विजयसिंह काकडे, अमृत मोरडे, संग्राम चव्हाण
Dragon Fruit Farming Management : सध्या ड्रॅगन फ्रूट फळांचा हंगाम संपला आहे. हंगाम संपल्यावर बागेमध्ये घ्यावयाची दोन महत्त्वपूर्ण कामे म्हणजे शाकीय वाढीसाठी केली जाणारी छाटणी आणि खत पुरवठा. छाटणी करण्यासाठी नोव्हेंबर-डिसेंबर ही योग्य वेळ आहे. कारण, हिवाळ्यात ड्रॅगनफ्रूटमध्ये जास्त प्रमाणात नवीन फुटवे निघतात. फळ धारणेसाठी नवीन फांद्यांना कमीत कमी ७ ते ८ महिने मिळाले पाहिजेत, जेणेकरून पुढील हंगामामध्ये या फांद्यांवर फळधारणा सुरू होते. तसेच जेवढ्या उशिरा आपण छाटणी करू, नवीन फांद्या तेवढ्याच उशिरा निघतात आणि या नवीन फांद्यांना वाढीसाठी उन्हाळ्यात जास्त ताण सहन करावा लागतो. म्हणून योग्य वेळेत छाटणी करून या अडचणी कमी करता येतात.
छाटणीचे फायदे
छाटणी केल्याने नवीन फांद्या फुटण्यासाठी वाव मिळतो.
रोगग्रस्त फांद्यांची संख्या कमी होते.
अतिरिक्त फांद्या कमी करून झाडावरील फांद्या, फळांचे प्रमाण योग्यरित्या राखता येते.
फांद्यावरील फुलधारणेचे प्रमाण वाढते.
छाटलेल्या निरोगी फांद्यांचा उपयोग रोपे बनवण्यासाठी करता येतो.
छाटणीचे नियोजन
झाडांच्या वयानुसार छाटणी सुनिश्चित करावी. नवीन बागांमध्ये खूप जास्त छाटणीची आवश्यकता नसते. परंतु, झाडांची वाढ लवकर व्हावी आणि लवकर कॅनॉपी (विस्तार) तयार होण्यासाठी थोडीफार आवश्यकतेनुसार छाटणी घ्यावी.
जुन्या बागांमध्ये रोगग्रस्त फांद्या कमी करण्यासाठी, योग्य प्रमाणात फांद्या राखण्यासाठी हलकी-मध्यम प्रमाणात नियमित छाटणी करावी.
जुन्या बागेचे व्यवस्थापन
जुन्या बागांमध्ये छाटणी करताना रोगग्रस्त आणि सावली मध्ये येणाऱ्या जुन्या फांद्यांना प्राधान्य देऊन कटींग करावे. फांद्यांच्या विरळणीकडे जास्त लक्ष द्यावे.
पूर्ण वाढ झालेल्या झाडांमध्ये शक्यतो १५० च्या आसपास फांद्या असतील याची काळजी घ्यावी. ज्या फांद्यामधील काटे गळून पडलेले असतील किंवा काट्यांच्या जागी काळसरपणा आलेला असेल अशा फांद्या काढून टाकाव्यात.
काही बागांमध्ये रोगांचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात असल्यास अशा झाडांमध्ये प्लेटच्या वरील सर्व फांद्या काढून टाकाव्यात. यामुळे नवीन व निरोगी फांद्यांना निघण्यासाठी वाव मिळेल. आपण झाडांवर जेवढ्या जास्त फांद्या ठेवणार तेवढेच नवीन फुटवे निघण्याचे प्रमाण कमी होते. सावलीतील किंवा झाकलेल्या फांद्यांना फुलधारणेचे प्रमाण सुद्धा कमी होत जाते. यासाठी, जास्तीत जास्त जुन्या फांद्यांची छाटणी करून व नवीन फांद्यांना वाव देवून आपण झाडांची फूल, फळ धारणा कायम ठेवू शकतो.
छाटणीचे काम पूर्ण झाल्यानंतर एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी घ्यावी, जेणेकरून छाटणी दरम्यान झालेल्या इजांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही.
छाटणी पूर्ण झाल्यानंतर काढलेल्या फांद्या शक्य तेवढ्या वेळेत बागेमधून बाहेर काढून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी.
इतर फळपिकांच्या तुलनेत ड्रॅगनफ्रूटमधील छाटणी जाड फांद्या आणि काटे असल्याने त्रासदायक व कठीण आहे. तरीपण वाढत्या रोगांचे प्रमाण पाहता, बाग निरोगी राहण्यासाठी, तसेच फूल-फळ धारणा कायम राहण्यासाठी छाटणी दरवर्षी घेणे खूप महत्त्वाचे आहे.
छाटणी करताना महत्वाच्या बाबी
छाटणी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये करावी.
पूर्ण वाढ झालेल्या झाडावर शक्यतो दिडशेच्या आसपास फांद्या असाव्यात.
छाटणी करताना कात्री वारंवार निर्जंतूक करावी.
छाटणी झाल्यानंतर लगेच प्रतिबंधात्मक बुरशीनाशकांची फवारणी करावी.
रोगट फांद्या जास्त दिवस बागेत पडून राहणार नाहीत याची काळजी घ्यावी.
तीन वर्षांच्या पुढील बागेत दर वर्षी नियमितपणे हलकी ते मध्यम छाटणी करावी.
नवीन बागांमधील नियोजन
नवीन बागेमध्ये, म्हणजेच ज्यामध्ये अजून फांदी प्लेटच्या बाहेर पडली नाही, अशा बागांमध्ये आडव्या फुटलेल्या फांद्या जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर कापून टाकाव्यात. जेणेकरून अन्नद्रव्यांचा अपव्यय होणार नाही.
ज्या बागांमध्ये फांद्या प्लेटच्या बाहेर पडल्या आहेत अशाठिकाणी जर आपण फांद्यांना प्लेटपासून ८ ते १० सेंमीवर छाटले तर अशा फांद्यांना अधिक फुटवा निघू शकतो. झाडाची कॅनॉपी (विस्तार) लवकर बनण्यास मदत होते.
जर हा कट आपण प्लेट पासून जास्त अंतरावर घेतला तर फांद्यांच्या शेंड्यांना नवीन फुटवा निघून जुनी फांदी तुटण्याचे प्रमाण वाढते. शक्यतो, जास्तीत जास्त नवीन फुटवा प्लेटच्या जवळपास किंवा अवतीभवती काढावा. जेणे करून फांदी तुटण्याचे प्रमाण कमी होते.
रोगट फांद्या काढून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. छाटणीसाठी वापरण्यात येणाऱ्या कात्र्यांना करत वारंवार निर्जंतुकीकरण करावे. कारण, बागेमध्ये रोगट फांद्यामधून निरोगी फांद्यामध्ये रोग पसरवण्यासाठी या कात्र्या कारणीभूत ठरू शकतात. निर्जंतुकीकरणासाठी हायड्रोजन पॅराऑक्साइडचा वापर करावा.
रोगट फांद्या काढण्यासाठी एक स्वतंत्र मजूर ठेवावा, जेणेकरून छाटणी करताना त्या कात्र्यांचा स्पर्श चांगल्या फांद्यांना होणार नाही. रोगट फांदी कापताना रोगट भागापासून ४ ते ५ सेंमी पाठीमागे कापावी. फांद्यावरत जवळ जवळ निघणाऱ्या फुटव्यांची विरळणी करणे गरजेचे आहे. जेणेकरून पुढे जाऊन झाडावर फुटव्यांची जास्त गर्दी होणार नाही. हवा आणि सूर्यप्रकाश व्यवस्थितपणे सर्व फांद्यांना मिळत राहतो. असे केल्याने फांद्यामधील परिपक्वता लवकर होऊन फूल आणि फळ धारणा वाढू शकतो.
छाटणीचे काम पूर्ण झाल्यानंतर एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी, जेणेकरून छाटणी दरम्यान झालेल्या इजांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. योग्य व्यवस्थापन केले तर फांद्यांची जोमदार वाढ होते.
- विजयसिंह काकडे, ७३८७३५९४२६
(राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, माळेगाव, बारामती,जि.पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.