Millet Processing : हरितक्रांतीचे अग्रणी आणि देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचा २७ डिसेंबर हा जन्मदिन. हे वर्ष म्हणजे त्यांची १२५ वी जन्मशताब्दी साजरी केली जात आहे. विदर्भाच्या या सुपुत्राने शेती आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम केले.
अकोला येथे आज त्यांच्याच नावे कृषी विद्यापीठ कार्यरत असून, त्या माध्यमातून संशोधन, तंत्रज्ञान व प्रसाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविण्याचे कार्य अखंड सुरू आहे.
विद्यापीठाचे कार्यक्षेत्र विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये पसरले आहे. पूर्व व पश्चिम विदर्भाची वेगवेगळी भौगोलिकता डोळ्यासमोर ठेवत पीकवाण, संशोधनाचे धोरण आखण्यात आले आहे.
भरडधान्यांवरील कार्य
विद्यापीठ आवारात कृषी महाविद्यालय कार्यरत असून, त्या अंतर्गत पौष्टिक तृणधान्य (भरडधान्ये - मिलेट्स) प्रक्रिया केंद्राची स्थापना झाली आहे. भरडधान्यांविषयी अलीकडील काळात अधिकाधिक जागरूकता वाढीस लागली आहे. येथील केंद्रात भरडधान्यांच्या संशोधन प्रकल्पाला डिसेंबर २०२१ मध्ये सुरुवात झाली.
तर दोन सप्टेंबर २०२२ मध्ये प्रकल्पाचे उद्घाटन झाले. राजीव गांधी विज्ञान आयोग (मुंबई) अंतर्गत पौष्टिक तृणधान्य मूल्य साखळी योजनेतून प्रकल्पाला ६२ लाख ४२ हजार २०० रुपयांचे अर्थसाह्य मिळाले.
त्यातून १९ लाख रुपयांची विविध प्रकारची अद्ययावत यंत्र सामग्री या ठिकाणी बसविण्यात आली. त्यात प्रामुख्याने बेकरी मिक्सर, बेकिंग ओव्हन, ब्रेड स्लायसर, साचे, प्रूफिंग चेंबर, सीलिंग मशिन आदींचा समावेश आहे.
पदार्थांची निर्मिती व तंत्रज्ञान
विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी शाखेचे प्रमुख डॉ. एस. पी. दिवेकर हे केंद्राचे प्रमुख संशोधकदेखील आहेत. त्याचबरोबर डॉ. विवेक खांबलकर, डॉ. माधुरी गजबे, योगिता सानप आदी तज्ज्ञ येथे संशोधन करतात.
केंद्रात बेकरीजन्य पदार्थ उदा. मिल्कब्रेड, नानकटाई, खारी, टोस्ट आदी पदार्थांची निर्मिती होतेच. शिवाय बाजरी, नाचणी, ज्वारी, वरई आदी भरडधान्यांवर आधारित नानकटाई, कपकेक, ब्रेडस्टिक, टोस्ट आदी पदार्थही तयार केले जातात. कच्चा माल म्हणून केवळ मैदा न वापरता त्यात ‘मिलेट्स’चा वापर करून पदार्थ चविष्ट व रुचकर कसे बनविता येतील त्यावर संशोधनदेखील सुरू आहे.
त्यादृष्टीने पदार्थ वाफवणे, टरफल काढणे, पफिंग, कडधान्यांना मोड आणून ते वाळवणे व त्यांचे पीठ तयार करणे आदी टप्प्यांवर संशोधन सुरू आहे. मैद्याचे प्रमाण २० ते ५० टक्क्यांपर्यंत कमी करून त्यात तेवढ्याच प्रमाणात भरडधान्यांचे पीठ घालून पदार्थ तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पदार्थांचे विपणन, विक्री
केंद्रात तयार होणाऱ्या पदार्थांची विक्री विद्यापीठाचे माहिती केंद्र तसेच नागपूर येथील कृषी महाविद्यालय व त्या अंतर्गत दुग्धशास्त्र विभाग आदी ठिकाणी होऊ लागली आहे. दिवसेंदिवस आरोग्याविषयी जागरूकता वाढत असल्याने या खाद्यपदार्थांना ग्राहकांकडून मागणी चांगली आहे.
विद्यापीठाच्या ‘ॲग्रोटेक’ या कृषी प्रदर्शनातही या विक्रीचे दालन ठेवण्यात येते. केंद्र सुरू झाल्यापासून चांगल्या प्रकारे व्यवसाय झाला आहे. तयार मालाची प्रत उत्तम राखण्यासाठी टापटीपपणा, स्वच्छता या बाबी व्यवस्थित सांभाळल्या जातात. तत्कालीन राज्यपाल महोदयांच्या सूचनेवरून येथील पदार्थांची चव मुंबईत राजभवनातही चाखली गेली आहे.
याशिवाय केंद्राला राज्याचे प्रधान सचिव, कृषी आयुक्त यांनीही भेट देत कौतुक केले आहे. बुधनी (मध्य प्रदेश) येथील ट्रॅक्टर प्रशिक्षण व चाचणी केंद्राचे संचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्यांनी देखील केंद्रातील पदार्थांची चव चाखली आहे.
प्रशिक्षण सुविधा : हे प्रक्रिया केंद्र आता संशोधन, उत्पादनाप्रमाणे विद्यार्थी, शेतकरी, महिला बचत गटांसाठी प्रशिक्षणाचे केंद्र देखील झाले आहे. अन्न तंत्रज्ञान विषयाचे यवतमाळ येथील महाविद्यालय तसेच अकोला येथील कृषी महाविद्यालयातील प्रत्येकी ३० विद्यार्थ्यांना चार महिन्यांचे प्रशिक्षण येथे देण्यात येत आहे.
आजपर्यंत १३ शेतकरी गटांनी एकदिवसीय प्रशिक्षण पूर्ण केले आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या १० सहली येथे आल्या तर सुमारे २५ ते ३० हजारांपर्यंत शेतकऱ्यांनी केंद्राला भेट देऊन माहिती घेतली आहे.
येथील उद्योगामुळे विद्यापीठातील सात ते आठ जणांसाठी प्रत्यक्ष तर अप्रत्यक्षपणे चार ते पाच जणांसाठी रोजगार निर्मिती झाली आहे. प्रशिक्षण घेतलेल्या बचत गटांच्या १० महिला आपला बेकरी उद्योग सुरु करण्याच्या प्रयत्नात आहेत. विद्यार्थ्यांनी विक्री व विपणनाचा अनुभव त्या निमित्ताने मिळत आहे.
डॉ. एस. पी. दिवेकर ९६५७०००५४१
शेतकरी सचोटीने शेतमाल पिकवितो. मात्र मागणी आणि पुरवठा यांचे गणित लक्षात घेता गावपातळीवर कृषी प्रक्रिया उद्योगांची गरज निर्माण झाली आहे. प्रक्रियायुक्त शेतमाल अधिक टिकवण क्षमतेसह आर्थिकदृष्ट्या जास्त लाभही मिळवून देऊ शकतो. ग्रामीण युवा कौशल्य विकासासाठी आमचे विद्यापीठ प्रशिक्षणांचे आयोजन करीत असते. त्याद्वारे उद्योजक घडण्यास दिशा मिळेल.डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
तृणधान्य प्रक्रिया ही काळाची गरज आहे. या क्षेत्रातील संधी ओळखून आमचे कृषी महाविद्यालय पुढील वाटचाल करते आहे.डॉ. प्रकाश नागरे, सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, अकोला
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.