Drumsticks Food Agrowon
ॲग्रो विशेष

Drumstick Foods : शेवग्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मिती

Food Production : भारतातील बहुतेक सर्व उष्ण, आर्द्रतायुक्त हवामानातही वेगाने वाढणारे शेवगा हे पीक कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते. शेवग्याच्या शेंगा वर्षभर बाजारामध्ये उपलब्ध असतात.

Team Agrowon

सचिन शेळके

Drumstick Food Processing :

मराठी नाव : शेवगा

शास्त्रीय नाव : मोरिंगा ऑलिफेरा

इंग्रजी नाव : ड्रमस्टीक

प्रजाती : मोरिंगा

भारतातील बहुतेक सर्व उष्ण, आर्द्रतायुक्त हवामानातही वेगाने वाढणारे शेवगा हे पीक कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते. शेवग्याच्या शेंगा वर्षभर बाजारामध्ये उपलब्ध असतात. शेवग्याची पाने, शेंगा, कोवळ्या फांद्या आणि बिया अशा साऱ्यांमध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात. त्यात असणारी अ, ब आणि क जीवनसत्त्व आणि खनिजे विशेषतः लोह आणि सल्फर, सिस्टेनाइन, अमिनो आम्ले महत्त्वाची ठरतात. आहारामध्ये नियमित घेतल्यास रोग प्रतिकारकता वाढते. म्हणूनच शेवग्याच्या पंचांगाचा वापर सुमारे ३०० आजारांच्या उपचारामध्ये करता येतो.

मूल्यवर्धित पदार्थांची निर्मिती पाने

शेवग्याच्या पानांचा समावेश पोषक किंवा पूरक आहारामध्ये केला जातो. ही पाने भाजी स्वरूपात खाल्ली जातात. पाने वाळवून तयार केलेल्या भुकटीचा वापर भाज्या, ब्रेड, पास्ता या खाद्यपदार्थामध्ये केला जातो.

पानांची भुकटी

झाडावरून पाने काढून स्वच्छ धुऊन घ्यावीत. ही पाने सावलीत २ ते ३ दिवस वाळवावीत. (उन्हामध्ये वाळविल्यास त्यातील ‘अ’ जीवनसत्त्व कमी होते.) वाळलेली पाने मिक्सर किंवा पल्व्हरायजरमध्ये टाकून बारीक भुकटी तयार करून घ्यावी. साधारणतः ५० किलो शेवग्याच्या पानापासून १२ ते १५ किलो पावडर मिळते. तयार केलेली पावडर निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीमध्ये किंवा पाउचमध्ये पॅक करावी. तिची कोरड्या ठिकाणी साठवणूक केल्यास सहा महिन्यांपर्यंत टिकते. तिचा वापर आयुर्वेदिक औषधे, पूरक प्रथिने म्हणून केला जातो. अलीकडे बेकरी उत्पादनामध्ये उत्पादनांची पोषकता वाढविण्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे.

पानाचा रस

सुरुवातीला शेवग्याची १० किलो ताजी पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत. तिला मंद आचेवर ५ मिनिटे गरम करावीत. त्यानंतर थंड करून घ्यावीत. शेवग्याच्या १० किलो पानांमध्ये १ लिटर पाणी टाकून हॅमर मिलच्या साह्याने बारीक करून घ्यावीत. तयार झालेल्या शेवग्याचा पानांचा रस गाळून घ्यावा. त्यात २५० ग्रॅम साखर, २० ग्रॅम जिरे पावडर टाकून मिसळून घ्यावीत. तयार झालेला रस ३ ते ४ अंश तापमानामध्ये रेफ्रिजरेटरमध्ये साठवावे.

पानांचा चहा

स्वच्छ धुऊन सावलीत वाळवलेली शेवग्याची पाने चहा पूडप्रमाणे बारीक करून घ्यावीत. एका पातेल्यात पाणी गरम करून ही एक चमचा पावडर मिसळावी. साखर टाकून घुसळून घ्यावे. तयार झालेल्या चहा काचेच्या ग्लासमध्ये ओतून घ्यावा. त्यात चवीप्रमाणे ४ ते ५ थेंब लिंबू रस पिळावा. चवीला चांगला लागतो.

शेवगा शेंगांचे पदार्थ

शेवग्याची कोवळी शेंग शिजवून खाता येते. तसेच तिचा कढीमध्ये वापर केला जातो. शेंगा पाण्यामध्ये उकळून त्याची डाळीसोबत आमटी केली जाते. कोवळ्या शेंगाचा वापर सॅलडमध्ये केला जातो. दक्षिण भारतात शेंगा हा सांबरातील एक महत्त्वाचा घटक पदार्थ आहे.

शेंगेचे लोणचे : १ किलो शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुऊन घ्याव्यात. त्यानंतर शेंगाची वरची साल काढून ३ सेंमी तुकडे करून घ्यावीत. ५ ते ७ मिनिटे शेंगा २० ते ३० अंश तापमानाला वाफवून घ्याव्यात. त्यानंतर त्यात मेथी ५० ग्रॅम, मोहरी ४० ग्रॅम, मिरची पावडर ३० ग्रॅम, चिंचेची पेस्ट ३० ग्रॅम तयार करावी. कढईमध्ये तेल ३५० मिलि टाकून त्यामध्ये लसूण १० ग्रॅम, हिंग ५ ग्रॅम, मीठ ३५ ग्रॅम, हळद ६० ग्रॅम, साखर २० ग्रॅम व वरील तयार केलेली पेस्ट टाकून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण ५ ते १० मिनिटे शिजवून घेतल्यानंतर त्यात वाफवलेल्या शेंगा टाकाव्यात. त्या पुन्हा ५ ते ७ मिनिटे मंद आचेवर शिजवाव्यात. शिजल्यानंतर मिश्रण थंड करून घ्यावे. त्यामध्ये १० मिलि व्हिनेगर व १०० मिलि तिळाचे तेल मिसळावे. तयार झालेले लोणचे निर्जंतुक केलेल्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवावे.

शेवग्याच्या बियांची पावडर

शेवग्याच्या बिया पाण्यामध्ये घेऊन १० ते १५ मिनिटे उकळून घ्याव्यात. त्यानंतर त्यावरील पारदर्शक भाग काढून घ्यावा. त्यानंतर बिया सूर्यप्रकाशात वाळवून घ्याव्यात. बिया वाळल्यानंतर त्याला पल्व्हरायजर (पावडर करण्याचे यंत्र) मध्ये बारीक करून घ्याव्यात. या बियांच्या भुकटीचा वापर स्वासेजच्या सिझनिंगमध्ये केला जातो.

आरोग्यासाठी फायदे

शेवग्याच्या पानाच्या रसाचे सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रित राहतो. हा रस मधाबरोबर घेतल्यास डायरीया, जुलाबावर गुणकारी आहे. या रसामुळे पोटातील कृमींचा नाश होण्यास मदत होते.

पानाच्या रसामुळे मधुमेही व्यक्तींची ग्लुकोज मात्रा नियंत्रणात राहण्यास मदत होते.

पानाचा रस त्वचेसाठी ॲन्टीसेप्टीक म्हणून वापरला जातो.

पानापासून तयार केलेले सूप अस्थमा आजारामध्ये उपयोगी ठरतो.

डोकेदुखीचा त्रासामध्ये शेवग्याची पाने कपाळावर चोळून लावल्यास डोकेदुखी कमी होते. शरीराच्या भागावर सूज कमी करण्यासाठीही शेवग्याचा पाला उपयोगी ठरतो.

शेवगा शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असल्यामुळे हाडांच्या ताकदीसाठी उपयुक्त ठरते.

शेवग्यामुळे शरीराची रक्त शुद्धीकरण व्यवस्थित होऊन त्वचेचे आरोग्य उत्तम राहते.

शेवगा शेंगाच्या सूप पिल्याने ब्रॉन्कॉयटिसचा त्रास कमी होतो. शेवग्यातील नियासिन, रायबोफ्लॅविन, फोलिक ॲसिड व बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.

मुतखडा, हृदयरोग, कर्करोग यासारख्या गंभीर आजारांमध्ये शेवग्याच्या वापरासंदर्भात संशोधन सुरू आहे.

आयुर्वेदानुसार शेवग्याच्या पंचांगाचा (पान, फुले, शेंगा, बिया, साल आणि मुळे) विविध आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीसाठी वापर होतो.

शेवग्याच्या पानाची भाजी सेवन केल्याने आतड्यांना उत्तेजित करून पोटाच्या सफाईमध्ये मदत करते. जठराचा कर्करोग टाळण्यासाठी त्याचा फायदा होतो. आतड्यातील जखमा भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरते.

शेवग्याच्या पानाचा रस आणि मध यांचे मिश्रण मोतीबिंदू झालेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. शेवग्याच्या पानाचे चूर्ण कॅन्सर आणि हृदय रोगांसाठी उपयुक्त औषध आहे.

पाण्याच्या शुद्धीकरणासाठी शेवग्याचे चूर्ण वापरले जाते.

शेवग्यामधील अ जीवनसत्त्व असून, ते सौंदर्यवर्धक म्हणून काम करते. डोळ्यांसाठी लाभदायक असते. चेहऱ्यावरील मुरूम (पिंपल्स) चे प्रमाणही कमी करण्यास मदत होते.

सचिन शेळके, ८८८८९९२५२२

(आचार्य पदवी विद्यार्थी, अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, सॅम हिग्गिनबॉटम कृषी, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय, प्रयागराज, उत्तर प्रदेश)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vasantrao Naik: पहिले शेतकरी मुख्यमंत्री

Orchard Nutrient Management : फळपिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे

Agriculture PhD Education: अधिछात्रवृत्तीअभावी कृषी संशोधन धोक्यात

Onion Storage Shed : कांदा चाळीने सोडविली साठवणुकीसह दरांची समस्या

Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रूट ठरले आश्‍वासक

SCROLL FOR NEXT