Processing Products Agrowon
ॲग्रो विशेष

Dragon fruit Processing : ड्रॅगन फ्रूटपासून प्रक्रिया उत्पादने

Hylocereus Undatus : ड्रॅगन फ्रूट (Hylocereus Undatus) हे मूलतः अमेरिकेतील असून, त्याला जगभरात पिटाया, स्ट्रॉबेरी पिअर, नोबलवूमन आणि ‘क्वीन ऑफ द नाइट’ या नावांनीही ओळखले जाते.

Team Agrowon

निखिल देवरे

Dragon Fruit Products :

ड्रॅगन फ्रूट (Hylocereus Undatus) हे मूलतः अमेरिकेतील असून, त्याला जगभरात पिटाया, स्ट्रॉबेरी पिअर, नोबलवूमन आणि ‘क्वीन ऑफ द नाइट’ या नावांनीही ओळखले जाते. हलक्या जमिनीतही सुमारे १५ ते २० वर्षांपर्यंत उत्पादन देण्याची क्षमता आणि तुलनेने कमी देखभाल आवश्यक असलेल्या या पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत.

महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्येही ड्रॅगन फ्रूट लागवडीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, बाजारातील आवक वाढून दर कमी होत आहे. अशा स्थितीमध्ये या फळांपासून प्रक्रिया उत्पादने करण्याची गरज निर्माण होत आहे.

ड्रॅगन फ्रूटमध्ये प्रथिने, फायबर, लोह आणि मॅग्नेशिअम यांसारखे पोषक घटक आढळतात. याशिवाय या फळामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई यासारखे अँटी-ऑक्सिडंट्स देखील असतात. महत्त्वाचे म्हणजे यात फॅट्सचे प्रमाण खूप कमी आणि फायबरचे प्रमाण अधिक असते.

त्यामुळे प्रक्रिया उद्योगामध्ये ड्रॅगन फ्रूटच्या निर्जलीकरणाला मोठा वाव आहे. या फळात पाण्याचे प्रमाण मोठे असून, त्याचे निर्जलीकरण केल्यामुळे अंतिम उत्पादनाचे वजन आणि प्रमाण कमी होते. तसेच त्यांची पॅकेजिंग, साठवण आणि वाहतूक खर्च कमी होतो.

चिप्स निर्मितीसाठी आवश्यक यंत्रे आणि सामग्री

- फळे, ट्रे ड्रायर, जाळीदार ट्रे, फ्रूट स्लायसर, सायट्रिक ॲसिड, २०० गेज जाडीच्या पॉलिथिन पिशव्या.

कृती : सर्वप्रथम व्यवस्थित पिकलेल्या फळांची निवड करून घ्यावी. ड्रॅगन फ्रूटची दोन्ही टोके धारदार चाकूच्या साह्याने कापून फळाच्या मध्यभागी सालीवर चाकूच्या साह्याने समांतर काप करून साल व्यवस्थित काढून घ्यावी. त्यानंतर फळांच्या चकत्या करून (अंदाजे जाडी ०.४ ते ०.५ मिमी पेक्षा जास्त). या चकत्या सायट्रिक ॲसिडच्या २ टक्के द्रावणात ३० मिनिटे बुडवून ठेवावेत. त्यानंतर चकत्या बाहेर काढून अतिरिक्त पाणी काढून घ्यावे.

या चकत्या एका थरामध्ये एकमेकांना न चिकटतील अशा प्रकारे ट्रेमध्ये ठेवाव्यात. हे ट्रे ड्रायरमध्ये ५५ ते ६० अंश सेल्सिअस तापमानात ८ ते १० तासांपर्यंत सुकविण्यासाठी ठेवावेत. त्यासाठी ड्रायरमधील जाळीदार ट्रेचा वापर केल्यास चकत्या दोन्ही बाजूंनी व्यवस्थित सुकतील. ट्रेच्या एका बाजूला चिटकणार नाहीत.

चिप्स व्यवस्थितरीत्या सुकल्यानंतर २०० गेज जाडीच्या पॉलिथिन पिशव्या अथवा पॉलीप्रोपेलिन पाउचमध्ये भराव्यात. सीलबंद केल्यानंतर २० ते २५ अंश सेल्सिअस तापमानात साठवण करावी. ४५ ते ५० दिवसांपर्यंत चिप्स व्यवस्थित राहतात.

प्रक्रियेमध्ये घ्यावयाची काळजी

फळांची निवड करताना एकसमान फळे निवडावी.

अति पिकलेली फळे घेऊ नये.

चिप्सला आंबट-गोड चव येण्यासाठी त्यांना सायट्रिक ॲसिडच्या द्रावणात बुडवल्या जातात. सुकविण्यास ठेवण्यापूर्वी अतिरिक्त सायट्रिक ॲसिड काढले जाईल, याची काळजी घ्यावी.

चिप्स साठवण करत असताना पॉलिथिन पिशव्या व्यवस्थित हवाबंद कराव्यात. त्यानंतर त्या २० ते २५ अंश सेल्सिअस तापमानात साठवाव्यात.

फळांच्या चकत्यांची जाडी ०.४ ते ०.५ मिमी पेक्षा जास्त ठेवावी. सुकल्यानंतरही त्यांचे आकारमान टिकून राहील.

ड्रॅगन फळाच्या सालीची पावडर

ड्रॅगन फळाच्या सालीमध्ये जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स, बीटासायनिन आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात. त्यांचा वापर पारंपरिक चिनी औषधांमध्ये केला जातो. चिप्स बनवताना शिल्लक राहणाऱ्या ड्रॅगन फ्रूट सालीपासून भुकटी बनवता येते. त्यासाठी प्रथम काढलेली साल पाण्यामध्ये व्यवस्थित धुऊन घ्यावी.

त्यावर धूळ, मातीचे कण आणि अन्य काडी कचरा राहणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यानंतर सालीचे लहान लहान तुकडे करून ट्रे ड्रायरमध्ये ८५ ते ९० अंश सेल्सिअस तापमानात १२ ते १४ तासांपर्यंत साल वाळवून घ्यावी.

वाळलेली साल ग्राइंडरमधून काढून त्याची बारीक पावडर करून चाळणीने चाळून हवाबंद डब्यात किंवा पॉलिथिन पाउचमध्ये पावडरची साठवणूक करावी. या भुकटीमध्ये आरोग्यवर्धक असे अनेक गुणधर्म असून, खाद्य पदार्थांना रंग आणण्यासाठी त्यांचा वापर करता येतो.

निखिल देवरे, ९५२७५८०९८८

(सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Cabinet : खानदेशात यंदा चौघांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता

Fertilizer Shortage : संयुक्त खताची टंचाई; पर्यायी खते वापरा

Jalgaon ZP : जिल्हा परिषदेत तक्रारी, अडचणींवर कार्यवाही होईना

Labor Shortage : यवतमाळ जिल्ह्यातील कामे मजुरांअभावी खोळंबली

Agrowon Podcast : कांदा भावात चढ उतार सुरु; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आजचे लसूण दर?

SCROLL FOR NEXT