Farmer Crop Management :
शेतकरी नियोजन
पीक : कपाशी
शेतकरी : पंडित विश्वनाथ ढोंबळे
गाव : कोथळी खुर्द, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला
एकूण क्षेत्र : ३० एकर
कपाशी लागवड : ९ एकर
अकोला जिल्ह्यांतील पंडित विश्वनाथ ढोंबळे हे मागील बऱ्याच वर्षांपासून नियमितपणे कपाशी लागवड करीत असतो. यावर्षी त्यांनी कपाशी १० जूनच्या दरम्यान लागवड केलेली आहे. सध्या कपाशीचे पीक दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीचे झालेले आहे. पिकात फुलपात्या, बोंडांची अवस्था सुरू झाली आहे. पीक हिरवेगार असून पिकावर कीड-रोगांवर नियंत्रण मिळवलेले आहे. आगामी काळात गरजेनुसार कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रासायनिक फवारणी तसेच शिफारशीनुसार खत व्यवस्थापनावर भर दिला जाणार आहे. दरवर्षी योग्य व्यवस्थापनातून अधिकाधिक उत्पादन घेण्याचा पंडित ढोंबळे यांचा प्रयत्न असतो.
असे केले कीड नियंत्रण
यावर्षी सततचे ढगाळ वातावरणामुळे कपाशी पिकावर कीड-रोगांचे प्रादुर्भाव तीव्र होण्याची शक्यता होती. त्यासाठी पहिली फवारणी रसशोषक किडी मावा, तुडतुडे, फुलकिड्यांसाठी घेतली. किटकनाशकांसह सोबत १९ः१९ः१९ व ह्युमिक ॲसिडचा वापर केला. त्यानंतर आणखी दोन फवारण्या घेतल्या. त्यामध्ये पिकाची निकोप वाढ आणि जादा माल धरण्याच्या उद्देशाने फवारणीचे नियोजन केले. प्रत्येक फवारणीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समावेश करण्यात आला. या पुढील काळात पांढरी माशी, फुलकिडे, बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. त्यासाठी पिकाचे निरिक्षण करून आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक फवारणी घेतली जाईल. त्यासाठी कीडनाशकांसह १३ः००ः४५ व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला जाईल. तसेच बोरॉन, झिंक, कॅल्शिअम नायट्रेट, मॅग्नेशिअम पाण्यात विरघळणाऱ्या खतांची आळवणी केली जाईल. यामुळे उत्पादन वाढीसाठी फायदा होतो, असे पंडितराव सांगतात.
अन्नद्रव्य नियोजन
कपाशीची उत्पादकता ही खतांच्या नियोजनावर अधिकाधिक अवलंबून असते. त्यामुळे पिकाला सुरुवातीपासूनच संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यावर भर दिला जातो. पिकाला पहिला डोस पेरणीसोबतच डीएपीचा दिला. त्यानंतर दुसरी खतमात्रा देताना १०ः२६ः२६, युरिया, पोटॅश व सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा वापर करण्यात आला. पुढील काळात पिकाला तिसरी रासायनिक खतमात्रा देण्याचे नियोजित आहे. यात युरिया, पोटॅश तसेच २०ः२०ः०ः१३, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा वापर केला जाईल. आत्तापर्यंत केलेल्या खत व्यवस्थापनामुळे कपाशी पीक हिरवेगार आणि टवटवीत दिसत आहे.
आंतरमशागतीवर कटाक्ष
यावर्षी सातत्याने पाऊस झाल्याने पिकात तणांचा प्रादुर्भाव चांगलाच दिसून आला. त्यामुळे दोन वेळा निंदणी करावी लागली. पीक लागवडीमध्ये तणनाशकांचा वापर कटाक्षाने टाळला जातो. त्याऐवजी मजुरांकडून तणनियंत्रण करण्यावर भर दिला जातो. शिवाय पिकाला वाफसा, मुळांना मोकळी हवा मिळण्याच्या उद्देशाने तीन वेळा वखरणी देखील करण्यात आली आहे.
पंडित ढोंबळे, ९३२२४५०४४६
(शब्दांकन : गोपाल हागे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.