Oilseeds Farming: यंदाच्या रब्बी हंगामात देशातील ६१४ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने सोमवारी (ता.३०) दिली आहे. यामध्ये सर्वाधिक पेरणी क्षेत्र गव्हाखालील आहे. तर हरभरा, मसूर, वाटाणा, उडीद, मूग या कडधान्य पिकांचं क्षेत्र आघाडीवर असल्याची आकडेवारी केंद्रीय कृषी मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे. परंतु रब्बी तेलबिया पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र पिछाडीवर गेल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे.
रब्बी हंगामात मोहरी, भुईमूग, सूर्यफुल, करडई, तीळ, जवस, या तेलबिया पिकांची लागवड केली जाते. गेल्यावर्षी रब्बी हंगामात देशभरात १०१.३७ लाख हेक्टरवर तेलबिया पिकांची लागवड करण्यात आली. यंदा मात्र रब्बी हंगामात मात्र ९६.१५ लाख हेक्टरवरच तेलबिया पिकांची लागवड करण्यात आल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या रब्बी पेरणी अहवालाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे.
देशातील एकूण गरजेच्या सुमारे ६० ते ६५ टक्के खाद्यतेल आयात केली जाते. त्यामुळे केंद्र सरकार तेलबिया मिशन राबवून तेलबिया पिकांखालील क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा करत आहे. यंदा देशात मॉन्सून हंगामात चांगल्या पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे रब्बीत तेलबिया लागवडीला शेतकरी पसंती देतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु केंद्र सरकारच्या धोरण धरसोडीमुळे तेलबिया उत्पादकांना आर्थिक झळ बसत आहे. परिणामी शेतकऱ्यांनी रब्बी तेलबिया पिकांकडे पाठ फिरवत आहे. यामध्ये मोहरीचं क्षेत्र सर्वाधिक पिछाडीवर आहे. गेल्यावर्षी रब्बी हंगामात मोहरी ९३.७३ लाख हेक्टरवरील क्षेत्र यंदा ८८.५० टक्क्यांवर आहे.
देशात गेल्यावर्षी ३१३ लाख हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली होती. परंतु यंदा मात्र गव्हाच्या पेरणी खालील क्षेत्र ३१९.७४ लाख हेक्टरवर पोहचल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयाने सांगितलं आहे. त्यामुळे डिसेंबर अखेर गहू लागवडीने आघाडी घेतली आहे. तर भात पिकाखालील क्षेत्र गेल्यावर्षी १३.६१ लाख हेक्टरवरून यंदा १४.९७ हेक्टरवर पोहचलं आहे. कडधान्य पिकांमध्ये सर्वाधिक हरभरा पेरणी झाली आहे. यंदाच्या रब्बी हंगामात हरभराखालील क्षेत्र ९३.९८ लाख हेक्टर आहे. तर गेल्यावर्षी हरभरा पिकाखालील क्षेत्र ९३.१७ लाख हेक्टर होतं. परंतु सरासरीच्या तुलनेत हरभरा पिकाखालील क्षेत्र पिछाडीवर असल्याचं दिसतं.
मक्याखालील क्षेत्रात आघाडी
देशातील एकूण मका पिकाखालील क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आघाडीवर आहे. गेल्यावर्षी रब्बी हंगामात १७.५३ लाख हेक्टर क्षेत्र मका पिकाखाली होतं. यंदा मात्र त्यामध्ये आघाडी घेत मका पिकाखालील क्षेत्र १८.९३ लाख हेक्टरवर पोहचलं आहे, असंही केंद्रीय कृषी मंत्रालयाने पेरणी अहवालात सांगितलं आहे.
भरडधान्यात घसरण
ज्वारी, बाजरी, नाचणी या भरडधान्य पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने श्री अन्न असं भरडधान्य पिकांचं नामाकरण केलं. तसेच राष्ट्रीय आणि जागतिक भरडधान्य वर्ष साजरी केली. परंतु ज्वारी पिकाखालील क्षेत्र पिछाडीवर आहे. ज्वारी पिकाखालील क्षेत्र गेल्यावर्षी २२.५२ लाख हेक्टर होतं. यंदा मात्र ३० डिसेंबरपर्यंत ज्वारी क्षेत्र २२.२४ लाख हेक्टरवर आहे. तर बाजरी पिकांखालील क्षेत्र गेल्यावर्षीच्या ०.१४ लाख हेक्टरवरून ०.१२ लाख हेक्टवर घसरलं आहे. तसेच नाचणी पिकाखालील क्षेत्रातही गेल्यावर्षीच्या तुलेनेत पिछाडी आहे. गेल्यावर्षीच्या ०.५८ लाख हेक्टरवरून नाचणी पिकाखालील क्षेत्र चालू रब्बी हंगामात ०.४९ लाख हेक्टरवर घसरलं आहे.
दरम्यान केंद्र सरकारकडून तेलबिया, कडधान्य, भरडधान्य पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी मिशन राबवली जात आहेत. परंतु दुसरीकडे मात्र केंद्र सरकारच्या धोरण लकव्याने शेतकरी जेरीस आले आहेत. परिणामी शेतकरी केंद्र सरकारच्या आवाहनाकडे पाठ फिरवत असल्याचं चित्र आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.