Pune News : भूमी अभिलेख विभागाने जमीन मोजणीच्या प्रक्रियेमधील मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी ‘ई-मोजणी २.०’ ही नवीन संगणक प्रणाली आणली आहे. यामध्ये प्रामुख्याने जमीन मोजणीचा अर्ज ज्या क्रमाने येणार, त्याच क्रमाने (प्राधान्यक्रमाने) मोजणी केली जाणार आहे.
त्यामुळे वशिलेबाजीला चाप बसणार असून सध्या या प्रणालीचा वापर पुणे जिल्ह्यातील वेल्हा, बारामती, पुरंदर या तालुक्यांमध्ये सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
मोजणीवेळी उपस्थित असणारे शेतकरी, जागामालक यांचे छायाचित्रही अपलोड करावे लागणार आहे. तसेच मोजणी नकाशावर अक्षांश व रेखांशही (कोर्डिनेट्स) समाविष्ट असतील. या सर्व प्रक्रियेमुळे जमीन मोजणीमध्ये पारदर्शकता येणार आहे.
भूमी अभिलेख विभागाकडून जमिनीची हद्द कायम, पोटहिस्सा, बिनशेती, कोर्टवाटप व कोर्टकमिशन व विविध प्रकल्पांसाठी भूमी संपादन आदींसाठी मोजणीचे काम केले जाते. ‘ई मोजणी-२.०’ प्रणालीमध्ये जमीनधारक स्वतःच मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज भरू शकतात. तसेच मोजणी फी सुद्धा ऑनलाइन भरण्याची सुविधा आहे. यांसह मोजणी अर्जाबाबतची प्रगती अर्जदाराला ‘एसएमएस’द्वारे कळणार आहे. यांसह जमीन मोजणीच्या नकाशाची प्रतही ऑनलाइन मिळत आहे.
सध्या संगणक प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येणारे मोजणी अर्ज जीआयएस आधारित रोव्हर्सद्वारे मोजणी करण्यात येत आहे. त्यामुळे मोजणी नकाशामध्ये प्रत्येक हद्दीचे अक्षांश व रेखांश प्राप्त होत आहेत. त्यामुळे जमीन मोजणी प्रकरणांमध्ये लगतच्या धारकांच्या हद्दीबाबत मोजणीवेळी मानवी चुकांमुळे लगतच्या गटांमध्ये एकमेकांच्या हद्दी जाणे अथवा दोन मोजणीमुळे हद्दीमध्ये अंतर पडणे यांसारखे वाद, तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य
मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज केला तरी, त्याची प्रिंट काढून उपअधीक्षक कार्यालयात जमा करावा लागते. त्यावेळी मोजणीसाठीची तारीख दिली जाते. तसेच
मोजणीसाठी बऱ्याच वेळा वशिलेबाजीने मोजणीची तारीख लवकर दिली जाते. त्यामुळे प्रामाणिकपणे मोजणीसाठी वाट पाहणाऱ्यांवर अन्याय होतो. या पार्श्वभूमीवर ई-मोजणी २.० मध्ये ‘फिफो’अर्थात
(फस्ट इन फस्ट आऊट) प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार मोजणी प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहे.
घरबसल्या मिळणार ‘क’प्रत
मोजणी झाल्यानंतर अर्जदारांना मोजणी नकाशाच्या ‘क’ प्रती पुरविल्या जातात. या मोजणी नकाशाच्या ‘क’ प्रतीमध्ये जागेवर प्रत्यक्ष मोजणी वेळी वहिवाटी अथवा ताब्याप्रमाणे अभिलेखाप्रमाणे येणाऱ्या हद्दी दर्शवून योग्य परिमाणात संबंधित टीपा नमूद मोजणी नकाशाची ‘क’ प्रत पुरविली जाते. या प्रणालीनुसार जमीन मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जमीन मोजणीचा नकाशा अर्थात ‘क’ प्रतही ऑनलाइन पद्धतीने डिजिटल स्वाक्षरीत अर्जदाराला मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.