
Amaravati News : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पीककर्ज वितरणात राष्ट्रीय व खासगी बॅंकांनी कमालीची अनास्था बाळगली आहे. आतापर्यंत एकूण लक्ष्यांकाच्या तुलनेत केवळ तेरा टक्के कर्ज वितरित झाले आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांची चिंता व्यक्त करणारे राजकीय नेतेही या समस्येवर चुप्पी साधून असल्याने व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही न जुमानणाऱ्या बॅंकांना सवाल विचारण्यास कुणीही नाही.
यंदाच्या रब्बी हंगामासाठी राष्ट्रीय, खासगी व ग्रामीण बॅंकांना ४२० कोटी रुपयांचे लक्ष्यांक जिल्हा समितीने निश्चित करून दिले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक रब्बीत कर्ज वितरित करीत नसल्याने त्यांच्या हिश्शाचे ८० कोटींचे लक्ष्यांक शिल्लक राहणार आहे.
एक ऑक्टोबरपासून रब्बीच्या पीककर्ज वितरणास प्रारंभ झाला आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत या बॅंकांनी ५३.८५ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. एकूण ४२० कोटी रुपयांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ १३ टक्के इतके आहे. ३९ हजार ७६० शेतकऱ्यांना पीककर्ज वितरित करायचे असताना केवळ ३८२४ शेतकऱ्यांना बॅंकांनी लाभ दिला आहे.
राष्ट्रीय बॅंकांना ३४ हजार ५५० शेतकऱ्यांना ३५९ कोटींचे लक्ष्यांक होते. त्या तुलनेत या बॅंकांनी ३५४३ शेतकऱ्यांना ४४.४७ कोटी कर्ज वितरित केले आहे. तर खासगी बॅंकांनी ५४ कोटी पैकी ९.१८ कोटींचे वितरण केले आहे. या बॅंकांचे ३७१० सभासद असून, २६३ सभासदांना लाभ देण्यात आला आहे. ग्रामीण बॅंकेने तीन टक्के कर्जवाटप केले आहे.
वितरण सुरू, मात्र माहिती देत नाहीत
बॅंकांकडून पीककर्ज वितरण सुरू असून, त्याची अपडेट माहिती ते सहकार विभागास देत नसल्याने नेमके किती वितरण झाले, हे स्पष्ट होत नाही. वारंवार माहिती मागितल्यानंतरही ती देण्यास अग्रणी बॅंकेकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे सहकार विभागातून सांगण्यात आले. त्यामुळे यामागे बॅंकांचा नेमका काय उद्देश आहे, ते स्पष्ट होऊ शकले नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.