Groundnut Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Groundnut Cultivation : उन्हाळी भुईमुग लागवडीची योग्य पद्धत

Team Agrowon

Groundnut crop : महाराष्ट्रात तेलबिया पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होते. त्यापैकी भुईमूग हे अत्यंत महत्त्वाच तेलबिया पीक म्हणून ओळखल जात. खरीप हंगामापेक्षा उन्हाळी भुईमुगाची उत्पादकता जास्त असते. जमिनीत पुरेसा ओलावा, भरपूर सूर्यप्रकाश, कोरडे हवामान या बाबी पिकाच्या वाढीस पोषक ठरतात. या उन्हाळी भुईमुगाची लागवड करताना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? याविषयीची माहिती आपण या व्हिडीओतून घेणार आहोत.  

भुईमुगासाठी मध्यम,पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू आणि सेंद्रिय पदार्थ असेलेली जमीन भुईमुगासाठी योग्य समजली जाते. कारण या प्रकारची जमीन नेहमी भुसभुशीत राहत असल्यामुळे हवा कायम खेळती राहते. त्यामुळे मुळांची वाढ चांगली होऊन भुईमुगाच्या आऱ्या सहजपणे जमिनीत जाण्यासाठी आणि शेंगा पोसण्यासाठी मदत होते.  

पूर्वमशागत करताना जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या २-३ पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणी अगोदर हेक्टरी १० टन शेणखत जमिनीत मिसळावे. 

पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणांस थायरम ५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम चोळाव. बुरशीनाशकांच्या बीजप्रक्रियेनंतर रायझोबियम २५ ग्रॅम आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवून मगच पेरणीसाठी वापराव. 

भुईमुगाची पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. पेरणीला जर उशीर झाला तर उत्पादनात घट येते.  पेरणीच्या ८ ते १० दिवस अगोदर शेंगा फोडून पेरणीसाठी बियाणे तयार करावे. पेरणीसाठी चांगल्या प्रतीचे बियाणे निवडावे. फुटके, कीडके, साल निघालेले, आकाराने लहान बी काढून टाकावे.

लागवडीसाठी टी.जी. २६, एस.बी.- ११, जे.एल.–५०१, टी.ए.जी. २४ या जातीचे हेक्टरी १०० किलो बियाणे लागते. तर भुईमुगाच्या फुले उन्नती, फुले उनप म्हणजेच जे.एल.- २८६, फुले भारती (जे.एल.- ७७६)- या जातीचे हेक्टरी १२०-१२५ किलो बियाणे लागते. 

भुईमूगाची लागवड ही पेरणी आणि टोकण पद्धतीने करता येते. दोन ओळींतील अंतर ३० सेंमी आणि दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवून पेरणी करावी. उगवण झाल्यानंतर लगेच नांग्या भराव्यात. 

भुईमूगाची जर इक्रिसॅट पद्धतीने लागवड करायची असेल तर ट्रॅक्टर बेड यंत्राच्या साह्याने ९० सेंमी रुंदीचे वाफे तयार करून घ्यावेत. किंवा पूर्वमशागतीनंतर १.२ मीटर अंतरावर छोट्या नांगराच्या साह्याने ३० सेंमी रुंदीच्या सऱ्या पाडाव्यात. त्यामुळे ९० सेंमी रुंदीचे रुंद गादीवाफे तयार होतात.वाफ्याची रुंदी १५ ते २० सेंमी ठेवावी. रुंद वाफ्यावर दोन ओळींतील अंतर ३० सेंमी आणि दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवून टोकण पद्धतीने भुईमूग लागवड करावी.  

शेवटच्या कुळवणीच्या अगोदर हेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. पेरणीच्या वेळी नत्र २५ किलो आणि स्फुरद ५० किलो द्यावे. ही खतमात्रा युरिया किंवा सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून द्यायची झाल्यास, युरिया ५४ किलो अधिक सिंगल सुपर फॉस्फेट ३१२.५ किलो द्यावी. 

सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून स्फुरद दिल्यामुळे भुईमुगाला आवश्यक असलेले कॅल्शिअम आणि गंधक ही अन्नद्रव्ये मिळतात. जास्त उत्पादनासाठी रासायनिक खतमात्रे सोबतच ४०० किलो जिप्समचा वापर करावा. पेरणीवेळी २०० किलो जिप्सम आणि उर्वरीत मात्रा आऱ्या सुटताना द्यावी.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT