Sugarcane Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Khodwa Management : खोडवा नियोजनामध्ये जमीन सुपीकतेला प्राधान्य

Sugarcane farming : कोल्हापूर जिल्ह्यातील करनूर (ता. कागल) येथील अमोल खोत यांनी संपूर्ण ५ एकरांत ऊस लागवड केली आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Sugarcane Farmer Management

शेतकरी नियोजन

पीक : खोडवा ऊस

शेतकरी : अमोल कुमार खोत

गाव : करनूर, ता. कागल, जि. कोल्हापूर

एकूण ऊस लागवड : ५ एकर

कोल्हापूर जिल्ह्यातील करनूर (ता. कागल) येथील अमोल खोत यांनी संपूर्ण ५ एकरांत ऊस लागवड केली आहे. त्यांच्याकडे विविध क्षेत्रामध्ये उसाचे लागण, खोडवा आणि निडव्याचे पीक आहे. सध्या दोन एकरांत आडसाली, दोन एकरांत खोडवा, तर १ एकरात निडवा उसाचे पीक आहे. अमोल खोत यांनी ऊस शेतीमध्ये सुरुवातीपासूनच प्रयोगशीलता जपली आहे.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमोल यांनी घरच्या शेतीमध्ये लक्ष देण्यास सुरुवात केली. त्या वेळी एकरी ४० टनांपर्यंत ऊस उत्पादन मिळत असे. साडेतीन फूट सरीत ऊस लागवड केली जायची. अमोल यांनी ऊस लागवड पद्धतीमध्ये बदल करण्याचे ठरविले. त्यांच्याकडे मुरमाड व काळी अशा दोन्ही प्रकारच्या जमिनी आहेत. त्यामुळे जमिनीच्या प्रकारानुसार किती फूट सरी सोडायची याचा निर्णय घेतला जातो. साडेतीन फुटांपासून आता साडेसात फुटी पट्ट्यापर्यंत ते आले आहेत. आजपर्यंत त्यांनी रोप लागण कमी-जास्त करून शेतीत विविध प्रयोग करत प्रयोगशीलतेत सातत्य राखले आहे.

बेणे निवड

एकूण ऊस उत्पादनासाठी आणि उसाच्या वाढीसाठी दर्जेदार बेणे निवड अत्यंत महत्त्वाची ठरते. मागील अनेक वर्षांपासून उसाच्या को ८६०३२ हे वाण ते वापरत आहेत. शेतीमध्ये प्रामुख्याने ठिबक सिंचनावर भर दिला जातो. मात्र आवश्यकतेनुसार पिकाची पाण्याची गरज आणि तापमानाचा अंदाज घेऊन महिन्यातून एखादे पाणी पाटाने दिले जाते. इतर वेळी ठिबकने दररोज सिंचन केले जाते. पाटाने पाणी देण्याचा अतिरेक टाळला जातो.

जमीन सुपीकतेला प्राधान्य

श्री. खोत यांनी जमीन सुपीकतेला जास्त महत्त्व दिले आहे. उच्चांकी ऊस उत्पादन वाढीसाठी जमिनीची सुपीकता हीच महत्त्वाची बाब असल्याचे अमोलराव सांगतात. गेल्या १५ वर्षांपासून ऊस पिकामधील शिल्लक पाला जाळलेला नाही. त्याचा जमिनीस चांगला फायदा झाला असून जमीन कसदार झाली आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब १ ते १.१०, तर सामू ६.५ ते ७ इतका आहे. खोडवा किंवा निडवा काढल्यानंतर सबसॉयलर मारून जमीन तापू दिली जाते. त्यानंतर रोटाव्हेटर मारून लहान सऱ्या सोडून ताग लागवड केली जाते. ताग पीक लागवडीनंतर ५० दिवसांनी जमिनीत गाडले जाते. त्यानंतर ऊस लागवड केली जाते. याप्रमाणे नियोजनामुध्ये त्यांनी सातत्य राखले आहे.

निडव्यापर्यंत उत्पादन

गेल्या १० वर्षांपासून सातत्याने निडव्यापर्यंत ऊस उत्पादन घेत आहे. खोडवा व निडव्याला लावणीच्या तुलनेत खर्च कमी येतो. तसेच जमीन सुपीक असल्याने खोडवा आणि निडवा दोन्ही देखील चांगल्या पद्धतीने उत्पादन देऊन जातात. लावणीचे उत्पादन साधारण ९० ते ९५ टन, खोडव्याचे उत्पादन ७० ते ७५ टन, तर निडव्याचे उत्पादन ५० ते ५५ टन इतके आहे. जमिनीची सुपीकता हेच या उत्पादन वाढीचे मुख्य कारण ठरले असल्याचे अमोलराव सांगतात.

खर्चात बचत

लागण पिकाच्या तुलनेत खोडवा व निडवा पीक कमी खर्चामध्ये चांगले उत्पादन घेता येते. खोडवा पिकामध्ये ही खर्चात मोठी बचत होते, यामध्ये लागवडीसाठी बेणे लागत नाही, कमी प्रमाणात जमिनीची मशागत करावी लागते. त्यामुळे जमिनीची धूप कमी होते तसेच विकास पाणी देखील कमी प्रमाणात लागते. लागणीच्या तुलनेत खोडवा किंवा निडवा पिकाची वाढ जास्त असते. त्यामुळे परिपक्व ऊस लवकर तयार होतो. पाचटाचे आच्छादन केल्यामुळे जमिनीची धूप कमी होते. जमिनीमध्ये ओल टिकून राहण्यास मदत होते. लागणीच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के खर्चामध्येच खोडवा किंवा निडवा पीक चांगल्याप्रकारे घेता येते असे अमोलराव सांगतात.

खोडवा नियोजनातील बाबी

सध्या शेतामध्ये ७ महिन्यांचे खोडवा पीक आहे. खोडवा ठेवताना एक सरीआड पाचट ठेवले आहे. त्याच वेळी पारीच्या साह्याने रासायनिक खतमात्रा देण्यात आली. बुडके छाटून घेऊन बुडक्‍यावर बुरशीनाशकांची फवारणी घेतली.

पहिल्या सिंचनासोबत नत्राचा डोस दिला. दुसऱ्या टप्प्यात पारीच्या साहाय्याने एनपीके खते दिली. बगला फोडून हलकी भरणी करून घेतली आहे.

त्यानंतर रासायनिक कीटकनाशकांची प्रतिबंधात्मक फवारणी केली आहे.

तीन महिन्यांचा खोडवा निघाल्यानंतर शेतातील मरतुक झालेला ऊस काढून घेतला.

हुमणीच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे मोठे नुकसान होते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हुमणीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उसाच्या बुडक्यावर नोझलद्वारे रासायनिक कीटकनाशकांचे ड्रेंचिंग केले. याचा सकारात्मक फायदा झाला आहे. जून-जुलैमध्ये प्रत्येक वर्षी हुमणी प्रतिबंधात्मक उपाय केला जातो. सध्‍या चांगला पाऊस असल्याने फारसे पाणी द्यावे लागत नाही.

आगामी काळात रासायनिक खतांच्या मात्रा देण्याचे नियोजित आहे. तसेच तणांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जातात.

मागील काही मावा किडीच्या प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेण्याचे नियोजित होते. मात्र, उसाची उंची वाढल्याने फवारणी करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे ड्रोनच्या मदतीने रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेण्यात आली. तीन वेळा ही रासायनिक फवारणी घेण्यात आली.

अमोल खोत, ८८०५५९६३६९

(शब्‍दांकन : राजकुमार चौगुले)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Relief: राज्यात नुकसानीपोटी ३३७ कोटींची मदत

Maharashtra Rain: कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

Group Farming : स्थलांतराला गटशेतीचा पर्याय

Farm Road Registration : महिला शेतकऱ्याला शेत रस्ता नोंदीचा पहिला सातबारा

Agriculture Irrigation : शेती सिंचनासाठी विशेष अभियान

SCROLL FOR NEXT