Nagpur News : अंगणवाडी सेविका, कर्मचारी यांच्या मानधन वाढीवरून ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व माजी महिला बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. ‘आता भरघोस मदत वाढ करा म्हणून सांगता, मग तुम्ही मंत्री असताना काय केले, अशी विचारणा मंत्री महाजन यांनी केली.
यावरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. महिला सदस्यांचा सन्मान सभागृहात आहे की नाही, अशी विचारणा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. तसेच ठाकूर यांनी महिला सदस्यांबद्दल माघारी काय बोलता हे सभागृहात सांगण्यासारखे नाही, असा गंभीर आरोप केला.
विधानसभेत लक्षवेधी सुरू असतानाच आमदार प्रकाश आबिटकर यांनी ग्रामविकासमंत्री महाजन यांचे अंगणवाडी कर्मचारी आंदोलनाकडे लक्ष वेधले. याला उत्तर देताना मंत्री महाजन म्हणाले, ‘सेविका, मदतनीस यांच्या माध्यमातून २५ ते १०० टक्के वाढ केली आहे. याला माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी हरकत घेतली. वाढीची टक्केवारी चुकीचे असल्याचे सांगत भरघोस मानधन वाढ द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
ठाकूर यांच्या या मुद्द्यावरून मंत्री गिरीश महाजन भडकले. सेविका, मदतनीसाना मानधन वाढ दिली, त्याची आकडेवारी दिली आहे. मग तुमच्या काळात तुम्हीही ही मानधनवाढ का दिली नाही, अशी विचारणा करत मंत्री महाजन यांनी जोरदार टीका केली. त्याला विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी हरकत घेतली. सभागृहात महिला सदस्यांचा सन्मान ठेवणे आवश्यक असून, अशा पद्धतीची चर्चा योग्य नसल्याचे त्यांनी सभापतींच्या निदर्शनास आणून दिले.
अंगणवाडी हा विषय महिला बालकल्याण विभागाशी संबंधित आहे. तरीही या प्रश्नाचे मी उत्तर देत आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किती मानधनवाढ दिली, याची माहिती सभागृहाला दिली आहे. ही माहिती खोटी असेल तर माझ्यावर हक्कभंग आणावा, असे आव्हान मंत्री महाजन यांनी दिले.
मागे काय बोलता?
सभागृहात महाजन-ठाकूर यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. भाजपवाल्यांची महिलांना मानसन्मान देण्याची संस्कृती नाही. समोर एक व मागे ते एक बोलतात. महाजन जे मागे बोलतात ते सभागृहात सांगणे शक्य नाही, असे ठाकूर म्हणाल्या.
बेइमानी करून पक्ष फोडला
मंत्री महाजन-ठाकूर यांच्यातील वाद वाढत असल्याचे पाहून विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी या चर्चेत भाग घेतला. सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला मंत्र्यांनी चिडून उत्तर देण्याची गरज काय, अशी विचारणा त्यांनी केली.
यावर सत्ताधारी सदस्य मागील अडीच वर्षांतील कामाची विचारणा करू लागले. यावर वडेट्टीवार यांनी सदस्यांना मध्येच न बोलण्याची सूचना केली. सदस्य बोलत राहिल्याने वडेट्टीवार यांनी, तुमची सत्तेत यायची ताकद नव्हती म्हणून बेइमानीने पक्ष फोडला, अशी टीका केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.