Agriculture
AgricultureAgrowon

Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

An Economically Prosperous Village : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाधवडे (ता. वैभववाडी) येथे पाण्याचा नैसर्गिक उमाळा तयार झाला आहे. गावकऱ्यांनी तो उत्तम प्रकारे संवर्धित केला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमचा मिटला. आणि पर्यटन व्यवसायालसाही चालना मिळून गावे आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाली.

एकनाथ पवार

Agriculture and Tourism : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यावरण, जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ५७ हून अधिक पाणथळ ठिकाणे आहेत. त्याठिकाणी नैसर्गिक जलस्रोत आहेत. त्या नजीकची शेतशिवारे या स्रोतांमुळे समृद्ध झाली आहेत. तळेरे - कोल्हापूर महामार्गावर वैभववाडी तालुक्यात नाधवडे हे तीन हजार लोकसंख्येचे गाव आहे.

येथील सरदारवाडी थांब्यापासून १०० मीटरवर नैसर्गिक उमाळा पाहण्यास मिळतो. माळरानावर पाच- सहा एचपी क्षमतेच्या मोटरपंपाद्वारे जेवढे पाणी बाहेर फेकले जाऊ शकते त्या आसपास पाणी या उमाळ्यातून बाहेर येते. पूर्वी ते एकाच ठिकाणाहून यायचे. आता ते दोन- तीन ठिकाणांहून येते. चाळीस- पन्नास वर्षांपूर्वी भूकंप किंवा भूगर्भातील हालचालींमुळे असे झाल्याची शक्यता जाणकार व्यक्त करतात.

ग्रामस्थांनी सांभाळला उमाळा

नाधवडे ग्रामस्थांनी उमाळ्याचे उत्तम संवर्धन केले आहे. वर्षातून दोन ते तीनदा श्रमदानातून या परिसराची स्वच्छता ते करतात. मागील पंधरा, वीस वर्षांत हा उमाळा पर्यटनाच्या नजरेतून जिल्ह्याच्या नकाशावर चमकू लागला आहे.

नाधवडेचा अद्‍भुत उमाळा असा नामोल्लेख आता सर्वत्र होतो. त्यामुळे ग्रामपंचायतीने काही लाखांचा निधी खर्च करून परिसराचा विकास केला आहे. त्यामुळे शेकडो पर्यटकांसाठी हा उमाळा कुतूहलाचा विषय ठरला आहे.

Agriculture
Success Story : हवामानाला अनुकूल शेती पद्धतीचा साधला विकास

बागायती शेती बहरली

नाधवडे उमाळ्याचा प्रवास नाधवडे- ब्राह्मणदेववाडी येथून सुरू होतो. नवलादेवी, गावठणवाडी, बौद्धवाडी, हेलकरवाडी, नापणे धबधबा आणि नापणे गाव असा पाच- सहा किलोमीटर प्रवास करीत उमाळ्याचे पाणी शुकनदीच्या मुख्य प्रवाहाला मिळते. त्यातून नाधवडे, नापणे गावांतील शेकडो एकर शेती बागायती झाली आहे. दोन्ही गावांमध्ये उसाचे अस्तित्व नव्हते. आता १७८ हेक्टर शिवारात ऊस आहे.

त्यातून दोन्ही गावांची आर्थिक उलाढाल सुमारे अडीच कोटींच्या आसपास पोहोचली आहे. सुमारे २५ एकरांत कलिंगड आहे. त्यातून ४० ते ५० लाखांची उलाढाल होते. कुळीथ, चवळी, भुईमूग या पिकांखाली ६७ हजार हेक्टर क्षेत्र आहे.

झेंडू, पालेभाज्या, फळभाज्याही गावशिवारांत बहरू लागली आहेत. दोन्ही गावांत काजू ६६० हेक्टर, तर आंब्याचे १२६ हेक्टर क्षेत्र आहे. त्यांनाही पाण्याचा अप्रत्यक्ष उपयोग होतो. आजूबाजूच्या गावांमध्ये केवळ गवत वाढलेली ओसाड माळराने दिसून येतात. परंतु या दोन गावांमध्ये बारमाही हिरवाईच दृष्टीस पडते. उमाळा शुकनदीच्या प्रवाहात गेल्याने पुढे कणकवली तालुक्यातील चिंचवली आणि शेर्पे ही गावेही शेतीसमृद्ध झाली आहेत.

पिण्याच्या पाण्याचा सुटला प्रश्‍न

नाधवडेला उमाळ्या व्यतिरिक्त पाण्याचा अन्य स्रोत नाही. अन्य भागात विहीर खोदली तरी पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायम भेडसावत होता. परंतु काही वर्षांपूर्वी उमाळ्यालगत विहिरी खोदण्यात आल्या.

त्याआधारे गावाच्या रचनेनुसार तीन ते चार नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या. आता प्रतिदिन अडीच लाख लिटर पाणी योजनांच्या माध्यमातून ग्रामस्थांना पुरविले जाते. त्यामुळे पाण्याचा प्रश्‍न कायमचा संपला आहे.

उमाळ्याने घडवली प्रगती

उमाळ्याचे पाणी नैसर्गिक आहे म्हणून वापर वायफळ होत नाही. शेतकऱ्यांनी पाण्याच्या बचतीसाठी ठिबक, तुषार सिंचनासारखे पर्याय अवलंबिले आहेत. शेतीतून चांगले उत्पन्न मिळू लागल्याने नाधवडे, नापणे गावांतील तरुण मुंबईला चाकरमानी म्हणून न जाता शेतीतच गुंतले आहेत.

दोन्ही गावांत शेतीत राबणाऱ्या तरुणांची संख्या ७० टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे स्थलांतर थांबले आहे. या उत्पन्नातून शेतीत आधुनिक सुविधा त्यांनी निर्माण केल्या. पक्की घरे बांधली. मुलांना उच्चशिक्षण ते देत आहेत.

Agriculture
Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

पर्यटन व्यवसायाला चालना

उमाळ्यातून नापणे येथे तयार झालेला हा जिल्ह्यातील एकमेव बारमाही वाहणारा धबधबा आहे. उमाळा आणि या धबधब्याला दरवर्षी हजारो पर्यटक भेटी देतात. सुमारे ४० ते ५० फुटांवरून कोसळणाऱ्या पाण्याचे तुषार झेलणे ही पर्यटकांसाठी पर्वणी असते. या पर्यटन व्यवसायातून ३० ते ४० लाखांची उलाढाल होत असावी.

त्यातून वैभववाडी या मुख्य बाजारपेठेच्या अर्थकारणाला चालना मिळाली आहे. पावसाळ्यात या धबधब्याला विविध नाल्यांचे पाणी येते. परंतु उन्हाळ्यात सर्व नाले कोरडे पडतात. त्या वेळी फक्त नाधवडे उमाळ्याचे पाणी धबधब्यावर वाहत असते.

उमाळ्याच्या नैसर्गिक पाण्यामुळे शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता शेतीतच लक्ष घातले आहे. कलिंगड, भोपळा, पालेभाज्या घेत आहे. वर्षाला तीन ते चार लाखांची उलाढाल होते. शेतीच्या विकासासोबत नवे घर बांधले, दुचाकी खरेदी केली.
रमाकांत यादव ७०८३८९४८३२ प्रगतिशील शेतकरी, नाधवडे
उमाळ्याच्या पाण्यावर दहा एकर उन्हाळी शेती करतो. पाच एकर कलिंगड याशिवाय मूग, कुळीथ, भाजीपाला, मधुमका अशी पिकेही घेत आहे. त्यातून घरचे व शेतीचे अर्थकारण उंचावले आहे,
रवींद्र सुदाम गावडे, नापणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com