Modern Agriculture
Modern Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Modern Agriculture : व्यवस्थापनातील सुधारणांद्वारे शेतीत जपली गुणवत्ता

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

मध्य प्रदेशातील नाचणखेडा (ता. जि. बऱ्हाणपूर) हे गाव केळी (Banana), पपई (Papaya) , कलिंगड, कापूस (Cotton) उत्पादनात आघाडीवर आहे. येथील जमीनही काळी कसदार आहे. हे गाव जरी मध्य प्रदेशात असले तरी या गावासह परिसरातील शेतकऱ्यांचा व्यापार व अन्य बाबींच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्याशी वर्षानुवर्षे संबंध आहे. नाचणखेडा हे रावेरपासून १७ किलोमीटर तर मुक्ताईनगरपासून सुमारे ३० किलोमीटरवर आहे. गाव तापी नदीकाठी असल्याने जलसाठे टिकून आहेत.

चौधरी यांची शेती

गावातील अनिल चौधरी यांची २५ एकर काळी कसदार शेती आहे. तीन कूपनलिका, दोन सालगडी व एक व्यवस्थापक आहे. अनिल यांचा मुलगा स्वप्नील बीएस्सी ॲग्री व एमबीए पदवीप्राप्त आहेत.

कृषी क्षेत्रातील कंपनीत नऊ वर्षे त्यांनी नोकरी केली. आज ते जिवाणू खतांशी संबंधित कंपनीत
कार्यरत आहेत. नोकरी सांभाळून वडिलांच्या बरोबरीने ते शेतीत प्रयोगशील असतात. चौधरी कुटुंबाचे केळी हे प्रमुख पीक (ग्रॅंड नैन वाण) असून, त्याचे सहा एकर क्षेत्र आहे. तेवढेच क्षेत्र हळदीचे आहे. रावेर व लगतच्या मध्य प्रदेशात केळी बागांत कुकुंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) या विषाणूजन्य रोगाची समस्या जाणवत आहे.

सहा ते सात हजार हेक्टरवरील केळी बागा शेतकऱ्यांना नाइलाजाने काढाव्या लागल्या. नाचणखेडा भागातही हीच समस्या होती. त्यावरील उपायांसह एकूणच पीक व्यवस्थापन सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील केळी तज्ज्ञ के. बी. पाटील यांचे मार्गदर्शन चौधरी यांनी घेतले.

व्यवस्थापनातील सुधारणा

‘सीएमव्ही’ रोगाचा वाहक मावा किडीसाठी फवारणीचे स्वतंत्र वेळापत्रक तयार केले. जमीन काळी कसदार असल्याने पाण्याचा निचरा होत नव्हता. त्या टाळण्यासाठी गादीवाफा पद्धतीचा वापर सुरू केला. पॉली मल्चिंगवर केळीची रोपे लावली. बागेत आंतरपीक घेणे टाळले. बाग व बांध तणमुक्त ठेवले.

जेणे करून यजमान तणांवरील किडीचा प्रादुर्भाव रोखला. जुलै महिन्यापेक्षा जूनमध्ये लागवड सुरू केली. लागवडीचे अंतर सहा बाय पाच फूट ठेवले आहे. एकरी सुमारे १४०० रोपे बसतात. ‘फ्रूट केअर’ तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. त्यामुळे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेता येत आहे. केळीची २५ ते ३० किलोची रास मिळत आहे.

विक्री व्यवस्था

केळीची खरेदी निर्यातदार कंपन्या थेट करतात. त्या माध्यमातून चार वर्षे परदेशात निर्यात होत आहे. निर्यात फेब्रुवारीअखेर सुरू होते. काढणी मार्चअखेर सुरू होते. या काळात परदेशासह उत्तर भारतातही मागणी असते. किलोला नऊ रुपयांपासून ते ११ रुपयांपर्यंत व कमाल साडे १२ रुपये प्रति किलो दर मिळाला आहे.

प्रति एकरी खर्च एक लाख रुपये येतो. केळीसाठी रावेरपापाठ बऱ्हाणपूर जिल्हादेखील बाजारपेठ म्हणून पुढे येत आहे. येथे दररोज शेतकऱ्यांसमोर लिलाव होतात. रोखीने पैसेही मिळतात. या बाजाराचा लाभ नाचणखेडा भागातील केळी उत्पादकांना होतो.

हळदीची शेती
हळदीची लागवड मे अखेरीस होते. घरचेच बेणे असते. लागवडीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्राचा उपयोग होतो. त्यासाठी टिलरचा उपयोग करून यंत्र विकसित केले आहे. त्यामुळे उगवण चांगली होते. बेण्याला मातीची चांगली भर घालता येते. उत्पादन मार्चमध्ये सुरू होते. वाळविलेल्या हळदीचे एकरी ३० ते ३५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. मागील तीन वर्षे सरासरी साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. सांगली किंवा स्थानिक भागात विक्री होते.

व्यवस्थापनातील ठळक बाबी

-पीक फेरपालट ही महत्त्वाची मानली आहे. केळीनंतर तेच पीक पुन्हा घेतले जात नाही.
फेरपालटासासाठी केळीची काढणी केलेल्या शेतात कापूस, त्यानंतर रब्बीत कांदा बीजोत्पादन, हरभरा, कलिंगड, खरबूज अशी पिके घेण्यात येतात.

-पीक अवशेषांचा उदा. कापूस तसेच कांदा बीजोत्पादनातील अवशेषांचा पुनर्वापर होतो. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकवण्याचा प्रयत्न केला आहे.
-केळी व्यतिरिक्त कापूस उत्पादनातही चौधरी यांचा हातखंडा आहे. मागील तीन वर्षे अतिपावसामुळे जूनच्या सुरुवातीला लागवड केलेल्या कापसाची हानी झाली. त्यामुळे लागवड १५ जूननंतर करण्याचे नियोजन केले आहे. गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र मोडण्यासाठी नोव्हेंबरमध्ये काढणी करून फरदड घेणे टाळले जाते.

-कांदा बीजोत्पादन एकरी तीन ते चार क्विंटलपर्यंत घेतले जाते. त्यासंबंधी करार शेती असल्याने बियाणे खरेदीदारांकडून हमीदर मिळतो.
-कलिंगडाची लागवड जानेवारीत होते. त्याचे एकरी २० ते २२ टन उत्पादन, जागेवर सात ते १२ रुपये प्रति किलो दर, खरबुजाचे एकरी नऊ टन उत्पादन तर जागेवर १८ ते २३ रुपये प्रति किलोचा दर मिळतो.

-बैलजोडी, ट्रॅक्टर आदी यंत्रणा स्वतः न सांभाळता गरजेनुसार एका कंपनीकडून ती भाडेतत्त्वावर घेण्यात येते. ड्रोनद्वारेही पीक फवारणीचा प्रयोग करून पाहिला आहे.
-कौशल्य, ज्ञान, अनुभव, बाजारपेठेचा अभ्यास याचा फायदा होत आहे. स्वप्नील कृषी पदवीधर असल्याचा फायदा होतोच. शिवाय मित्र विशाल महाजन (नायगाव, जि. जळगाव), ऋषिकेश महाजन यांचेही मार्गदर्शन मिळते.

-स्वप्नील चौधरी, ९८९०६८१११४, ६२६६१७९८८८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

SCROLL FOR NEXT