Gayatri Women Home Industry  Agrowon
ॲग्रो विशेष

Processing Industry : बचत गटाच्या साथीने प्रक्रिया उद्योगाला चालना

माणिक रासवे

Processing Industry Business : परभणी जिल्ह्यातील पूर्णा हे मनमाड ते सिकंदराबाद मार्गावरील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. पूर्णा येथील मीरा संजय यशके यांचे माहेर चिखली (जि. बुलडाणा) आहे. यशके कुटुंबीयांना उद्यमशीलतेचा वारसा आहे. मीराताईंचे सासरे बाबूप्पा यशके यांचा अगरबत्ती निर्मिती उद्योग होता. याद्वारे अनेक व्यक्तींना रोजगार मिळाला होता.

कालांतराने अगरबत्ती उद्योग बंद झाला. मीराताईंचे पती संजय यशके यांचे पूर्णा शहरात किराणा दुकान आहे. मीरा यांच्या आई नंदाबाई या चिखली येथे उत्तम प्रकारचे डिंक लाडू तयार करत असत. त्यांच्या सासू चंद्रकलाबाई आणि नणंद शोभा कानझाडे या विविध प्रकारची उत्तम लोणची बनवितात. त्यामुळे मीरा यांना माहेर तसेच सासरकडून प्रक्रिया उद्योगाचा वारसा मिळाला आहे.

गृह उद्योगाचा श्रीगणेशा :

मीराताईंनी दहा वर्षांपूर्वी प्रायोगिक स्वरूपात एक किलो डिंक लाडू तयार करून ते घरच्या किराणा दुकानामध्ये विक्रीस ठेवले. ग्राहकांना या लाडूंची चव आवडल्यामुळे हळूहळू मागणी वाढली. त्यामुळे डिंक लाडूंचे उत्पादन वाढवले. शहरातील इतर किराणा दुकानांमध्ये त्यांनी लाडू विक्रीसाठी देण्यास सुरुवात केली.

परंतु तयार लाडू कोण विकत घेणार नाही या भीतीने दुकानदार लाडू ठेवण्यास राजी होत नसत. सुरुवातीची काही वर्षे घरच्या किराणा दुकानातून केवळ हिवाळ्यात ६० ते ७० किलो डिंक लाडूंची विक्री होऊ लागली. चांगला सुकामेवा तसेच अन्य घटक यांचा वापर करून डिंक लाडू दर्जा कायम ठेवला. गुणवत्तेमुळे चवीमुळे लाडू्ंना मागणी वाढली.

बचत गटाची साथ :

डिंक लाडूंची मागणी वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी महिलांची मदत आवश्यक होती. मीराताईंनी पुढाकार घेऊन पूर्णा येथे गायत्री महिला बचत गट स्थापन केला आहे. गटामध्ये ११ सदस्य आहेत. सध्या गटाच्या अध्यक्षा मीरा यशके, सचिव संध्या यशके आहेत. सदस्यांमध्ये वर्षाराणी यशके, प्रियंका पाथरकर, सीमा सोळंके, मनीषा गौरशेटे, रोहिणी यशके, शिवानी यशके, वैष्णवी कदम, रूपाली यशके यांचा समावेश आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत बचत गटाचे खाते आहे. दर महिन्याला प्रति सदस्य एक हजार रुपयांनुसार अकरा हजार रुपये रक्कम जमा केली जाते. बचत गटातील सदस्या पापड, कुरवड्या, लोणचे, ढोकळा मिक्स तयार करतात. दोन वर्षांपूर्वी या गटाने गायत्री महिला गृह उद्योग या नावाने जिल्हा उद्योग केंद्र आणि एफएसएसआयकडे नोंदणी केली. उत्पादनांच्या विक्रीसाठी ‘गायत्री ब्रँड’ तयार केला. यामुळे बाजारपेठेत वेगळी ओळख तयार झाली. मीराताईंनी बचत गटाच्या सदस्यांसोबत जिल्हा उद्योग केंद्रातर्फे आयोजित फळप्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण घेतले आहे.

लाडूंचे विविध प्रकार :

गटातील सदस्या ग्राहकांच्या मागणीनुसार डिंक लाडूसोबत मेथी लाडू, हडसन लाडू, उडीद लाडू, बेसन लाडू, खोबरे लाडू, बाळंत लाडू, हिरव्या मुगाचे लाडू तयार करून विक्री करतात. डिंक लाडूमध्ये खारीक खोबरे, साखर, बदाम, काजू, गोडंबी, जायफळ, शुद्ध तूप आदी घटकांचा विशिष्ट प्रमाणात वापर करतात.

बाळंत लाडूमध्ये खारीक, अश्‍वगंधा, शतावरी आदींसह विविध आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर केला जातो. विविध घटक खलबत्त्यात कुटून मिश्रण तयार केले जाते. त्यानंतर लाडू हाताने तयार केले जातात. लाडूसाठी आवश्यक सुकामेवा, साखर, तूप आदी वस्तूंची खरेदी परभणी, नांदेड आदी ठिकाणांहून केली जाते. प्रक्रिया उद्योगामध्ये ग्राइंडर, पॅकिंग आदी यंत्रसामग्री आहे.

शहरी बाजारपेठेतून चांगली मागणी

मीराताईंच्या प्रक्रिया उद्योगाने मागील दशकभरापासून डिंक लाडूचा दर्जा कायम ठेवला आहे. याचबरोबरीने विविध चवीचे लाडू तसेच गावरान पद्धतीने बनविलेल्या लोणच्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

चोखंदळ ग्राहकांकडून प्रक्रिया उत्पादनांचा प्रचार केला जात असल्याने मागणी वाढली आहे. पूर्णा तसेच परभणी, नांदेड, वसमत, सेलू तसेच पुणे आदी शहरांमध्ये प्रक्रिया पदार्थ विक्रीसाठी पाठविले जातात. या शहरांतील सुपर शॉपी, मॉलमध्ये प्रक्रिया पदार्थांची विक्री होते.

उलाढालीचा वाढता आलेख...

मीरताईंकडे प्रक्रिया उत्पादनांच्या निर्मितीची जबाबदारी आहे. संजय यशके यांनी कच्चा माल खरेदी तसेच उत्पादनांच्या विक्रीची जबाबदारी सांभाळली आहे. वर्षभरात १० ते १५ क्विंटल डिंक लाडू तसेच अन्य लाडूंची विक्री होते. गावरान लोणच्याला देखील मागणी वाढू लागली आहे. प्रक्रिया उद्योगातून दरवर्षी सहा लाखांची उलाढाल होते. मागणीनुसार वर्षभर विविध प्रक्रिया उत्पादने तयार करून विक्री केली जाते.

बचत गटांच्या सदस्यांना उत्पादने निर्मितीतील भागीदारीनुसार मोबदला दिला जातो. ग्राहकांच्या मागणीनुसार २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम आणि १ किलो वजनामध्ये लोणचे प्लॅस्टिक बरणीमध्ये पॅकिंग केले जाते. बाजारपेठेत डिंक लाडू ८०० रुपये, बाळंत लाडू ९०० रुपये, मेथी लाडू ८०० रुपये, हडसन लाडू ९०० रुपये प्रति किलो या दराने विक्री केली जाते. गावरान आंबा, लिंबू, मिरची लोणचे प्रति किलो ३२५ ते ३५० रुपये या दराने विक्री केली जाते.

गावरान आंबा लोणचे :
गेल्या वर्षीपासून महिला गटाने आंबा लोणचे बनवून विक्रीस सुरुवात केली. यंदाच्या उन्हाळ्यात १० क्विंटल लोणचे विक्री झाले. स्थानिक मार्केट किंवा शेतकऱ्यांकडून कैऱ्यांची खरेदी केली जाते. मोहरी, मेथी, सुंठ, मिरे, लवंग, हळद, लाल मिरची पावडर, हिंग, शेंगदाणा तेल आदी घटकांचा वापर करून आंबा लोणचे तयार केले जाते.

‘आजीच्या हाताची चव’ ही टॅगलाइन असलेले आंबा लोणचे आकर्षक पॅकिंगमध्ये विकले जाते. या लोणच्याला ग्राहकांची चांगली पसंती मिळाली आहे. आंबा लोणच्यास मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन यंदापासून लिंबू तसेच मिरची लोणचे तयार करून विक्री केली जात आहे. मीराताईंचा लोणचे बनविण्यातील हातखंडा लक्षात घेऊन पूर्णा शहरातील अनेक महिला त्यांच्याकडून लोणचे तयार करून घेतात.

संपर्क : मीरा यशके : ९३०७०३८००९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT