प्रदीप काकडे
Grape Orchard Management :
सध्याच्या वातावरणाचा विचार करता बऱ्याच भागातील तापमान वाढून ४३ अंश से.पर्यंत, आर्द्रता कमी होऊन २५ टक्क्यांपर्यंत खाली आलेली दिसते. अशा परिस्थितीमध्ये फळकाढणीनंतर पुढील बाबींवर प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे.
वेलीला विश्रांती देणे
फळकाढणी ते खरडछाटणीच्या कालावधीत किमान १५ ते २० दिवसांची विश्रांती द्राक्ष वेलींना मिळणे गरजेचे असते. त्यासाठी या काळात द्राक्ष वेलींना पाण्याचा थोडा फार ताण द्यावा. थोड्या प्रमाणात ठिबक चालवून नत्र व स्फुरद खतांचा पुरवठा करावा. त्याच प्रमाणे मागील हंगामात द्राक्ष घडाच्या विकासादरम्यान वेलींची झालेली झीज भरून निघण्यासाठी एसएसपी १० किलो आणि युरिया ५ किलो जमिनीतून द्यावा. खरड छाटणीपूर्वी माती व पाणी परीक्षण करून घेतल्यास सद्यःस्थितीत बागेतील अन्नद्रव्यांची नेमकी परिस्थिती कळेल.
चारी घेणे व अन्नद्रव्य व्यवस्थापन
मागील हंगामात घडाच्या विकासात द्राक्ष वेलीचे मुळे आणि पानांनी मोठे कार्य पार पाडलेले आहे. पाने जुनी होऊन पिवळी पडल्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी झाली असेल. वेलीची मुळेही जुनी व काही अंशी काळीही पडली असतील. येणाऱ्या नव्या फुटींच्या जोमदार वाढीसाठी जमिनीत कार्यक्षम पांढरी मुळे तयार करून घेणे गरजेचे असते.
त्यामुळे खरडछाटणीपूर्वीच्या तयारीमध्ये वेलीच्या बुंध्यापासून साधारण ८ ते ९ इंच अंतरावर ३ ते ४ इंच खोल आणि २ फूट रुंदीचा चारी घ्यावी. माती परिक्षणानुसार खतांचे नियोजन करावे. साधारण परिस्थितीत तीन वर्षांपेक्षा जुन्या बागेत ५०० ग्रॅम एसएसपी, शेणखत २ ते ३ घमेली प्रति वेल याप्रमाणे द्यावे.
चारीमध्ये एकरी डीएपी ५० किलो, मॅग्नेशिअम सल्फेट १५ किलो, फेरस सल्फेट १० किलो, झिंक सल्फेट ५ किलो आणि बोरॉन २ किलो या प्रमाणात मिश्रण टाकून घ्यावे. त्यावर हलकासा मातीचा थर टाकून झाकून घ्यावे, त्यामुळे बोद तयार होईल. हवा खेळती राहून पांढरी मुळे तयार होण्यास मदत होईल.
द्राक्ष लागवडीखालील बऱ्याच भागामध्ये चुनखडीचे प्रमाण कमी अधिक दिसून येईल. जमिनीत असलेल्या चुनखडीमुळे द्राक्षघडाच्या विकासात बऱ्याच अडचणी येतात. ते लक्षात घेता चुनखडीच्या प्रमाणानुसार एकरी साधारणतः ४० ते ५० किलो सल्फर शेणखतात मिसळून द्यावे.
चारी घेतेवेळी काही प्रमाणात मुळ्या तुटतात. त्यामुळे चारी जास्त काळ उघडी राहणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा, ही मुळे सुकण्याची शक्यता असते. खते टाकून चारी मातीने झाकल्यानंतर त्वरित बोद पूर्णपणे भिजेल अशा प्रकारे पाणी द्यावे. ही कार्यवाही खरड छाटणीच्या १५ दिवस आधी पूर्ण करावी.
प्रत्यक्ष छाटणी घेणे
खरड छाटणी म्हणजे मागील हंगामातील काडी एक डोळ्यावर खरडून छाटणे. एक सारख्या फुटी निघण्याच्या दृष्टीने बागेत काडीवर फक्त एक डोळा राखून छाटून घ्यावे. जास्त जुन्या बागेमध्ये ओलांडे डागाळण्याची समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. खरड छाटणीवेळी असे खराब झालेले ओलांडे कापून घ्यावेत. मागील हंगामातील काडी ओलांड्याकरिता वापरावी.
बाग एकसारखी व लवकर फुटण्यासाठी
तापमान जास्त असल्यामुळे या वेळी डोळे फुटण्याकरिता हायड्रोजन सायनामाइड मुळीच गरजेचे नसल्याचा गैरसमज अनेक बागायतदारांनी करून घेतला आहे. ओलांड्यावर मागील हंगामातल कमी अधिक जाडीच्या काड्या होत्या.
त्या आपण एक डोळ्यावर छाटल्या असल्या तरी त्यांची कमी अधिक जाडी दिसून येईल. या वेळी ओलांड्यावर लहान मोठे डोळे असल्यामुळे तेही मागे पुढे फुटण्याची समस्या निर्माण होते. हे टाळण्यासाठी हायड्रोजन सायनामाइड २० ते २५ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे पेस्टिंग करणे गरजेचे आहे.
डोळे फुटण्याकरिता कमी तापमान व जास्त आर्द्रता आवश्यक असते. परंतु या वेळी तापमान जास्त असल्याकारणाने डोळे फुटण्यात अडचणी येतील. खरड छाटणीच्या ५ ते ६ दिवसांपासून ते १५ दिवसांपर्यंत सकाळी साडेअकरा ते एक वाजेपर्यंत व दुपारी तीन ते साडेचारपर्यंत ओलांड्यावर पाण्याची फवारणी करावी. बागेतील आर्द्रता वाढविण्यासाठी बागायतदार बागेत मोकळे पाणी देत असले तरी ही आर्द्रता वर ओलांड्यापर्यंत सारखी राहत नाही. त्यामुळे ओलांड्यावर पाण्याच्या फवारणीला प्राधान्य द्यावे.
बऱ्याच बागेत खरड छाटणीच्या २० दिवसांनंतरसुद्धा फुटी अजून बाहेर पडल्या नाहीत. त्यामागे मुख्यत्वे जास्त तापमान व कमी आर्द्रता हीच परिस्थिती कारणीभूत आहे. अशा वेळी बागेत अर्धा किलो युरिया २ ते ३ दिवस ठिबकद्वारे द्यावा. तसेच युरिया ०.२५ ग्रँम प्रति लिटर पाणी याप्रमाणे २ वेळा फवारणी करावी. ही फवारणी सायंकाळी फवारणी केल्यास फारशी अडचण येणार नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.