’ या वाणाची लागवड करणारे शेतकरी वाढले आहेत. खरिपात सोयाबीन व रब्बीत ज्वारी ही पीकपद्धती बागायत क्षेत्रात आर्थिकदृष्ट्या आणि अधिक उत्पादनासाठी मला फायदेशीर ठरली आहे. सोयाबीन काढणी केल्यानंतर सप्टेंबरचा दुसरा पंधरवडा किंवा ऑक्टोबरच्या २० तारखेपर्यंत ज्वारीची पेरणी पूर्ण करतो. सरी पद्धतीचा वापर करतो. पिकाला पाणी देण्यासाठी आडवे उभे दांड पाडून ठेवतो. त्यामुळे ज्वारी फुलावर असताना पाण्याची गरज सिंचनाद्वारे पूर्ण करता येते. योग्यखत मात्रेसह हेक्टरी १० किलो बियाणे वापरतो.

बियाणे पाच सेंटिमीटर खोलीवर पडण्याची काळजी घेतो. ४५ बाय १५ सेंटिमीटर अंतराने बियाणे पेरल्यास पुढे कणीस भरीव होण्यास व पिकाला सूर्यप्रकाश मिळण्यास वाव मिळतो. ज्वारी पेरताना त्यामध्ये ज्वारीपेक्षा उंच वाढणारी बाजरी व अन्य ज्वारी असे थोड्या प्रमाणात मिश्रण करून पेरतो. त्यामुळे रानपाखरे त्याच कणसांवर आकर्षित होतात. पक्ष्यांपासून नुकसान टाळता येते. ज्वारी पीक सुमारे ११० ते १३० दिवसांत येते. अधिक उत्पादनासह ज्वारीचा दाणा चांगल्या दर्जाचा होण्याच्या दृष्टीने
जास्त परिपक्वता कालावधी घेणाऱ्या वाणाची निवड करतो. त्यासाठी पीकेव्ही क्रांती हे वाण योग्य
ठरते आहे. दरवर्षी चार ते पाच एकरांत लागवड करतो. एकरी १० ते ११ क्विंटलपर्यंत उत्पादकता मी मिळवली आहे.
अशोकराव वानखेडे, सुकळी, जि. यवतमाळ
९४०३४९३१००

माझी शेती खारपाण पट्ट्यात आहे. मी चार वर्षांपासून पीकेव्ही क्रांती वाणाची तीन ते चार एकरांत लागवड करतो. साधारणतः १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान लागवडीचे नियोजन असते. एकरी तीन किलो बियाणे वापरतो. उपलब्धतेनुसार कधी ट्रॅक्टर तर कधी तिफणचा वापर होतो. पेरणीसोबत २०.२०.०.१३ किंवा डीएपी हे खत एकरी २५ किलो वापरतो. जमिनीतील ओलाव्यावर पिकाची वाढ होते. साधारणपणे महिनाभराने पहिले पाणी देतो. त्यासाठी शेततळ्यातील पाण्याचा खूप मोठा आधार असतो. एकूण हंगामात दोन वेळा पाणी द्यावे लागते. खारपाणपट्टा असल्याने संरक्षित सिंचन असेल तर हे पीक घेता येते. पिकाला दोन वेळा डवऱ्याचे फेर देतो. पहिल्या डवरणीवेळी एकरी २५ किलो युरिया देतो. मागील तीन वर्षांत एकरी ६ क्विंटल ते ८ क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले आहे. पक्षी किमान १० टक्क्यांपर्यंत धान्य खातात. एकरी ५०० पेंडी कडबा मिळतो. त्यामुळे चाऱ्याची व्यवस्था होते. जनावरांना कुट्टी बनवून खाऊ घालतो.
- अरुण सुरेशराव पागृत, घुसर, ता. जि. अकोला
९४२३१६११३३

आमचे दरवर्षी तीन ते साडेतीन एकरांत रब्बी ज्वारीचे क्षेत्र राहते. दोन तासांतील अंतर २१ इंच ठेवतो. एकरी पाच किलो बियाणे वापरतो. पेरणी करताना २०- २०- ०- १३ खताची मात्रा देतो. त्यानंतर ३० ते ३५ दिवसांनी कीडनाशकाची फवारणी घेतो. पीक दीड महिन्याचे झाले असताना दुसरी फवारणी करतो. डवऱ्याचे तीन फेरे देतो. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पेरणी केल्याने सहा ते सात वेळा पाणी द्यावे लागले. अन्यवेळी पेरणी केल्यास चार ते पाच वेळा पाणी द्यावे लागते. गेल्या वर्षी खासगी कंपनीचे वाण वापरले त्यास एकरी १८ ते २० क्विंटलच्या दरम्यान उत्पादन मिळाले. प्रति क्विंटल २५०० रुपये दराने विक्री केली. एकरी साडेतीनशे ते चारशे पेंढ्यांपर्यंत कडबा मिळाला. रब्बीतील अन्य पिकांच्या तुलनेत ज्वारीला खर्च कमी लागतो. त्यामुळे हे पीक परवडते.
प्रभाकर लळे, रा. देगाव, ता. बाळापूर
९७६७९४२३४६

रब्बीत ज्वारी ठरतेय आश्‍वासक

मागील काही वर्षांत खारपाणपट्ट्यात रब्बीत हरभऱ्याचे पीक प्रमुख बनले होते. आता रब्बी ज्वारीकडे कल वाढू लागला आहे, या भागात हे पीक शेतकऱ्यांना मोठा आधार देत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे एक ते दोन संरक्षित पाण्याची सुविधा आहे असे शेतकरी हमखास ज्वारीची काही क्षेत्रांवर लागवड करतात.
शासनाने संकरित ज्वारीला ३१८०, तर मालदांडी ज्वारीला ३२२५ रुपये प्रति क्विंटल किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे. आज आहारात ज्वारीचा वापर वाढला असून, बाजारात त्यास चांगला दर मिळत आहे. गावरान ज्वारी किमान दोन हजार रुपयांपेक्षा अधिक दराने विकली जाते. ज्वारीसोबतच कडबाही शेतकऱ्यांना पैसा मिळवून देतो. मध्यंतरीच्या काळात खारपाणपट्ट्यात ज्वारीचे क्षेत्र कमी झाल्याचे प्रमुख कारण वन्यजीवांचा त्रास हे होते. हा त्रास आजही कायम आहे. काही वाण गुळचट असल्याने त्याकडे पक्षी अधिक आकर्षित होतात असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


संपर्क
- डॉ. गोपाल ठाकरे, ९४२२९३९०६५
(सहायक प्राध्यापक)
डॉ. आर. बी. घोराडे, ९८५०७२३७०६
(वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ)
ज्वारी संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला


Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT