Santosh Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Success Story : शून्यातून गाठला प्रगतीचा सोपान

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Agriculture Progress : भोकरी हे गाव भोकर नदीकाठी आहे. येथील संतोष पाटील यांनी मोठा संघर्ष करत आज प्रगतीकडे वाटचाल केली आहे. २००५ मध्ये वडिलांच्या निधनानंतर संतोष यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. वडिलोपार्जित अजिबात शेती नसल्यामुळे सुरुवातीला गावातच एका खासगी केळी खरेदी-विक्री संस्थेत नोकरी केली.

काही दिवसा आइस्क्रीम पार्लर, तर रात्री स्क्रीन प्रिंटिंग असे विविध व्यवसाय केले. दुधापासून विविध प्रक्रिया पदार्थांची निर्मिती व विक्रीचा हंगामी व्यवसाय आजही ते करतात. नोकरी आणि व्यवसायातून हळूहळू साठवलेल्या कमाईतून तीन टप्प्यांत सात एकर शेती विकत घेतली. ही शेती बरड असल्याने त्यात गाळ, माती टाकत ती पेरणीयोग्य केली.

आज स्वःमालकीच्या सात एकरबरोबरच लिजवरील १३ एकर शेतीचे व्यवस्थापन करतात. मदतीला दोन सालगडी आहेत. वाघोड (ता. रावेर) शिवारात एक गुंठा जमीन खरेदी करून विहीर खोदली आहे. तिथून सुमारे पाच हजार फूट एवढी जलवाहिनी टाकून सिंचनाची सोय केली आहे.

...असे आहे पीक व्यवस्थापन

संतोष हे परिसरातील केव्हीके, संशोधन संस्थांतील तज्ज्ञ, अनुभवी व प्रगतिशील शेतकरी आणि निविष्ठा कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्याशी सतत चर्चा करून माहिती घेण्यावर त्यांचा भर असतो. त्यातून शेतीतील नवनवीन संकल्पना राबवत खर्चात बचतीसोबतच उत्पादन वाढीसाठी त्यांचा सतत प्रयत्न असतो.

केळी प्रमुख पीक आहे. दरवर्षी सात एकरात १० हजार केळी रोपे लावली जातात. उन्हाळ्यात आगाप केळी लागवड करायची असल्यास कंदांचाच वापर करतात, पावसाळ्यात (जुलैमध्ये) लागवडीसाठी उतिसंवर्धित केळी रोपांचा वापर करतात.

कारण अति उष्णतेमध्ये कंदांची मरतूक होत नसल्याचे त्यांचे निरीक्षण आहे. मृग बहरातही लागवड असते. केळीची लागवड पाच बाय साडेपाच फूट अंतरावर उंच गादीवाफ्यावर केली जाते.

जैविक, सेंद्रिय आणि रासायनिक घटकांचा संतुलित वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकता, उत्पादन वाढ आणि खर्चात बचत या बाबी साधतात. केळीला तीन वेळेस बेसल डोस दिला जातो. यानंतर खते ड्रीपमधून दिली जातात.

खरिपात मका, कापूस, तूर ही, तर रब्बीत हरभरा, मका ही पिके घेतली जातात. साधारणतः मका तीन एकर, तूर चार एकर व कापसाची पाच ते सहा एकरात लागवड असते. फेरपालटासाठी कडधान्यवर्गीय पिकांची निवड केली जाते.

कापसाला दोन वेळेस बेसल डोस देतात. योग्य नियोजनामुळे खते व किडनाशकांवरील खर्चात १५ ते २० टक्के बचत शक्य झाली आहे. पाल (ता. रावेर) येथील केव्हिकेचे महेश महाजन, कृषी साहाय्यक संदीप बारेला इ. चे मार्गदर्शन व सहकार्यातून निर्यातक्षम केळी उत्पादन घेतले जाते.

सुधारणेसह बचत व गुणवत्तेचा ध्यास

वार्षिक खर्च आणि उत्पन्नाचा हिशोब ठेवला जातो. प्रत्येक पिकातील नफ्या - तोट्याची नोंद ठेवली जाते. त्यातून संबंधित पिकाच्या पुढील हंगामातील लागवड, व्यवस्थापन आणि खर्चाचे अंदाजपत्रक मांडले जाते. त्यानुसार नियोजन करणे सोपे जाते.

येणाऱ्या नफ्यातून शेती सुधारणा, जलस्रोतांसह यंत्रणांची देखभाल व दुरुस्ती केली जाते. दरवर्षी थोडे थोडे करत संपूर्ण शेत ठिबक व तुषार सिंचनाखाली आणले आहे. केळी, कापूस पिकामध्ये दर अस्थिर असून, कीड-रोगाच्या प्रादुर्भावामुळेही समस्या निर्माण होतात. यामुळे वाढत असलेल्या जोखीम कमी करण्यासाठी उत्पादन खर्चात योग्य पद्धतीद्वारे बचत करण्यावर त्यांचा भर असतो.

गुणवत्तापूर्ण रोपे किंवा बियाण्यांना प्राधान्य. उदा. केळीच्या उतिसंवर्धित रोपांत ग्रॅण्डनैन वाण, कापसासाठी बीटी२, आणि मका, तूर व हरभरा पिकातही बाजारात मागणी असलेल्या वाणांची निवड केली जाते. ही पिके कमी पाण्यात, खतामध्ये चांगले उत्पादन देऊन जातात.

शक्य तिथे जैविक खते, कीडनाशकांचा वापर केला जातो. कीड नियंत्रणासाठी कामगंध सापळे, पक्षिथांबे यांचा वापर केला जातो. कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र रोखण्यासाठी फरदड न घेता त्वरित अन्य रब्बी पीक घेतात. अशा छोट्या छोट्या उपायांतून कीडनियंत्रणावरील खर्चातही बचत होते.

दूध प्रक्रियेतून उत्पन्नाचे साधन :

विशेषतः उन्हाळ्यामध्ये लस्सी, मठ्ठा, आइस्क्रीम, कुल्फी यांनी भरपूर मागणी असते. या हंगामात प्रक्रियेसाठी वाघोज, कर्जोद, केऱ्हाळे आदी भागातून रोज सुमारे दीडशे लिटर दूध विकत घेतात. त्यापासून घरामध्ये दही, लस्सी, कुल्फी, आइस्क्रीम, मठ्ठा इ. पदार्थ तयार केले जातात. त्यांच्या विक्रीसाठी केऱ्हाळे गावात ‘कृष्णा फूड्स’ नावाने दुकान सुरू केले आहे. सर्व खर्च वजा जाता या व्यवसायातून हंगामामध्ये २.५ ते ३ लाख रुपये इतका नफा हाती येतो.

शेतीचा थोडक्यात ताळेबंद...

पीक क्षेत्र (एकर) सरासरी खर्च (रुपये/एकर) सरासरी उत्पादन (क्विंटल/एकर) तीन वर्षांतील सरासरी दर

(रुपये प्रति क्विंटल) सरासरी नफा

(प्रति एकर)

२०२१ २०२२ २०२३

कापूस ६ २५ हजार ७ ७५०० ७००० ६४०० २० ते २८ हजार.

हरभरा ७ ते ८ १५ हजार १२ ४५०० ४६०० ४८०० ३९ ते ४२ हजार

केळी ७ दोन लाख ३५० ८०० २६०० ११०० १.८ लाख ते ७ लाख.

तूर ४ ते ५ १५ हजार ९ ५००० ६५०० ८५०० ६० ते ६५ हजार रुपये.

मका (रब्बी) तीन २० हजार ५५ १००० १४०० १८०० ४५ ते ८० हजार.

मका (खरीप) तीन २० हजार ३० ८०० १२०० १७५० १४ ते ४२ हजार.

वर्षाला सुमारे १४ ते १५ लाखांचे निव्वळ उत्पन्न येते. मात्र त्यात मिळणाऱ्या दरानुसार फारच चढ-उतार होते. त्यामुळे खरा नफा त्या वर्षी मिळणाऱ्या बाजारभावावर ठरतो. अलीकडे मका, केळी व कापूस पिकांतील नफा घटत चालल्याचे निरीक्षण आहे.

सर्वच शेतीमालाची थेट विक्री

केळी, मका व कापसाची थेट किंवा जागेवर विक्री केली जाते. सौदा करण्यापूर्वी बाजारातील मागणी आणि किमतीचा अंदाज घेतला जातो. त्यातून नुकसान टाळले जातो. उत्तम व्यवस्थापनातून केळीची गुणवत्ता राखली जात असल्यामुळे निर्यातदार कंपन्या खरेदीसाठी पुढाकार घेतात.

साधारणपणे कुटुंबाचे खर्च :

कुटुंबाचा उदरनिर्वाह व अन्य खर्च : ४ लाख रुपये.

मुलांचे शिक्षण (मुलगा अंकित एमसीए करत आहे, दुसरा मुलगा संचित इयत्ता नववीत आहे.) ः ३ लाख रुपये.

शेतीतील पुढील हंगामासाठी गुंतवणूक : ६ ते ८ लाख रुपये.

कुटुंबाचा वैद्यकीय विमा : १८ हजार रुपये.

संतोष पाटील, ८३२९९३४२४९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

Indian Agriculture : शिळ्या कढीला ऊत

Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुका तीन टप्प्यांत

Budget Update : अर्थसंकल्पातून प्रत्येक समाज घटकाला न्याय : अजित पवार

Watershed Mismanagement Case : पाणलोट गैरव्यवहारप्रकरणी फौजदारी कारवाई करा

SCROLL FOR NEXT