Healthy Millets Agrowon
ॲग्रो विशेष

Healthy Millets : नवधान्यांची समृद्धी

Health Benefits of Millets : भरडधान्यांचे आजच्या काळात महत्त्व वाढले आहे. भरडधान्यांचे एकूण नऊ प्रकार आहेत. कोरडवाहू भागासाठी ही पिके वरदान आहेत. त्यांचे पोषणमूल्य उच्च असल्याने आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे एक खास महत्त्व आहे.

Team Agrowon

नीलिमा जोरवर

Millets Update : अन्न म्हणजे देव, खरेतर देवी; म्हणून अन्नपूर्णा, कणसारी, डालखाई, कंदोनी, कांशाई, लेकुरवाळी,अंबाबाई, कळसुआई अशा कितीतरी देवींची अन्न, शक्ती, मातृत्व, रक्षणकर्ती या रूपात उपासना केली जाते. याच देवींच्या विविध रूपांत उपासना होते ती नवधान्यांची. नवधान्य म्हणजे काय तर तांदूळ, भरडधान्य, जव व नंतर आलेले गहू.

भरडधान्यांचे आजच्या काळात महत्त्व वाढले आहे. भरडधान्यांचे एकूण नऊ प्रकार आहेत. त्यांची आपण थोडक्यात माहिती घेऊया.

बाजरी

बाजरी ही मूळची आफ्रिकेतून आलेली. तिच्या काटकपणामुळे ती भारतातील महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडू इत्यादी राज्यांतील कोरडवाहू भागासाठी वरदान ठरली. कमी पर्जन्यमान व उष्ण हवामान बाजरीला चांगलेच मानवते. काळी कसदार जमीन असेल तर बाजरीची गोडी व चव न्यारीच ठरते. बाजरीच्या प्रजाती अनेक रंगांत व आकारात आहेत. लाल, हिरवी, काळपट अशा रंगात बाजरी असते. आपल्याकडे हिरव्या रंगाच्या छटांमध्ये असलेली बाजरी आढळते. आपल्याकडच्या बाजरीच्या गावरान जाती मोठ्या प्रमाणात संपलेल्या आहेत; तरीही काही आदिवासी लोक जुन्या जाती टिकवून आहेत.

बाजरीचे नियमित सेवन केल्याने कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहते तसेच यामध्ये लोह व मॅग्नेशिअम प्रामुख्याने आढळतात. ओडीशा राज्यात नवरात्रीच्या उपवासाला बाजरी खाल्ली जाते, हे वाचून आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल. बाजरीची भाकरी, घुगऱ्या, भजे व लाडू हे आपले पारंपरिक पदार्थ आहेत.

नाचणी/नागली

हे देखील मूळचे आफ्रिकेतून आलेले पीक असले तरी गेली हजारो वर्षे येथे स्थिरावले आहे. आपल्या जंगलांत आजही नाचणीच्या जंगली प्रजाती आढळतात. या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे ते हलक्या-मुरमाट जमिनीत व कमी पाण्यात येते. नाचणी हे एक सुपरफूड मानले गेले असून रक्तक्षय कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामध्ये लोह व कॅल्शिअम यांचे उच्च प्रमाण असते.

अगदी लहान बालकांपासून ते वाढीच्या वयातील व जीमला जाणारे मुले-मुली, गर्भदा व स्तनदा माता व प्रौढ अशा सर्वांसाठी नाचणी आहारात असणे महत्त्वाचे आहे. नाचणीची शेती महाराष्ट्रात मात्र काही डोंगरभागातच केली जात आहे. जव्हार-त्र्यंबक भागात नाचणीला कणसारी देवीचे रुप मानले जाते व शेतात नियमित लागवड केली जाते. नाचणीची भाकरी, पेज, लाडू, पोहे, केक, इडली, डोसा असे विविध प्रकार केले जातात.

ज्वारी

भारतीय शेतकऱ्यांनी ज्वारीच्या हजारो जाती वाढवल्या व जोपासल्या आहेत. त्यामध्ये देखील लाल, तांबडा, पिवळा, पांढरा व त्याच्या रंगछटामध्ये असणारे विविध प्रकार आहेत. ज्वारी मधुमेहींसाठी चांगली मानली जाते. तसेच पशुचारा म्हणून देखील ज्वारीचे महत्त्व आहे. ज्वारीची भाकरी, उपमा, शिरा, आंबिल, बिस्किट्स, पोहे असे विविध प्रकार बनवले जातात. वरील तीन भरडधान्ये हे बरेचदा आहे तसे पीठ करून खाता येतात. आकाराने देखील काहीसे मोठे असलेले हे प्रकार आहेत, त्यामुळे याला मोठे भरडधान्य असे म्हणतात. तर भरडधान्यांचे काही प्रकार हे आकाराने बारीक व भातासारखी साळ असणारे असतात आणि खाण्यासाठी त्यावर प्रक्रिया केली जाते. म्हणून त्यांना बारीक धान्य असेही म्हणतात. ही धान्ये पुढीलप्रमाणेः

वरई

हे धान्य आजही मोठ्या प्रमाणात सह्याद्रीतील डोंगरउतारावर घेतले जाते. पूर्वी हे सर्व कोरडवाहू भागांत व्हायचे. बदामी, पिवळसर रंगाची असणारी याची भगर मोठ्या प्रमाणात उपवासाला खाल्ली जाते. यामध्ये असलेले औषधी गुण पाहता हे रोजच्या आहारात घेण्यासाठी देखील उत्तम मानले जाते. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब व इतर आजारांसाठी हे खाणे उत्तम आहे.रोजच्या नाश्त्यासाठी वरईची खीर, शिरा, उपमा, डोसा व इडली हे पदार्थ उत्तम बनतात.

पिवळी भगर / वरी

हे काटक पीक असून याच्या पिवळसर रंगामुळे वेगळे उठून दिसते. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे तो एक उत्तम आहार आहे. मधुमेह व त्यासारख्या इतर आजारांसाठी हे वरदान मानले जाते. शिवाय भातासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

हिरवी भगर / कोरल्लू

हे एक अफाट विस्मयकारक असे भरडधान्य आहे. अगदीच गवताच्या तुऱ्यासारखे याचे कणीस असते. हे पीक दोन महिन्यांचेच आहे. गेली काही वर्षे हे पीक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देत आहे. प्रति किलो १८० ते ४५० रुपयांपर्यंत याचे भाव जातात. हिरवी भगर खूपच परिपूर्ण आहार आहे. याने लवकर भूक लागत नाही व तुम्ही खूप काळ ऊर्जादायी राहता. वाढलेले वजन, वारंवार भूक लागणे, मधुमेह यांचा त्रास असेल तर हिरव्या भगरीचे नियमित सेवन फायद्याचे ठरते. याची खिचडी, पुलाव व बिर्याणी छान बनतात.

बर्टी/बंटी

महाराष्ट्रातील धुळे, गडचिरोली भागात याचे पीक पिढ्यानपिढ्या मोठ्या प्रमाणात घेतले जाते. वरकड जमिनीत येणारे हे अगदी दोन ते अडीच महिने कालावधीचे पीक आहे. चांगली माती मिळाली तर पीक उत्तम येते, हे आम्ही प्रयोग करून बघितले आहे. बर्टीची पांढरी भगर उपवासाला खाल्ली जातेच परंतु याच्या पित्तशामक गुणामुळे ते आहारात असणे फायद्याचेच आहे. याची खिचडी, साधा भात, पुलाव व इडली-डोसा उत्तम बनतो.

हरिक / कोदरा

हे अजून एक विस्मयकारक असे धान्यपीक असून अति व कमी पाऊस असलेल्या ठिकाणीही ते उत्तम येते. धुळे-गडचिरोली, कोकण येथे हे पीक घेतले जात असे. हे पीक साडे तीन महिन्यांचे असून याची कणसे अति बारीक असतात. दाणे भरत जातात तसतसे यावर अनेक थर जमा होत जातात. त्यामुळे हे धान्य अनेक वर्षे टिकू शकते. उदाहरणार्थ मध्ये प्रदेशातील बैगा आदिवासी कोदो ८० वर्षे पेक्षा जास्त काळ साठवतात म्हणून येथे म्हण प्रसिद्ध आहे- ‘कोदो दाना न होय पुराना.’

अतिशय चवदार असलेल्या या धान्यात लोहाचे प्रमाण भरपूर असते. मधुमेह, वजन कमी करणे व इतर आजारांवर कोदो उपयोगी आहे. याची खीर, खिचडी, मसाले भात उत्तम व चवदार बनतात.

राळा / कांग / भादली

हे अगदी कमी पाण्यात येणारे एक उत्तम पीक आहे. पूर्वी बाजरी किंवा ज्वारीच्या शेतात हे मिश्रपीक म्हणून घेतले जाई. आमच्या भंडारदरा परिसरात भादली भरपूर घेतली जात असे. मराठवाडा, कोकण, धुळे-नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागांत व कोरडवाहू शेतीत याची लागवड केली जात असे. गावोगावी अनेक परंपरांमध्ये राळा धान्य महत्त्वाचे मानले जायचे. उदाहरणार्थ जळगाव भागात पितराला राळ्याचा भात-कढी, जुन्नर भागात लग्नातील सांजोरी राळ्याची तर दोडामार्ग-सावंतवाडी भागात शिमग्याला राळ्याच्या खांडोळ्या केल्या जातात. राज्याच्या विविध भागांत अशा किती तरी प्रथा पाहायला मिळतात.

राळा पिकात लाल, पिवळा, काळा, करडा, पांढरा, तपकिरी असे रंग आढळतात. उच्च प्रथिने व कमी कर्बोदके असणारे हे धान्य मधुमेही रुग्णांनी सेवन केल्यास साखर नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते. वजन कमी करणे व ‘लाइट’ अर्थातच मिताहार करण्यासाठी हा उत्तम, चवदार व पौष्टिक पर्याय आहे. राळ्याचे गोड वा कमी तिखट असणारे पदार्थ उत्तम बनतात. खीर, लापशी, गोड पुऱ्या, काप आणि दालखिचडीसाठी राळा उत्तम आहे. दूध व दह्यासोबत खाण्यासाठी देखील राळा छान आहे.

या नवधान्यांची समृद्धी आपल्या सर्वांच्या जीवनात आरोग्य घेऊन येवो, हीच दिवाळीच्या निमित्ताने सदिच्छा !

(लेखिका निसर्ग अभ्यासक आणि कार्यकर्त्या आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

NCP Ajit Pawar Group : बीडमध्ये अजित पवार गटाची चिंता वाढली?; पाटोदा बाजार समिती घोटाळा प्रकरणात बांगर यांना अटक

Ujani Dam : 'उजनी'चे सर्वेक्षण होऊनही गाळ तसाच

Crop Damage Survey : पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

Livestock Census : नाशिकमध्ये मोबाईल अॅपद्वारे पशुधन गणना सुरू

NCP ajit pawar Candidate : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीही तिसरी यादी आली समोर! तिसऱ्या यादीत फक्त चौघांचा समावेश

SCROLL FOR NEXT