Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Pre Monsoon Rain : वादळी वाऱ्यासह पावसामुळे दाणादाण

Team Agrowon

Nashik News : नाशिक शहरासह सिन्नर, दिंडोरी, कळवण व चांदवड तालुक्यांत शुक्रवारी (ता.१०) रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसाने भाजीपाला पिकांची व कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दैना केली आहे. एकीकडे उन्हाचा चटका अधिक असताना उकाडा जाणवत होता. त्यात दुपारी ३ वाजेनंतर अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

नाशिक शहर व परिसरात दुपारी चारला विजांच्या कडकडाटासह सुरू झालेला पाऊस साडेपाचपर्यंत थैमान घालत होता. जवळपास दीड तास झालेल्या तुफान वादळी पावसाने पाथर्डी, पिंपळगाव खांब, दाढेगाव भागांत भाजीपाला आणि कांद्याचे मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे गाव परिसरातील नाले दुथडी भरून वाहत होते.

या नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने विकण्यासाठी क्रेट्समध्ये भरून ठेवलेल्या भाजीपाल्याचे नुकसान झाले. पाणीच पाणी झाल्याने विकण्यासाठी काढणी केलेले कोबी, फ्लॉवर, टोमॅटो यांचे मोठे नुकसान झाले. टोमॅटोच्या शेतामध्ये बांधलेले बांबू आणि तारा तुटल्याने या बागा भुईसपाट झाल्या. उन्हात ठेवलेला कांदा पावसात भिजल्याने काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

कळवण तालुक्यातील अभोणा परिसरात वादळी वाऱ्यामुळे कळलग व नांदुरी रस्त्यावरील कांद्याचे मोठे शेड कोसळले, तर काही शेडच्या ताडपत्री उडाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तासभर चाललेल्या पावसात वादळीवारा जास्त असल्याने परिसरातील आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झाडावरून उतरविण्यासाठी तयार असलेला आंबा वाद‌ळी वाऱ्यामुळे पूर्णपणे तुटून पडले. कांदा, मिरची, टोमॅटो व इतर पिकांचेही नुकसान झाले. शेतात, रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारातील ग्राहक व विक्रेत्यांची एकच तारांबळ उडाली, वाहतूकही विस्कळित झाली.

दिंडोरी तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे वरवंडी येथे घराचे पत्रे उडाले आहेत. शिवनई, आंबे दिंडोरी, जानोरी येथे द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे द्राक्षबागांच्या काडीचे नुकसान झाले. उघड्यावर असलेल्या भाजीपाल्याचेही नुकसान झाले. सिन्नर शहरासह तालुका परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली.

चांदवड तालुक्यात मोठे नुकसान

चांदवड तालुक्यात दुपारी तीन वाजता अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडला त्यामुळे धोडंबे, कानमंडाळे, कुडांणे येथे खूप मोठ्या प्रमाणात घरांचे, शेडनेट,पोल्ट्री फार्म यांचे नुकसान झाले. मनोहर किसन उशीर यांच्या दोन पोल्ट्री फार्मचे पूर्ण पत्रे उडाले. मनोज किरकाडे यांच्या शेतीसाठी एक एकरवरील शेडनेट वाऱ्यामुळे उडून गेले. त्यांचे दहा लाखाचे नुकसान झाले.

बाळासाहेब रकिबे यांची गाय वीज पडून मृत्यू पावली. धोडंबे, कानमंडाळे, कुंडाणे, हट्टी, जैतापूर, विजयनगर, एकरुखे या भागांत अचानक आलेल्या वारा व अवकाळी पावसाने शेतीचे,घराचे नुकसान झालेले आहे. नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकरी वर्गात मागणी होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT