Vegetable Farming : प्रत्येकी ३० गुंठे भाजीपाला उत्पादनातून मिळविले स्थैर्य

Vegetable Production : वर्षभर कोणकोणत्या भाज्यांना किती व कशी मागणी व दर असतो याचा सखोल अभ्यास करून आंबेगाव (जि. नांदेड) येथील युवा शेतकरी काशिनाथ भोकरकर यांनी बसवलेली भाजीपाला पीक पद्धतीची घडी प्रगतीत महत्त्वाची ठरली आहे.
Vegetable Farming
Vegetable FarmingAgrowon

कृष्णा जोमेगावकर

Agriculture Success Story : नांदेड जिल्हा विविध हंगामी पिकांसह केळी, हळद आदी पिकांसाठीही प्रसिद्ध आहे. नांदेडपासून ३५ ते ४० किलोमीटरवर असलेल्या आंबेगाव (ता. अर्धापूर) येथे काशिनाथ मारोतराव भोकरकर यांची नऊ एकर शेती आहे. वय वर्षे २९ असलेला हा युवा शेतकरी सध्या पूर्णवेळ व संपूर्णपणे आपल्या शेतीची जबाबदारी सांभाळत आहे.

भाजीपाला पिकांचा निवडला पर्याय

काशिनाथ यांनी २०१२ नंतर बारावी व डीएडचे शिक्षण पूर्ण केले. बी.एड.चे शिक्षण पूर्ण करून शिक्षकीपेशामध्ये आपले करिअर करण्याचे स्वप्न पाहात असतानाच त्यांचे वडील एका गंभीर आजाराने ग्रस्त झाले. अनेक उपाय केले. मात्र अखेर त्यांचे निधन झाले. दरम्यान काशिनाथ यांच्या खांद्यावर शेतीची संपूर्ण धुरा आली. प्रारंभी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती विहीर व दोन कूपनलिका घेऊन बारमाही पाण्याखाली आणली. केळी, ऊस, हळद यासारखी दीर्घ कालावधीची नगदी पिके ते घेऊ लागले. परंतु या पिकांना कधी बाजारभावाचा तर कधी नैसर्गिक संकटाचा फटका बसे. यामुळे उत्पन्नात सातत्य राहात नसे. दीर्घ मुदतीच्या पिकांना कमी मुदतीच्या भाजीपाला पिकांचा आधार हवा असे त्यांना वाटू लागले. मग आपल्या नजीकच्या बाजारपेठांमध्ये वर्षभर कोणकोणत्या भाज्यांना किती, कशी मागणी व दर असतात याचा सखोल अभ्यास केला. त्यानुसार भाजीपाला पीक पद्धतीची आखणी केली.

Vegetable Farming
Agriculture Success Story : तूर- सोयाबीन पद्धतीचा भलमे यांचा आदर्श

प्रत्येकी तीस गुंठ्यात भाजीपाला

उन्हाळ्यात पाण्याअभावी काकडीची लागवड सर्वत्र कमी असते व पावसाळ्यात त्याला चांगले दर मिळतात हे पाहून या पिकाची निवड केली. त्याचदरम्यान कारले पिकाचीही लागवड सुरू केली.

सप्टेंबरमध्ये लागवडीसाठी दोडका व फ्लॉवर अशी पिके निवडली. जोडीला टोमॅटोदेखील ठेवला.

या पद्धतीमुळे वर्षभर भाजीपाला शेतात पिकू लागला.

सर्व पिकांना गादीवाफा, पॉली मल्चिंग केले. एका पिकाच्या काढणीनंतर दुसऱ्या पिकासाठी या मल्चिंगचा उपयोग होऊ लागला.

प्रत्येक पिकासाठी ३० गुंठे क्षेत्र निश्‍चित केले. आज तेवढ्या क्षेत्रात काकडीचे १३ ते १५ टनांपर्यंत, कारले व दोडक्याचे ११ ते १२ टन तर फ्लॉवरचे ६ ते ७ क्विंटल उत्पादन काशिनाथ साध्य करतात.

नांदेड बाजारपेठेत विक्री होते. निजामाबाद येथील व्यापारी देखील जागेवर येऊन खरेदी करतात.

Vegetable Farming
Vegetable Farming Success Story : भाजीपाला पिकांनी उंचावले दानापूरचे अर्थकारण

मागील तीन- चार वर्षांचा विचार केल्यास प्रति किलो काकडीस २० ते २२ रुपये, कारले व दोडका ६० ते ७० रुपये व फ्लॉवरला २० ते २५ रुपये दर मिळतो.

मागील वर्षी प्रचंड गारपीट व अवकाळी पावसात कारले व दोडका यांचे अतोनात नुकसान झाले. काकडीचे देखील नुकसान झाले. मात्र दहा तोड्यांपासून सात टनांपर्यंत उत्पादन व २५ ते ३० रुपये प्रति किलो दर मिळाला. त्यातून दीड लाखांपर्यंत उत्पन्न मिळाले. संकटात आर्थिक आधार तयार झाला.

शेतीतील खर्च कमी करण्यासाठी काशिनाथ यांनी जैविक निविष्ठांच्या वापरावर अधिक भर दिला आहे. शेतीमालाची गुणवत्ता चांगली राहावी यासाठी वेलींची बांधणी मजबूत व जमिनीपासून उंचावरकेली आहे. पूर्वी बांबू रोवून तीन स्टेजमध्ये तारा व सुतळी यांचा वापर व्हायचा. आता दोऱ्यांचे रीळ तारांमध्ये गुंफण्यात येते. या पद्धतीत मजूरश्रमही कमी झाले आहे.

भाजीपाला पीक पद्धतीतून वर्षाला एकूण १० ते १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. त्यातून चांगला आर्थिक आधार तयार झाला आहे. एकूण शेतीपैकी अन्यत्र असलेल्या क्षेत्रात पाण्याची सुविधा नव्हती. तेथे पाइपलाइन करणे शक्य झाले आहे. आई कलावती, पत्नी मीरा यांची शेतीत मोठी मदत होते. छोटा भाऊ पुणे येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करतो आहे.

केळी, हळदीचे उत्पादन

दरवर्षी केळीचे दोन ते तीन एकर क्षेत्र असते. सध्या उति संवर्धित २४०० झाडांचे संगोपन होत आहे. एकरी ३० टनांपर्यंत उत्पादन त्यांना मिळते. यंदा आखाती देशांमध्ये निर्यात करण्याच्या उद्देशाने त्यांनी बागेचे व्यवस्थापन केले आहे. हळदीचे एकरी ३० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. नांदेड व वसमत बाजारपेठेत विक्री होते.

दीर्घ मुदतीचे एक पीक वर्षभरानंतर उत्पन्न देते. त्याच वर्षात कमी कालावधीची भाजीपाल्याची दोन ते तीन पिके शेतीत फायदा करून देतात. मी त्याच दृष्टीने प्रत्येकी ३० गुंठ्यांत वर्षभर त्यांचे नियोजन केले आहे. एखाद्या कंपनीत आठ तास काम केल्याप्रमाणे व सातत्याने बारकाईने निरीक्षण करून काम करीत राहिल्याने शेती नक्कीच फायदा देऊन जाते.

काशिनाथ भोकरकर,  ९५२७५७४७३५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com